श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ७९
नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.
सर्व काल स्मरावें ईश्वरासी । काया वाचा आणि मनेंसी । चिंता सांडोनि भरवंसी । तोचि एक भजावा ॥१०७३॥
आयुष्य वेचें क्षणक्षणा । मूळ येईल मरणा । सर्वकाळ सावधपणा । राखावा आत्मनिश्चयें ॥१०७४॥
भक्तिमार्गाचें प्रमुख साधन । करावें अखंड नामस्मरण । हरिचिंतनावीण आपण । राहों नये क्षणैक ॥१०७५॥
इतर साधनें तात्पुरतीं । भक्तिमार्गाची अखंड ज्योती । अहोरात्र ध्यास चित्तीं । राहिला पाहिजे तयाचा ॥१०७६॥
अखंड चिंतन तयाचें । विश्वात्मक प्रभु देवाचें । राहिल्या स्वरूपही साचें । दिसों लागे डोळिया ॥१०७७॥
तयासीच म्हणति ध्यान । सर्वात्मक स्वरूप दर्शन । अवघीं तयाचीं रूपें जाणुन । नम्र व्हावें त्याठायीं ॥१०७८॥
नमन करावें तयासी । सेव्य सेवक भावेंसी । तत्पर असावें अहर्निशीं । अहंममता सांडोनि ॥१०७९॥
हें ऐसें कैसेनि घडेल । अखंड स्मरण राखों येईल । ऐसी शंका मनीं येईल । तरी सांगतों अवधारा ॥१०८०॥
अखंड प्रेम ज्याठायीं । त्याचें स्मरण सहज राही । मुद्दाम करावें लागत नाहीं । ऐसे असे स्वभावें ॥१०८१॥
स्त्री पुत्र गृह वित्त । यांचे ठायीं जडलें चित्त । स्मरण त्याचें चालिलें सतत । न लावितां ध्यान लागे ॥१०८२॥
प्रपंचावरी जैसें प्रेम । तैसें ईश्वरी जडतां नि:सीम । सर्वकाळ स्मरणाचा नियम । अनायासें साधेल ॥१०८३॥
प्रेम उपजतां ह्रदयीं । स्मरण करावें लागत नाही । तोचि स्वभाव ठायीचें ठायी । होऊनि राहे आपुला ॥१०८४॥
विषयाचें ध्यान सुटेल । तैं भगवंती मन जडेल । तोचि मग दिसों लागेल । डोळियांपुढे अखंड ॥१०८५॥
विषयाचें ध्यान नाशिवंत । अविनाश स्वरूप भगवंत । त्याचें ठायीं जडतां चित्त । अविनाश करी आपणा ॥१०८६॥
म्हणोनि त्याचेंच चिंतन करावें । अखंड ध्यान धरावें । सर्वकाळ असों द्यावें । प्रेम अंतरीं तयाचें ॥१०८७॥
काया वाचा आणि मनें । असावें तयासी अनन्यपणें । देह वेचांवा त्याकारणें । प्राप्ति व्हावया तयाची ॥१०८८॥
श्रोत्र चक्षु जिव्हा घ्राण । करावीं तयासी अर्पण । त्वगिंद्रिय करचरण । सकल योजावीं तन्निमित्त ॥१०८९॥
हरिकथा कानीं ऐकावी । किंवा ऐकितों ते हरि । कथा म्हणावी । बोलतां बोल बोलवी ।
तो नव्हे आण हरिवीण ॥१०९०॥
जो जो काहीं बोल उठे । तो हरिप्रेरणेवीण नुमटे । निंदा स्तुति कानावाटे । ऐकतां नये कंटाळूं ॥१०९१॥
सकल इंद्रियाचें व्यापार । सर्वत्र घडती साचार । ते हरिवीण न धरिती थार । मानावें सर्व हरिरूप ॥१०९२॥
श्रवणीं ऐकतो तो हरी । नेत्रीं पाहतो तोही हरी । त्वकजिव्हा घ्राण व्यवहारीं । तोचि एक जाणावा ॥१०९३॥
देह अर्पावा तयासी । शास्त्रदृष्टि शुध्दपणेंसी । आचरण राखावें नियमेसी । विस्मरण होऊं न द्यावें ॥१०९४॥
वाणीनें अखंड नामोच्चार । सत्यभाषणीं निर्धार । मन रमवावें निरंतर । कल्पना करोनि तयाची ॥१०९५॥
तयाची कल्पना करो जातां । तो कल्पनेरहित होय तत्वतां । कल्पनेसी धरो जातां । होय कल्पना हरिरूप ॥१०९६॥
ऐसें काया वाचा आणि मनें । अनन्य होऊनि शरण जाणें । चिंता काहीं न करणे । घडेल कैसें कैशापरि ॥१०९७॥
योगक्षेम कैसा साधेल । भयसंकट कैसे टळेल । येंविषयीं न व्हावे व्याकुळ । भार घालावा तयावरी ॥१०९८॥
तो सत्ताधारी जगदीश । त्यासी न लागे अवकाश । चिंतन केलिया सावकाश । सकल आपदा परिहरी ॥१०९९॥
आपण करावें चिंतन । चिंता सोपवावी त्यालागोन । मनीं निर्धार पूर्ण राखोन । ब्रीद सत्य करावें ॥११००॥
तो चिंतेसी नेदिल उरों । चिंतने चिंतने काळ सरो । कार्यसिध्दीसी अवसरा । नाहीं धीर धरलिया ॥११०१॥
त्याचेचिं स्मरण करावें । सदा त्यासी मनीं ध्यावें । दैन्यदु:ख नुरे स्वभाव । ऐसा महिमा तयाचा ॥११०२॥
आतां या स्मरणाचें फळ । कोण्या प्रकारें लाभेल । तें ऐका स्पष्ट बोल । नारदमुनीचें सिध्दवाक्य ॥११०३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 24, 2015
TOP