मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें|
सूत्र ८२

श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ८२

नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.


भक्ति बोलिली नवविधा । भागवतादि ग्रंथी प्रसिध्दा । येथें सांगति एकादशधा । नारदुमुनि विनोदें ॥११३७॥
भक्ति उपजावया कारण । भगवदगुण माहात्म्य श्रवण । प्रथम सांगितेले साधन । मूळारंभ तेथोनि ॥११३८॥
भगवदगुण श्रवण करितां । माहात्म्य त्याचें कानीं पडतां । ईश्वरनिष्ठा उपजे सुलभता ।
सामान्य सकळ जनांसी ॥११३९॥
ऐकिलें तेंचि ऐकति । ऐकोनिया लुब्ध होती । श्रवणमात्रें पालटे मति । सवें लागती सन्मार्गी ॥११४०॥
ईश्वराची व्हावया ओळख । गुणमाहात्म्य श्रवण प्रमुख । साधन जाणती सकल लोक । तत्पर होऊनि राहती ॥११४१॥
ईश्वराच्या सगुण मूर्ती । देवालयी क्षेत्रीं तीर्थीं । पाहूनि जन लालचावती । दर्शनालागीं तयाच्या ॥११४२॥
रूप देखतां लागे ध्यान । मन होऊं लागे उन्मन । ध्यान ठसावतां संपूर्ण । देहभाव विसरती ॥११४३॥
दर्शनानें झाली तृप्ति । तेणें साधली परमशांति । दर्शनाचा हव्यास चित्तीं ।  तेणें राहिला जोडोनि ॥११४४॥
जें रूप डोळां पाहिलें । तेचिं पुजावेसें वाटलें । पूजनीं तन्मयता पावले । ऐसें आहाती कित्येक ॥११४५॥
स्वयें पूजा करूं लागतां । मन पावे एकाग्रता । पूज्य पूजक भाव हरपतां । तल्लीन होऊनि राहती ॥११४६॥
पूजा करितां मनोभावें । भक्ति उपजे स्वभावें । यालागीं नित्य पूजावे । देव गुरू प्रतिमालिंग ॥११४७॥
तैसेचि जाणा स्मरण चिंतन । अंतरात्म्याचें अनुसंधान । नित्य राखिल्या प्रयोजन । नाहीं बाह्योपचाराचें ॥११४८॥
सहज नित्य स्वरूपगत । श्रीहरी जवळीच नांदत ।  सांडूनिया अन्य होत । त्यासी स्मरावें अखंड ॥११४९॥
ऐसीही स्मरणासक्ति । तेथेंचि जे जडोनि राहति । त्यांसी न लगे आन युक्ति । भगवद्भक्ति साधाया ॥११५०॥
अखंड स्मरणें अनन्यभक्ति । हृदयीं जडलिया सहजप्रीति । सर्वभावें जे अनुसरति । विकोनी घेतां आपणां ॥११५१॥
तयांचे सकल व्यवहार । ईश्वरार्पण झाले साचार । भेदबुध्दिसी नाहीं थार । दास होऊनि राहिलो ॥११५२॥
ते जाणावी दासासक्ति । अखंड ऐक्य भगवंती । अहोरात्र त्यांचे चित्ती । दुजाभाव नुमटे ॥११५३॥
दास्य करितां फळा आलें । देवाचें सख्यत्व संपादिले । तें सख्यासक्ति नाम पावले । ऋणी केले भगवंता ॥११५४॥
सख्यत्वें मैत्र संपादिलें । तेणें ईशकृपेसी पात्र झाले । तेणेचि वात्सल्य संपादिले । सर्वकाळ तयांचे ॥११५५॥
तो भक्तजनवत्सल । प्रेमळजन प्रांजळ । तेणें वश केला घननीळ । आज्ञा झेलित भक्तांची ॥११५६॥
ते जाणावी वात्सल्यासक्ति । ईश्वरकृपेची अनुभूति । पावोनि स्वयें कृतार्थ होती । इतरांसीहि उध्दरिती ॥११५७॥
तैसेचि अनन्यपणें । कांतकांता या न्यायानें । सर्वभावें अनुसरणें । ते कांतासक्ति म्हणावी ॥११५८॥
पतिव्रतेसी पतिवचन । वेदाज्ञेपरि प्रमाण । तयाची आज्ञा परिपालन । हाचि धर्म तियेचा ॥११५९॥
विवाह झालियावरी । कुलगोत्र नाम परिहरी । आपुलीं कांहीं न ठेवी उरी । होऊनि राहे अर्धांगीं ॥११६०॥
तैसें आपुलेंपणात त्यजुनि । सर्वस्व ईश्वरीं अर्पुनि । राहणें जें एकपणी । अभेदपणें तयासी ॥११६१॥
आतां आत्मनिवेदन । ते यापुढील पायरी जाण । देहाचेंही वेगळेंपण । तेथ नाहीं अवशिष्ट ॥११६२॥
सदेह सच्चिदानंदपणें । देहाभिमान त्यजुनि असणें । आपुलेपणाचा त्याग करणें । ते परमभक्ति ज्ञानोत्तर ॥११६३॥
पराभक्ति म्हणति तियेसी । जे साधे आत्मनिवेदानासरिसी । वेगळेपण नुरता सवेसी । तन्मयता उपजवी ॥११६४॥
आतां तन्मयतासक्ति । सांगावी नलगे आन रीति । तन्मयता तेचि भक्ति । सहज स्थिति लक्षण ॥११६५॥
जो तन्मय होऊनि राहिला । तो सर्वकाळ तोचि झाला । अहं इंदतेसी विसरला । अखंड स्वरूपी चिन्मय ॥११६६॥
सीमा झाली बोलण्याची । शब्द मावळला तेथेचि । नि:शब्दपणें शब्दाची । तेथें झाली परमावधी ॥११६७॥
परि राहिलें एक लक्षण । परमविरहासक्ति कारण । संयोगी विद्योगी उपजवून । वेधिल्या गोपी रासक्रीडे ॥११६८॥
रासक्रीडा भरासी आली । मध्येंच कृष्णमूर्ति हारपली । तेणें गोपिकांसी जाणों आली । किंमत कृष्णपणाची ॥११६९॥
कृष्ण न देखतां नयनीं । गेल्या वेडयापिश्या होवोनि । स्थावर जंगमी शोध करोनि । पाहूं लागल्या तयासी ॥११७०॥
तो न दिसे कोठेंही । कुंडीतून प्राण लवलाही । बाहेरी निघों लागला पाही । झाल्या अत्यंत विरहातुर ॥११७१॥
कृष्ण तोचि अंतरात्मा । सकल विश्वाचा विश्वात्मा । प्रेममूर्ति प्रेमात्मा । हरपतां सकल हरपलें ॥११७२॥
ऐशा व्याकुळ होतां क्षणीं । पुन्हां देखिला कृष्ण नयनीं । मग तोचि जडला ध्यानीं मनीं ।
झालें विसर्जन अहंतेचें ॥११७३॥
अहंतेचे पूर्ण निरसन । व्हावया झालें अदर्शन । तेचिं पुनरपिं होतां दर्शन । झाल्या कृष्णरूपें निजांगें ॥११७४॥
ऐशा एकादशप्रकारें । भक्तिचें अंगीं भरे वारें । साध्य साधन एकसरें । साधेल तैसें वर्तावें ॥११७५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP