माधव जूलियन - आत्मप्रतीति
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
“पशूनामस्मि गर्दभ: ।” खरी गीता.
हें ऐकुलतें ऐक गूढगुञ्जित आहे. हें सुनीत नसेल, स्वनितक नसेल.
निदान स्वनित - ज्यांत दुसरा चरण पुन्हा चौदावा असतो असें
भूपतिजातीय चतुर्दशचरणी गीत तरी आहेच आहे. ‘ऐको देव:
सर्वभूतान्तरात्मा’ असें तें अनिर्वचनीय तत्त्व जसें पुरुषोत्तमात तसेंच
मानवादि सर्व पशूंत, व सर्व पशूंत अवधूत अशा त्या स्वरवरांतहि
आहे हें पाहून त्याच्याशी क्षणभर तल्लीन होऊं पहाणार्या साधकाची
येथे भूमिका आहे. सिद्धाची नाही. विचारसरणी बहुतांशी औपनिषदिक
आहे. सार्वत्रिक शहाणपणाच्या सुबत्तेच्या या काळांत हा ‘गाढवपणा’
योग्य तो रुचिगलट करील. तेव्हा ज्ञानेश्वर - रवीन्द्रनाथांच्या दायादांनी
क्षमाच करावी. शेवटी मराठीच्या परीक्षकांना विनन्ति हीच की,
या कवितेंतील गूढार्थ प्रयत्नें सापडेल या आशेने ही कविता प्रश्नपत्रिकेंत
घालूं नसे हींत अर्थ नाही. अर्थप्राप्तीसाठी ही कविता नाही; परन्तु
‘व्यर्थीं अधिकचि अर्थ असे’ अशी आशा कोणी केल्यास त्यास
कळावें की ‘तो ज्यांस दिसे त्यां म्हणति पिसे !’ यासाठी. झपूर्झा !
जपून जा !
[जाति भूपति]
अवधूत खरा, तू खरा तू स्वयंमन्य !
पटविलें पूर्ण तू मज मी तूच अनन्य.
जागूनि जगाच्या निशी कम्बुवत शब्द
करितां तू राही निजुनि हें जगत स्तब्ध.
तें अस्फुट अव्यक्ताचें स्वनित गभीर
मज चिदामृतास्तव टाकी करुनि अधीर.
तव तत्त्व चहुकडे अनुस्यूत अविभाज्य
पटतांच लाभतें सदानन्दसाम्राज्य.
मी आत्मसुखी समदशीं शून्यमनाने
जाणूनि गातसें नेणीवेचे गाणें.
तिमिरांत तेज मी आणि तिमिर मी तेजीं
कीं गेलें मीपण पण तूपण ऊरलें जी
आयतश्रुति नसो अथवा कूर्च जघन्य -
पटविलें पूर्ण तू मज मी तूच अनन्य.
ता. १६ सप्टेम्बर १९३२
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP