[जाति अञ्जनी]
पहा सृष्टिचें ध्यान मनोरम. पहा सृष्टिचें घ्यान ! ध्रु०
मुकुलित ह्रदयीं तव तम वाढे,
ग्रन्थ फोल मग जाडे जाडे,
चल पड बाहिर, औघड कवाडें,
खुल्या मोकळ्या वातावरणीं जा कर अमृतपान. १
वेस सम्पली, जा तू पुढती,
द्दष्टि दूरवर फिर्वी भवती,
जिकडे तिकडे हिरवी नवती,
प्रकाश पाडी प्रसन्न गाळुनि विरल श्याम वितान. २
जळच सरीं का जिवन्त कळकळ ?
शमवी बाहयान्तर हें जळजळ,
बळें वायुशी घाली खळखळ,
बन्धार्याला छेडित कलरव काढुनि निववी कान. ३
शेङगवलेले हे गुल्मोहर
पल्लवभारें नम्र मनोहर,
विस्तृत छाया थरावरी थर
हिरवी हिरवी गार कशी ही नवस्नात अम्लान ! ४
निम्नोन्नत हे माळ पोपटी.
कुम्पणरेषा श्याम शोभती,
लवणोलवणीं श्याम तरुतती,
कमरेवर ये औस - जोन्धळा, गुडघ्यावर ये धान. ५
तृण भिजुनी मधु सुटतो परिमळ,
पान्दीने जळ येऐ निर्मळ,
दिसे तरङिगत वाळूचा तळ,
जळाकडे खळखळे पळे जळ द्याया जीवनदान. ६
दूर पलिकडे त्या माळावर
नीलपटाच्या पुढे समान्तर
झाडांची ती राङग पहा तर -
सडक जाय ती जोडित गावें करुनि जिवाचें रान. ७
फूलपाखरें पण पायाशी
मजा मारिती तृणांत खाशी,
औडति यथाबळ हीं अवकाशीं -
नको औद्या वा काल, आजचें औनच यांस निधान. ८
शान्त सुखद हें सृष्टितपोवन !
निरपेक्षपणें ऐथे रमो मन,
औपाधि करितिल चित्तीं क्षोभ न,
हवें कशाला स्वर्गीं चञ्चल जाया कल्पविमान ? ९
दूर गडाचा शोभे डोङगर,
छातीवर जरि मेघाडम्बर
धरी सावरुनि शीर्षी अम्बर,
तो तर पावन नील मर्गजी गमे स्वर्गसोपान १०
द्दश्यें अन्धुकती या समयीं
विरे विविधता हळुहळु विलयीं
दिसे पसरली अफाट कढाइ,
दुसरी तीवर औपडी, मध्ये जीवन गूढ महान. ११
ता. १ सप्टेम्बर १९२८