[जाति परिलीना]
नादावुनि केलें मी भ्रमण किति अहो तें !
विश्रान्तिस्थल अन्तीं हेंच हाय होतें. ध्रु०
हमरस्त्याहूनि दूर चिमुकलाच गाव,
डाकघराचाहि जिथे नेणवे अभाव.
कष्टकरी दीनांचा मूठभर जमाव, -
जीवन अज्ञात तिथे वाटे मज कोतें. १
ते तिकडे पीत माळ पसरती अफाट,
हा ऊकडे रम्य गार हरित नदीकाठ,
लवणांतुनि ऊसगहूशाळुचाहि थाट !
स्वगृहांत परि गवसे सौन्दर्य न कोठे. २
हृद्वीणा अननुभूत सहजकम्प पावे,
सहकम्पें अतिकाङक्षा स्फुरित हो स्वभावें.
गमे रूढि भङगुनि मी घ्येय नवें गावें
की सीमोल्लङघनींच पौरुष तें मोठें ! ३
होतां वश वाग्देवी निघे प्रेमबोल,
हृदय हेंच मोल जया, न हो हेम मोल,
भावसिन्धुवर होती रसिक किति विलोल,
रिक्त - हस्त मी, जनता वेची मणिमोत्यें, ४
तो मीनाबाजार न, हसे रङग - रात,
ज्योतींवर किति पतङग झेप टाकितात !
मीहि मग्न मुक्तमधुपभावगुञ्जनांत -
मोहनलहरींत आणि जीव खाय गोते ! ५
भरतवाक्य सम्पुनि हो शान्त गानवीची,
काव्यदीप विझतां हो स्मृति खर्या भवींची,
तो न दिसे लोचनास शुक्र वा मरीची,
रङगसौध कोसळुनी ऊरे भग्न जोतें. ६
दैव करी गुप्त पाठलाग, जीव धावें.
सावज हें मी धरीन, तो म्हणे प्रभावें,
टाकित धापाच पुन्हा प्रथम पदीं पावे.
अन्त्यक्षणिं वेडावी स्वप्न गत, - नको तें !
ता. ६ जानेवारी १९२९