[जाति अक्रूर]
श्रीकृष्णा रे, आस न दुसरी ऊरली,
ये धमव मधुर तव मुरली. ध्रु०
क्षण दीपवुनी होशी द्दष्टीआड
अन वरिशि मूकता द्वाड.
स्वरसङगम तो, तगमगतो हा जीव,
वाजीव गडे वाजीव !
ये वरस पुन्हा तो रम्यादभुत राग,
ये वरस पुन्हा तो रम्यादभुत राग,
ये फुलव झुलव दिल्बाग.
हृदयाच्या सखयावीण
संसार सदाचा शीण !
दे जीवन ह्र्द्य नवीन,
किति वर्षाची हौस अजूनि न पुरली,
ये घुमव मधुर तव मुरली. १
सौभाग्य कुठे विधिसम्मित अनयाचें,
अन स्फुरण कुठे प्रणयाचें ?
हें हक्काचें चुम्बन काल्यावाणी
बधिरता अन्तरीं आणी,
मज तूच हवा सौन्दर्याचा कन्द !
तुजवरच जडे स्वच्छन्द.
ही मिणमिणणारी ज्योत
क्षण फुलव, सोड तव झोत !
- कुणि सुखें नित्य धुमसोत !
ही वेडी त्या निर्वाणास्तव झुरली,
ये घुमव मधुर तव मुरली. २
कुणि म्हणती की “ही लोकांतुनि कुठली,
चवचाल चाल ही कुठली ?
ते रङग कुठे कौमाररस्वप्नाचे ?
ते ढङग स्वैरपणाचे !”
पण या हृदयीं प्रेम झर्यापरि वाहे,
पाटाचें पाणी का हें ?
तू कुमार, मी न कुमारी !
परि हृदय हाक तुज मारी,
वैषम्य दुरीच झुगारी,
मज तू दिसतां कुणीव कळली, स्फुरली -
ये घुमव मधुर तव मुरली. ३
अन त्या समयीं पडदा अपुल्यामधला
क्षणभरच खालती पडला.
तव रूपाचें स्वप्नहि पडलें नव्हतें,
पण वेडच जडलें तंव तें.
मज या लोकीं तूच ऐक अभिराम,
तुजमधेच कामविराम,
कां मारा हृदय ऊपाशी
परलोककल्पनापाशीं ?
द्या हिमकण कां मधुपाशी ?
ही भोक्तृत्वें तुझ्याचसाठी ऊरलीं -
ये घुमव मधुर तव मुरली. ४
मज देव नको, माझा तू अधिदेव;
दे जुळ्या जिवाची खेंव.
ज्या मित्राच्या भवती हे ग्रहगोल
नाचती सावरुनि तोल,
अन अवकाशीं ऐकच घुमुनी नाद
ऊमटवी मनीं पडसाद,
रङगूनि विश्व रासांत
जडतेवर होऊ मात,
तो तूच चहुकडे नाथ !
दे शान्ति मला रासभ्रमणीं मुरली,
ये घुमव मधुर तव मुरली. ५
तू पूर्वयुगीं मुरलीच्याच सुराने
भारिलीं खिलारें, रानें,
त्या नादाने साध्या भोळ्या गोपी
हरि - हृदयीं गेल्या झोपीं.
मज ऐकव तो, कुठवर राहूं जागी
संशयत्रस्त हतभागी ?
हें अंतर डहुळे शोकें,
झोक्यावर बसती झोके;
नाडीचे वाढति ठोके -
ये हृद्वैद्या, वेडी बघ आतुरली
ये घुमव मधुर तव मुरली,
प्रथम लेखन ऑगस्ट १९११