माधव जूलियन - खरा शूर
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
[ओवी]
कुळवन्ताची हो पोर
शोभे शुक्लेन्दूची कोर !
चाले पहात समोर
शाळेला ती. १
अहो भर रस्त्यामाजी
बोले धटिङगण गाजी,
“मारू पाखरूं पहा जी
नवलाचें !’ २
घाली औडी तो दाण्डगा,
धरी शेळीला लाण्डगा,
लोक गोळा झाले बघा,
मौजबघे. ३
होऐ बाला ती बेशुद्ध
लोक औभे हतबुद्ध !
- मेल्या आईचें का दूध
प्याले होते ? ४
दूध वाघिणीचें प्याले,
तरी शेळपट झाले ?
मोठया व्यवस्थेने चाले
स्वत्वरक्षा ! ५
तिची धोक्यामध्ये अव्रु
ऐकाचीही चढे न भ्रु
औभे सुसंस्कृत गुव्रु
वेषवीर. ६
तों ये लङगोठया अडाणी,
अशिक्षित कोणी प्राणी
परी डोळ्यांमध्ये पाणी
पौरुषाचें. ७
अङर्गीं तारुण्याचा जोम,
प्याला सन्तापाचा सोम,
दीन शान्ततेचा होम
केला झणी - ८
येतां निर्वाणींचा क्षण
पाही परिणाम कोण ?
विसरावें देहभान
हाच धर्म. ९
गेला कापून कल्पान्त
हाणी छातीवर लाथ
घाली नरडीला हात
त्या पशूच्या. १०
स्त्रीची रक्षायाला लाज
पुढे त्वेषाने ये आज
नरीं तोच नरराज,
धन्य तोच. ११
औडी सङकटीं घेऐल
ठोसे खाऐल देऐल
वेळीं कामास येऐल
तोच धन्य ! १२
आले कायद्याचे दूत,
आला औद्नारांना औत,
कोणी म्हणे, “खरा पूत
माय व्याली.” १३
पडे पुण्ड गतप्राण,
मुक्तिदाता बन्दीवान !
नरहत्या न लहान
गुन्हा जाणा. १४
म्हणा पुरुषाला पुण्ड,
करा कैद किंवा दण्ड,
परी तुम्ही सारे षण्ढ
वीर तोच. १५
आता बालेला त्या टाका,
धर्म सनातन राखा !
काय धर्माची पताका
फडके वा ! १६
जा व्हा दुबळ्यांचे काळ
घोटा गुण्डांपुढे लाळ
कां न नरकाचा जाळ
जाळी तुम्हां ? १७
नाही अङ्गामध्ये राम,
रामासाठी कां सङग्राम ?
“राम बोला भाऐ राम !
राम गेला !” १८
ता. २० ऑगस्ट १९२६
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP