माधव जूलियन - चन्द्रिका आणि प्रिया
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
[वृत्त वियोगिनी]
किति निर्मळ रम्य चन्द्रिका
तनुची कान्ति तुझ्या जशी गडे !
पडती बघ तारका फिक्या
रमणी अन्य जशा तुझ्या पुढे.
झुळुका मधु मन्द वाहती,
परि झाडी दिसते पहा स्थिर,
दिसशी सृदु भावनांप्रती
दडवूनी जशि शान्त बाहिर.
निशिन्ध विकास पावती
गुण जैसे तव मोहकद्युती.
मधुगन्धतरङग भावती
विरहीं गोड जशा तुझ्या स्मृती.
किति शान्त शशिप्रभा अगे
शुचि आशा तव जेवि मानसीं !
रजनी रमणीयताच घे !
तव चित्तामधि काळजी जशी.
सखये. विधु आणि कैरवी
न कधी दूर, परन्तु आपण
जर सन्निध मुग्ध शैशवीं
तर आताच वियुक्त कां पण ?
ता. १९ जून १९२७
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP