मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|
रसिकास

माधव जूलियन - रसिकास

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


[जाति मुद्रिका]

हें साधें भोळें गीत आवडे तुला.
सङकोच, भीति कां येथे ?
घे पुरवुनि त्व हेतुला. १

ये आंतु, बैसुनी जवळ हृदय कर खुलें,
नच औपचाराची बाधा,
सर्व हें समज आपुलें. २

ही गडया, न माझी मुळी काव्यसम्पदा,
ही कृपा गूढ शक्तीची,
म्हण तीस “धन्य शारदा !” ३

सहकम्प पावतां हृदय तुझें पारखी
मज जोड पावली सारी,
देणगी न यासारखी. ४

अनुभूति, कल्पना क्षणिक तरल वायवी,
गुङ्गवून तिजला नादीं
अडकवून ठेवी कवी. ५

शब्दाच्या अवगुण्ठ्नीं हसे सुन्दरी
हो तिचीच बघ पडछाया,
जी वसे तुझ्या अन्तरीं. ६

म्हणुनीच ऐकशी गीत गुङग होऔनी,
ठेविशी औलट करुनी तू
मज तुझाच रसिका, ऋणी. ७

हें तन्मयतेचें मौन असें वोलतां
सुतिशब्द कशाला वाया
हृदयास हृदय बोलतां ? ८

माजला स्तुतीचा तरी क्षणिक गल्बला !
कीर्तिचा स्वर्ग कोणाला
रे मेल्याविण लाभला ? ९

मी माझ्यास्तव गायनें जरी गुम्फिलीं
भेटतां रसिक तुजासा
स्नेहाळ तुला वाहिलीं. १०

ता. २६ सष्टेम्बर १९२४

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP