माधव जूलियन - श्याम रजनी
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
[वृत्त वियोगिनी]
सखये, रजनी तुझ्यापरी
दिसते श्यामल आणि सुन्दर;
किति ही सुखशान्त रागिणी !
परि तू - हाय कितीक अन्तर ! १
करिती गगनांत तारका
नयनांचा तव मूक मत्सर;
दुरुनी मज या खुणाविती,
परि कोडेंच तुझ्या मुखावर. २
मिणमीण करी दुरी दिवा,
मज तो फक्त दिशाच दाखवी,
न ऊजेड कुठे पडे पथीं,
भवती किर्र करी घनाटवी. ३
निजलीं तरुकोटरांमधे
अथवा चञ्चल डाहळीवरी,
अपुल्या घरटयांत पाखरें -
मज ऐकासच जाग ही वरी. ४
विसरूनि दिनास लोटल्या
गवती टोळ ऊथेच झोपतो,
ऊतका जरि नीच हा किडा,
मजहूनीहि सुखी निकोप तो. ५
निजली असशील तू प्रिये,
मृदु शय्येवरा आपुल्या गृहीं,
कुठलें तुज शीत त्या स्थलीं ?
कुठली गे मनिं काळजी, दुही ? ६
परि मी फिरतों भिरीभिरी,
मज दे सङगत रात्रिकीटक;
फुलबाग दुरी फुले, फुलो;
सलतो सन्तत येथ कण्टक. ७
ता. २० सप्टेम्बर १९१३
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP