माधव जूलियन - सङगमोत्सुक डोह
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
[छन्द परिलीना]
ऐकत्र गुम्फून जीवित - धागे
प्रीतीचें नर्तन नाचलों मागे
ऐकटा औभा मी तेथे
भोबती शोधीं प्रियेतें;
न दिसे कोठे; का सोडून गेली ?
लोपते का कधी प्रीति औदेली ! १
द्दष्टीस पदे हें भयाण मात्र
रेताड कोरडें औथळ पात्र !
प्रिया न जर सङगतीं
तर हो कुण्ठित गति.
प्रीति या हृदयीं अथाङग खोल
तुडुम्ब भरली परन्तु फोल. २
कोणी ये, हिणवी, “भावना मेली
हासेना बोलेना करीना केलि !”
खटयाळ वादळी वारा
दौडत येतां भरारा
औठती चञ्चल बाहय तरङग,
अन्तरीं जडता न पावे भङग. ३
जीवनज्योत न माझिया गेहीं
म्हणून हें कृष्ण वसन देहीं;
ऐकही कौमुदी हासे.
ढगांत खिन्नच भासे.
स्तिमित नजर लाविती तारा,
मावळे औत्साह नाचाचा सारा. ४
खाअऊन रवीचा प्रखर ताप,
कष्टून, लागून जीवास धाप,
प्रदोषसमयीं येती
क्षणैक विसावा घेती,
घरास वळती माणसें गुरें;
अन माझें अन्तर नि:शब्द झुरे. ५
अम्बरीं ऐन्द्राची दुन्दुभि वाजे,
भीषण सुवर्ण - सुन्दरी साजे,
मेघांत हासत खेळे,
लवत नाचे ते वेळे
देवांचा भरून येअऊन अऊर,
सहस्रनयनीं ओसण्डे पूर ! ६
नाचेल मयूर अवनीतलीं,
मण्डूक ते द्विज गातील जलीं,
होअऊन धुन्द त्या क्षणीं
धावून प्रिय साजणी
देशील ना मज कसून खेंव ?
बान्धितील वर तोरण देव. ७
म्हणत मङगल जङगलगान,
कडयाहून खाली लोटून प्राण,
होअऊन काषायरङग,
सङगांत पूर्ण निस्सङग,
पावूं गे समाधिसागरीं अन्त !
- अजून सम्पेना वैशाख हन्त ! ८
ता. ११ ऑक्टोबर १९२४
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP