मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|
मुलाचा प्रश्न

माधव जूलियन - मुलाचा प्रश्न

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


[जाति शुद्धव]

“बघ बाळ, चन्द्र वर येऊ
रात्रिचा सोनुला खासा -”
तों “कुठून मी मग आऊ ?”
बोलली बाल - जिज्ञासा.

अंगणीं लाडका खेळे
आऊचें बोट धरूनी,
दुडदुडा कोकरावाणी
बागडे मधूनि - मधूनी;
पाहूनि मुखींचीं मोत्यें
हो चान्दण्यांस आनन्द,
बोबडे बोल लाडिक ते
झेलितो गन्धवह मन्द
सौवर्ण चन्द्र ये गगनीं,
हो तेणें प्रमुदित रजनी,
परि खोचुनि शिशुच्या प्रश्नीं
घे माय ऊचलुनी, चुम्बी
त्या बालरूप ऊल्हासा. १
त्या ग्रीष्मसरित्कृश तनुला
शरपाण्डुर पातळ शोभे
आजान पदर जरकाठी
फेनवत बघुनि विधु लोभे,
ती सैल गाठ केसांची
मानेवर गोर्‍या लोळे,
अन विषण्ण वात्सल्याने
येतात भरुनि ते डोळे,
त्या सुन्दर भव्य कपाळीं
नच सौभाग्याची लाली -
अवकाळा गृहीं जंव आली
त्या निशीं कुणी आंतुनि दे
हृदयाला मूक दिलासा, २

“साङग ना, साङग ना आऊ !"
जिज्ञासा आतुर झाली,
ती पोरमाय गोन्धळली,
जाहला जीव वरखाली,
कापशी ढगीं विधु धावे
त्याकडे द्दष्टि वर जाऊ,
तों बाळ अधीर म्हणेकी
“का तेथुनि आलों आऊ ?
चल बोलव त्याला पाहूं,
नाही तर आपण आऊं,
चांदण्यांशि खेळत राहूं !"
तो वरच बघे, ही सोडी
थाम्बूनी लाम्ब ऊसासा ३

“चल बाळ जाऊं झोपाया,
निजण्याची झाली वेळ,
चान्दण्यांसङगती खेळूं
सारेच कधी तरि खेळ.”
ऐकूनि बाळ झणि जाऊ
सोडूनि शान्त फुलबाग
माडीवर शयनमहालीं
आऊच्या मागोमाग.
तो पुढ्यात बिलगुनि पडला,
झोपेंत तत्क्षणीं गढला;
मातृजीव बन्धीं अडला;
परि बसुनी स्वप्नविमानीं ४

ता. ८ फेब्रुवारी १९१४

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP