माधव जूलियन - वादळाची रात
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
[ओवी]
होती वादळाची रात
अवसेच्या अन्धारांत
वाट कोणाची पहात
बाला औभी ? १
होऐ विद्युल्लता वर,
खाली बेगम सुन्दर,
दिसे तिच्या मुखावर
काय भाव ?
यायचा का प्रेमी वीर
कोणी तरुण अमीर ?
दिसे भेटाया अधीर
कोणाला ही ? ३
परी लागतां चाहूल
फिकें पडावें कां फूल ?
हेरी कोणाचें पाऊल
कानोश्याने ? ४
वीर येतां तो जवळी
दोघें मिळालीं कवळीं
अबला ही आणि बळी
झुन्जार तो ? ५
ओसरतां प्रेमपूर
होतीं दोघें पुन्हा दूर
माजे कोणतें काहूर
त्याच्या चित्तीं ? ६
चर्या जाहली भेसूर
जरी भरूनि ये और,
निघे निश्चयी निष्ठुर
स्वर त्याचा. ७
“खाल्ली आऐबापें खन्त,
झाला अपमानें अन्त,
अन तू शृङगारीं जिवन्त
ताऐ केवी ? ८
तूज पळवूनि आणी
- कुळाची ती मानहानि ! -
अन त्या चोराची तू राणी.
सौभाग्य हें ? ९
ज्याने धर्म औच्छेदावा.
ज्याचा घराण्याशी दाबा,
त्याच्या प्रेमाचा पुरावा
तू करावा ? १०
नको सप्तसहस्री ती !
माझी मन्सवीं का प्रीती ?
नच स्वीकारी खत्री ती
दासदीक्षा. ११
कुळ प्रेमाहून थोर
देश कुळाहून थोर
धर्म देशाहून थोर
केव्हाही गे ! १२
आऐबापें गेलीं जेथ
वैरी धाडिला मी तेथ
आता तू मी समवेत
जाऊं वर.” १३
घोर कर्माची ती वेळ
खत्री हत्यारी हटेल
रणीं काटील कटेल
जोहरी तो. १४
ती घे आवळूनि दात
जातां कठयार औरांत !
त्याचा न चुकेच हात
निजवक्षीं. १५
प्रेतें ऐक झालीं तळीं,
होती जगती निजली,
वरी ओरडे बिजली
मेघ रडे ! १६
ता. १२ सष्टेम्बर १९२६
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP