माधव जूलियन - आत्म निवेदन

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


आत्म निवेदन
[जाति साकी]

सखें, बरें जर नसती झाली ओळख अपुली दाट,
नसती भरली मग काटयांनी संसाराची वाट,
प्रेम तुझ्यावरचें हें माझें मधुरच नित्य रहातें.
अजुनिहि आहे, परंतु झालें कटुतम सत्वर हा ! तें.
दूर राहुनी नकळत तुजला तुझीच करितांसेवा
भाग्याच तो कुणिहि निघेना ? मला न शिवता हेवा.
मला कल्पनास्वर्गांतिल तू तिलोत्तमा गमतीस,
कधी न शिवती हीन भावना पार्थिव दुर्दम जीस.
स्मित आधी, मग खुलें बोलणें, नन्तर तें हितगूज,
मागुनि आठी, तुटक बोलणें, मौन रुचे नित तूज.
आण घेतली तू, मीं केलें अभिनन्दन कवनांही’
आज साङगशी “कीव वाटली, प्रीति कधी लव नाही.”
भलें जाहलें आत्मनिवेदन ! - दिव्यच मम भक्तीचें !
कशास घालूं ओझें तुजवर नवीन विज्ञप्तीचें ?
प्रीतिपरीक्षा नको, कीव तव नको, नको भिक्षाही !
प्रेमापायी पुरे मिळाली जन्मठेप शिक्षा ही.
जीवित म्हणजे स्वप्न मनोहर, विलसित विश्वासाचें !
नको प्रबोधन असलें नीरस सन्तत नि:श्वासाचें !

ता. ११ मे १९१३

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:50:28.2630000