पद - बोल भवानी
श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.
( चाल : नियम पाळावे. )
बोल भवानी जय जगदंबा । ही माहुरगडची अंबा ॥धृ०॥
मूळपीठ कोरि भूमिका । तेथें नांदे देवि रेणुका
लावण्यरत्नचंद्रिका । ही मूळ सृष्टिची रंभा ॥ ही माहुर० ॥१॥
सदा प्रसन्न मुख विराजे ! वंदिती देव ऋषि राजे
भक्तांच्या धांवे जी काजें । क्षणहि न लावि विलंबा ॥ ही माहुर० ॥२॥
निळवर्ण वेणी भुजंग । नेत्राला भुलती कुरंग
खुले दंतपंक्तिचा रंग । लाजवी पक्व डाळिंबा ॥ ही माहुर० ॥३॥
म्हैषासुर मारिला ठार । उतरिला भूमिचा भार
सहस्त्रार्जुन केला ठार । निवटिलें शुंभ - निशुंभा ॥ ही माहुर० ॥४॥
जरि कृपा करिल ही माय । तरि दुस्तर भवनिधि काय ?
म्हणे विष्णुदास तिचे पाय । अखंड चित्तीं अवलंबा ॥ ही माहुर० ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP