पद - अबोला
श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.
किति धरसिल तरि अबोला ग ।
बाई, तुझा स्वभाव नाहीं हा भला ॥धृ०॥
श्रीमूळपीठनायके । कैवल्यसुखदायके
माझी विनंती आयके ।
तूं बाप, माउली, गुरु । मी लेंकरुं । नको दुर करुं ।
तुझा पुराणीं बहु गलबला ग ॥ बाई० ॥१॥
मला जन्ममरण लाविलें । त्वां दारोदारि फिरविलें ।
नाहीं क्षणभर सुख दाविलें ।
अतां प्रसादफळ दे करीं । करुणा करीं । बोल झडकरीं ।
मीं देह तुला विकला ग ॥ बाई० ॥२॥
मजविषयीं विश्वंभरे । मुखिं धरले मुग - हरभरे ।
तरि वाटति हरिहर बरे ।
बोलती उघड । तारिती दगड । देति फळ रगड ।
तूं देसि न कण - टरफला ग ॥ बाई० ॥३॥
माय, ठेवुं नको राग पोटांत । तुझ्या अमृतरस ओठांत ।
कळसूत्र कळा बोटांत ।
धरुं नको ओढ । अबोला सोड । बोल मसि गोड ।
फोड मोत्याचा जोड शिंपला ॥ बाई० ॥४॥
मी अनाथ दिन दुर्बळ । दिनदयाळ तूं केवळ ।
तुला येउं दे माझी कळवळ ।
बुडतों डोहांत । चाललों वहात । काढ, दे हात ।
तुझ्या वंदितों मी पाउला ॥ बाई० ॥५॥
मी असुनी नर अधम । जगिं केलेंस पुरुषोत्तम ।
म्हणे विष्णुदास उत्तम ।
रेणुके माय । दाखवी पाय । पहासी काय ।
पुढें कथा भाग संपला ग ॥ बाई० ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP