( लावणीची चाल : साजन् नये मंदिरी )
श्रीमूळपीठनायके, माय रेणुके, अंबाबाई
नको माझि उपेक्षा करुं; पाव लवलाही ॥धृ०॥
जय दुर्गे, नारायणी, विश्वस्वामिनी, सगुणरुपखाणी
जय मंगलवरदायिनी, सर्वकल्याणी
जय महिषासुरमर्दिनी, राजनंदिनी, पंकजपाणी
हे भार्गवजननी मला पाव निर्वाणीं
जय प्रसन्नमुख त्रिंबके, जगदंबिके, प्रसन्न तूं होई
नको माझि उपेक्षा करुं, पाव लवलाही ॥१॥
कल्पना फिरवि गरगर, समूळची घर, बुडवायाची
ही दुर्लभ नरतनु अतां जाति वायांची
शिर झालें पांढरें फटक, लागली चटक, अधिक विषयाची
कशि होइल मजला भेट तुझ्या पायाची
ये धांवत तरि तांतडी, घालि तूं उडी, पाहसी काई
नको माझि उपेक्षा करुं; पाव लवलाही ॥२॥
तुजवांचुन मज दूसरा, नसे आसरा, जगीं जगदंबे
तूं भवानि, मजवर कृपा करी अविलंबे
सोन्याचा उगवी दिवस, करितों नवस, सकळारंभे
मी भरिन ओटि नारळीं, केळिं, डाळिंबें
मी अनाथ दीन केवळ, माझि कळकळ, येउं दे कांहीं
नको माझि उपेक्षा करुं; पाव लवलाही ॥३॥
मी थोर पतित पातकी, माझी ईतुकी, अर्जि ऐकावी
एकदां कसेंही करुन भेट मज द्यावी
तूं देणार नाहिंस हाणुन, आलों मी म्हणुन, तुझ्या या गांवीं
म्हणे विष्णुदास ही कीर्ति जगामधें गावी
धिर नाहिं अतां पळघडी, म्हणुन येवढी, सुटली घाई
नको माझि उपेक्षा करुं; पाव लवलाही ॥४॥