पद - कधीं भेटशिल
श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.
( चाल : सुनोजी साई वचन हमारा. )
कधीं भेटशिल आई जगदंबे, खचित सांग तूं मला मला
जोंवर आहेत प्राण कुडिमधें तोंवर पाहुं दे तुला तुला ॥धृ०॥
मोठिच पोटीं आस तुझें रुप डोळे भरुन पहावया बया
जन्मचि सारा गेला अशामधें, आलि दशा जुनि वया वया
परंतु नाहीं आलि दिनाची तुझ्या मनामधें दया दया
निबर तरि तुझें काळिज केवढें धन्य धन्य अग बया बया
गोड वाटतो तुझा तुला परि स्वभाव नाहिं हा भला भला ॥१॥
राज्य कठिण हें आलें कलीचें वर्तमान भलें नव्हे नव्हे
प्रजा - वृत्ति - धन हरण कराया निघति कायदे नवे नवे
घरोघरीं अंधार परंतू रस्तोरस्तीं दिवे दिवे
दया, धर्महि न; माय लेंकरा उठे माराया जिवें जिवें
काय उफराटें कर्म म्हणावें कसे कांटे आले फुला फुला ॥२॥
तूं आदिमाये, ही या कलिच्या, आधीन झालिस यदा यदा
तव आज्ञेचि ठेविनि वागती, विधि - हरिहर मर्यादा यदा
कामधेनुची लेक घरोघरीं, ताक मागे ओखदा खदा
व्यास वाल्मिकादीक मुनीजन, पाहुन हंसतील खदा खदा
दिन जननीचें निरक्षुनी ब्रिद, लक्ष्मी आपुल्या मुला मुला ॥३॥
नाहिं भरवंसा घालिल फांसा, काळ गळ्यामधें केव्हां केव्हां
काय कौतुक मग पहाशिल आमुचें, जगज्जननी तूं तेव्हां तेव्हां
कळेल तसें पुढें करी परंतु, दे दर्शन मज येव्हां येव्हां
थोर तुझा उपकार आठविन, जन्मा येईन जेव्हां जेव्हां
यास्तव एवढी ऐक विनंति, पूर्ण करी हेतुला तुला ॥४॥
कामक्रोध दिर दुर्ध्र मेले प्रपंचवनिं हांकिती किती
खचित प्राण घ्यावया पहाती; ताप सांगुं हा किती किती
अहंकार सासराहि सासू विकल्पना कोपती अती
परंतु कांहीं बोलत नाहीं निसंग माझा पती पती
तुजकडे पहातें उगिच रहातें बाळगुनी अब्रुला ब्रुला ॥५॥
सत्वर आतां ने मज माहेरिं ठेवुं नको सासरीं तरी
दे साडी मज जुनीपुराणी, नको सोन्याची सरी सरी
जळो दुसर्यांचे हार पितांबर, आईची येई ना सरी सरी
जवळ बसूनी गोड बोल मशि, नको दमडि ना सरी परी
विष्णुदास म्हणे आइ रेणुके, तुझ्या नमितों पाउला उला ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP