मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्री विष्णुदासांची कविता|भूपाळी आणि पदे|
रेणुके काय बाई

पद - रेणुके काय बाई

श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.


( चाल - वस्त्रानें देह सारा० )
रेणुके काय बाई । तरि तुजला वाटतें ।
आइ तुझिया वियोगानें, उर माझें फाटतें ॥
चिंतेनें रक्त सारें, शरिराचें आटतें ।
दुःखाचे दिवस मोठ्या, धैर्यानें लोटते ॥ रेणुके० १॥
वर्षें हीं दोन झालीं, वर महिने अकरा ।
तरि अझुनी भेट नाहीं, आईची लेंकरा ॥
जगिं जगणें व्यर्थ वाटे, हरहर हे शंकरा ।
धिक्‍ धिक्‍ या जिवित्वासी, मन अगदीं वीटतें ॥ रेणुके० २॥
करिताती जाच भारी, मज सासू सासरा ।
निजपतिचा पहा नाहीं, तिळभरही आसरा ॥
तरि मरणें विहित आतां, नसे मार्ग दूसरा ।
पहा प्राणोत्क्रमण कंठीं, येउनियां दाटतें ॥ रेणुके० ३॥
मद्वेषभावनेचा, पिळ नाहीं उकलिला ।
आइ, अझुनी कर्कशेची, दाविसि कां ठकलिला ॥
कडेलोट करुनि माझा, देह नाहीं ढकलिला ।
सत्कीर्ति तुझी ऐसी, गातिल कीं भाट ते ॥ रेणुके० ४॥
जगदंबे ! जगन्नाथे ! निर्दयता बस्‍ करी ।
निर्वाणी निकराची, पुरे झाली मस्करी ॥
तनुतुनिया प्राण माझा, जाइल कीं भस्करी ।
सहजचिया किरकिरीचें, मग मुळची खुंटतें ॥ रेणुके० ५॥
किति पाहसी दोष वाया, पाऊला पाउलीं ।
स्वयें जगतीं नाचवीसी, भाऊला भाउली ॥
तरि नससी काय विष्णूदासाची माउली ।
समजुन घे आपुलेचि, जणुं दंत ओष्ट ते ॥ रेणुके० ६॥


References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP