मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्री विष्णुदासांची कविता|भूपाळी आणि पदे|
कटाव रेणुकेचा

पद - कटाव रेणुकेचा

श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.


ये ग ये ग ये ग जगदंबे ॥धृ०॥
जय जय रेणूराजकुमारे । आई रेणुके अति सकुमारे ।
जगज्जननी जय जगदोद्धारे । कृष्णामलिक ग्राम विहारे ।
त्रिपुरसुंदरे त्रितापहारे । अमृतकरवर अजर - आमरे ।
आनंदघन कैवल्य मंदिरे । ठाकिति सनकादिक सामोरे ।
वंदिति पदमुनि - जन संभारे । सुरगण वारिति शिरीं चामरें ।
राबति ऋद्धि सिद्धि आदरें । तुझीं विचित्रचि गूण चरित्रें ।
त्रिभुवन पावन परम पवित्रें । नाचविसी जगताचीं चित्रें ।
करीं अविलंबुनि आपल्या सूत्रें । स्वयें स्वतंत्रें इच्छामात्रें ।
कोमलगात्रे ! पंकजनेत्रे ! सकळारंभे ! अनुपमरुप स्वयंभे ॥
ये ग ये ग ये ग जगदंबे ॥१॥
मुळपिठ मृगराजाचल शिखरीं । सदा विराजे त्रिभुवन मुखरीं ।
ब्रह्मी माहेश्वरीशंकरी । श्रीनारायणी सदयाभ्यंकरी ।
दशशत फणिच्या द्विगुणवैखरी । सत्कीर्तीच्या वाचिति बखरी ।
तुझी चराचरीं सत्ता अखरीं । क्रीडति एके स्थळीं वृक बकरी ।
करी दुराशा डुरडुर डुकरी । विकल्पनेच्या पडुन लष्करीं ।
बहुत जाहली जगीं मस्करी । नको नको ही फजिति बसकरी ।
जगदंबे ! करुणाकर लवकरी । असुर विटंबे ।
अनुपम रुप स्वयंभे ॥ ये ग ये ग ये ग जगदंबे ॥२॥
ब्रह्मानंदे चित्सुखसदने, प्रसन्न हो, मज प्रसन्नवदने ।
प्रसाद फळ दे, राजनंदने । कल्पलतिके कल्याणवर्धने ।
दुर्जय महिषासूरमर्दने । खळ मधु - कैटभ घोरकंदने ।
तुज चिंतावें स्वयें मधुसुदनें । तव पदपंकज - रेणु वंदनें ।
तुटती भवसंसार बंधनें । लाभे सुकृत सकलाराधनें ।
योगी भ्रमती वायुरोधनें । याज्ञिक जाळिति आज्य इंधनें ।
काय करावें अम्हीं निर्धनें । करुनि ध्रुवाच्या परी रुदनें ।
प्रार्थितसे तृण धरुन रदनें । सदानंदकर आनंद निधने ।
आई रेणुके, हे शुभवदने । विजय कदंबे । पाव मला
अविलंबे ॥ ये ग ये ग ये ग जगदंबे ॥३॥
तूं आदिमाये प्रणवरुपिणी । सकळगूणसंपन्न शिरोमणी ।
श्रीजमदग्नीची मनरमणी । सुरवर वर्णिति कुमार चिमणी ।
भक्तजनांची कुलस्वामिणी । अनंत ब्रह्मांडांची राणी ।
सुंदर लावण्याची खाणी । अखंड सौभाग्याचि शिराणी ।
वैदिक पंडित शास्त्रि पुराणी । करिती कीर्तन गाती गाणी ।
रणीं जिंकिला सहस्त्रपाणी । केलि सर्व निःक्षत्रिय धरणी ।
तूं तेजोमय प्रतापतरणी । प्रगटलीस भवसागर तरणी ।
शरणागत - जन - संकट - हरणी । येसी धांवुनि नामस्मरणीं ।
विष्णुदास शिर ठेऊनि चरणीं । म्हणे भेटिची लागली झुरणी ।
कधिं वरवाणी ऐकेन कर्णीं । ध्यान धरिन तव अंतः करणीं
अर्पिन अंबे । उतरीन सैंधव लिंबें ॥ ये ग ये ग ये ग जगदंबे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP