माहुरगड - वासिनी आउबाइ ! गोंधळा येई हो
कोल्हापुर - वासिनी रमाबाइ ! गोंधळा येई गोंधळा हो
तुळजापुर - वासिनी तुकाबाइ ! गोंधळा येई हो
पंढरपुर - वासिनी विठाबाइ ! गोंधळा येई हो
सहपरिवारें रंगमंडपांगणिं सादर होई
नवस तुझा हा तूंचि आपुला फेडुनिया घेई
हेची वारंवार विनंती शिर ठेवुनि पायीं ॥धृ०॥
पुराण, कीर्तन, श्रवण, उपोषण, जाग्रण, तुजकारणें
अनंत जन्माचें घडलें अजि पुण्याचें पारणें
दुर्बळ दिनदुबळ्याचि दिवाळी ही अंगिकारणें
कृष्णामलिकग्रामिं फडकती विजयध्वजतोरणें
तुझ्या गृहीं जरि बहु चिंतामणि सुरतरु सुरगायी ॥ माहुर० ॥१॥
माणिक - चौकीं पडदे चिकाचे चौफेरीं सोडिले
रत्नखचित षोडशदळमंडित स्वस्तिक पिठ मांडिलें
मोत्यांच्या रांगोळ्यावरि बुट रंगांचे काढिले
कनकताटिं पंचामृत षड्रस - पक्कान्नहि वाढिलें
सुगंध, तैलांबर, कर्पूंर, धुप, दिप, ठाईंठाईं ॥ माहुर० ॥२॥
सकळहि सुरवर नरवर आले सिंहाद्रीं पर्वतीं
ऋद्धि - सिद्धी सिद्ध ऋषीगण गणपति - सरस्वती
ब्रह्मदेव - सावित्री, विष्णू - लक्ष्मी, शिव - पार्वती
कृष्णा, वेण्या, भिमा, सरस्वति, यमुना, भागीरथी,
लीपामुद्रा अरुंधति सती राही रुखुमाई ॥ माहुर० ॥३॥
आनंदीचा सदा आनंदें मांडिला गोंधळ
नारद, तुंबर, गाति, नाचती सुर - रंभा - मंडळ
सुगंध, केशर, गुलाल, कुंकुम, पुष्पांचा परिमळ
वाजति तुंबळ दशविध वाद्यें अनुहतध्वनि - संबळ
विष्णुदास म्हणे उदय रेणुके, दीनांचे आई ॥ माहुर० ॥४॥