मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्री विष्णुदासांची कविता|भूपाळी आणि पदे|
ओव्या दळणाच्या

ओव्या दळणाच्या

श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.


आदिनमन गणपतिला । गणासहित सरस्वतिला ।
शुभ मंगळाऽरंभ केला । ओवी गाईन रेणुकेला ॥धृ०॥
सदा प्रसन्न रुप गोमटी । जशि शिव्याच्या गंगा जटीं ।
तशि अखंड या मुळपिठीं । माय राहिलि दीनासाठीं ॥
श्रीमृगराजाचलपाठीं । शतसहस्त्र ऋषींच्या थाटीं ।
देव तिष्ठति तेतिस कोटी । माय राहिलि दीनासाठीं ॥
बहु खगमृगतरुंची दाटी । खडे कंटक वाटोवाटीं ।
एवढी सोसुन आटाआटी । माय राहिलि दीनासाठीं ॥
रुचि प्रेमाचि लाववि ओठीं । तुपसाखर, फेणी, ताटीं ।
करिं दुधाचि घेउन वाटी । माय राहिलि दीनासाठीं ॥
दीन जनांचि चिंता जिला । धिर क्षणभर पडे ना तिला ।
शुभ मंगळाऽरंभ केला ॥१॥
तुला होइल आई नजर । तुझा मुखचंद्र नादर ।
तुझें सगुण रुप सुंदर । शोभे पिवळा पीतांबर ॥धृ०॥
तूं चतुर गुणगंभीर । सडपातळ तुझि कंबर ।
तुझि अखंड भर उम्मर । शोभे पिवळा पीतांबर ॥
वर अर्पिसि अजरामर । तुला वंदिति मुनि सामर ।
शिरिं वारिती गण चामर । शोभे पिवळा पीतांबर ॥
तुझा अंकित विधिहरिहर । तुझ्या गळ्यांत उत्तम हार ।
तुला दागीने शत शंभर । शोभे पिवळा पीतांबर ॥
तुला पहातां मोह करपला । जड - देहभाव हरपला ।
शुभ मंगळाऽरंभ केला ॥२॥
कलिरायाचें हें नगर । याचें नांव कंटकपुर ।
महागांवांत सासर - घर । माझें माहेर मातापुर ॥धृ०॥
सदा भंडार घर भरपुर । सदा वाजतिं पदिं नूपुर ।
सदा सुगंध दीप कर्पूर । माझें माहेर मातापुर ॥
परदेशीं मी पडलें दुर । आड आले गड, डोंगर ।
बाणगंगेला आला पुर । माझें माहेर मातापुर ॥
काय तुझ्यांत नसे मगदुर । काय म्हणसि रहा दुर दुर ।
नको डोळ्यांत घालुं शेंदुर । माझें माहेर मातापुर ॥
खळ रावण वंगळ मेला । जशि जानकि नेलि लंकेला ।
शुभ मंगळाऽरंभ केला ॥३॥
किति मनासि या आवरुं । धिर अझून कुठवर धरुं ।
मी अनाथ दिन लेंकरुं । नको माझि उपेक्षा करुं ॥धृ०॥
नको उगि मजवर गुरगुरुं । तूं बाप, माउली, गुरु ।
मी अनाथ दिन लेंकरुं । नको माझि उपेक्षा करुं ॥
माझी रक्षण कर आबरु । नको प्राणसखे घाबरुं ।
मी अनाथ दिन लेंकरुं । नको माझि उपेक्षा करुं ॥
धनदौलत नलगे मला । डोळे भरुन पाहुं दे तुला ।
शुभ मंगळाऽरंभ केला ॥४॥
अतां पहातिस ग काई । उडी घाल, ये लवलाही ।
दिनदयाळे माझे आई । ब्रिद संभाळ अपुलें बाई ॥धृ०॥
तूं विटेवरची विठाई । मुळपिठाची तूं पिठाई ॥
दिनदयाळे माझे आई । ब्रिद संभाळ अपुलें बाई ॥
विष्णुदास लागे पायीं । करिं करुणा अंबाबाई ।
दिनदयाळे माझे आई । ब्रिद संभाळ अपुलें बाई ॥
येसि धांवुन एक हांकेला । असा महिमा बहु ऐकिला ।
शुभ मंगळाऽरंभ केला ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP