तुला माझी आठवण कशानं यावी
मला तुझी भेट गडे कशानं व्हावी ॥धृ०॥
तुला नथ, फुलबाळ्या, बुगड्यांची जोडी
माझ्या नाकामधें बाई ! गवताची काडी
तुला लाल शालजोडी, पिवळी साडी
मला काळी चोळी, जुनी लुगड्याची घडी
तुला छान रंगित भिंगाची माडी
माझ्या घरीं ऊन, वायु, पावसाची झडी
तुला तूपसाखर खाण्याची गोडी
मला तेल, मिठ, पिठ, चिंचेची कढी
तुला केशराची उटी मिठाई नवी ॥ मला० ॥१॥
तुझ्या पुढें उभे देव तेतीस कोटी
माझ्या बाई ! सटवाइ लागली पाठीं
जगताची राणी तूं खरीच मोठी
मी दीन, दुर्बळ, जन्माची खोटी
तूं आइ, गंगे, क्षमेची कोटी
मी बाइ, अवगुणि कोट्यानकोटी
लेकिची ममता धरुनि पोटीं
आइ मजला घे, पसर ओटी
अशीच समजुन समज घ्यावी ॥ मला० ॥२॥
तुझ्या घरिं हत्ती, घोडे, बैल, म्हशी
माझ्या घरीं खटमल, उंदीर, घुशी
तुला गादी गिरदी, परांची उशी
मला काय, घोंगडिची नसावी दशी !
तुझ्या बहु भरलें कपट कुशीं
माझ्या काय फेडशिल मनाची खुषी
चतुर शाहणी तूं आई कशी
पराच्या चाहड्या ऐकशी कशी
लेंकराच्या काय माय पडली दावीं ? ॥ मला० ॥३॥
तुला काय देउं गुळ, फुटाणे, लाही
भिकारी नवरा करुं गत काई
वेडी मी जाहलें तुझ्याच पायीं
सोडिला संसार, दिली भरपाई
जन्माचि दय - दय अग आइ, आई
करशी किति तरि सांग बाइ, बाई
हो उन गेलें मी दिन गाइ गाई
म्हणुन तुजकडे आलें घाइघाई
तुला मी जात्यावर गाईन ओवी ॥ मला० ॥४॥
शिंदळ सासु माझी, सासरा पाजी
निः संग नवरा उगाच गांजी
तूं माय, मावशी, बहिण, आजी
किति तरि करुं मी हांजी हांजी
प्रीतिची भाकर, मेथिची भाजी
गोड करिं, प्रीतिच्या रीतीनं माझी
तुजविण नसे मज आवड दुजी
खरेंच रेणुके ! शपथ तुझी
विष्णुदास म्हणे प्रचीती पहावी ॥ मला० ॥५॥