पद - जगदंबे
श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.
( चाल : उघड मागिले दाराची कढी )
जगदंबे, प्रार्थितों तुला ।
पाव तूं मला । तुझा अंबे लोलो लागला ॥धृ०॥
श्रीसकळगुणालंकरणिके
माय रेणुके । लावण्यरत्नमाणिके
दिन अनाथजनपालिके
राजबालिके । रुचिकात्मजकंठमालिके
अजरामरवरदायके
विश्वपालके । माझि विनंति तूं आयके
( चाल ) तूं सकलांतरव्यापिनी
चैतन्यघनरुपिणी
उघडुनी नेत्र - पापणी
पहा दुर्बल द्वारीं आला । बहुत भागला ॥ तुझा० ॥१॥
जरिपटकि साडि खडखडी
कंचुकिवर खडी । शिरिं केतक, मुदराखडी
अंगावर शालुची घडी
गोठ, बांगडी । शोभे दुल्लड बाळी - बुगडी
वांकिची मुरड वांकडी
कडीवर कडी । सगुणरुप प्रणवाची तुकडी
( चाल ) भुजंग वेणिचा पिळा
लाल कपाळिं कुंकुमटिळा
स्वर मंजुळ बोले कोकिळा
पाहतां देहभाव रोधला । प्राण वेधला ॥ तुझा० ॥२॥
तूं जाणसि ह्रदय ह्रदय
सदय सदय । जय भवानि उदय उदय
जन्माची दय दय
गेलें वय वय । किति म्हणसि दुर होय होय
मी पतित जरी निश्चय
आहे तरी सय । तूं पावन निःसंशय
( चाल ) कां विसर वृथा
मज तारणें पडे सर्वथा
पहा शोधुन मागल्या कथा
सहस्त्रार्जुन जरि मारिला तरि तारिला ॥ तुझा० ॥३॥
कशि करशिल माझी गती
जननि सांग ती । करुन भक्तीची माहिती
x x x
धरुनियां हातीं । तुला आहे कुणाची भिती
तव सत्ते तरु डोलती
वेद बोलती । दिन रजनि - पती चालती
( चाल ) म्हणे विष्णुदास शंकरे
करि अपुलें ब्रिद तूं खरें
रुचि सोडुं नये शर्करें
विषयीं जिव अपंगला । भजनिं रंगला ॥ तुझा० ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP