मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्री विष्णुदासांची कविता|भूपाळी आणि पदे|
काय कारण

पद - काय कारण

श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.


( चाल : क्या कलम खुदाने जिमारा )
काय कारण पुसा रेणुकेला
माझा त्याग कशास्तव केला ? ॥ध्रृ०॥
झाला वर्षाच्या वर एक महिना
तरि अझूनि सय कां हो येइ ना
अशि अगदींच नको करुं दैना
तुझ्याविण मला बाप - आई ना
दूर काननीं पडलों एकला ॥ माझा० ॥१॥
भला भार्गवराम प्रतापी
गळा आपुल्या जननीचा कापी
परि तैशाची केलीस माफी
माझे अन्याय लाविसी मापीं
कां रुसलीस या घटकेला ॥ माझा० ॥२॥
जन्मा घातलें हा अविचार
आतां जन्मदे, काय विचार
प्रेमें चालवी प्रेमप्रचार
तुझे वर्णिति गुण वेद चार
तुझ्या वंदितों मी पादुकेला ॥ माझा० ॥३॥
माझ्या पहाशिल अवगुणाला
उणें येईल जननीपणाला
दृढ बांधिलें ब्रीद कंकणाला
याची तरि मग लाज कुणाला
कां लाविसि मजसि भिकेला ॥ माझा० ॥४॥
निज चर्माचा सदाचरणांत
जोडा घालिन तुझ्या चरणांत
तुझ्या राहीन माय ऋणांत
सडा टाकिन मी अंगणांत
नित्य गुंफिन पद - मालिकेला ॥ माझा० ॥५॥
रत कामना काममदासी
जशि गुंतली माशी मधासी
काढि यांतुनि, आली उदासी
छाया कृपेची करी विष्णुदासीं
नमो नारायणी अंबिकेला ॥ माझा० ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP