मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर|
नांदगांव प्रगाणा जागा आजं...

मलकोजीबुवाचा पोवाडा - नांदगांव प्रगाणा जागा आजं...

पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो.


नांदगांव प्रगाणा जागा आजंती थोर ॥ साक्षात खाकीबोआ झाले मलकथा अवतार ॥धृ०॥
देवबा माळी बोवाला प्रसन्न झाले भगवान ॥ थोरथोर सांगता होते पाण्यावर आसन ॥ खाकीसाहेबाच प्रथम अडगांवी ठाणं ॥ मलकयानें गुरु केला आपुल्या खुषीनं ॥ सद्‍गुरुची कृपा त्याहीवर झाली संपूर्ण ॥ बगबगीचा जवळ छाया देवळावर ॥ पाठीमागें विहिर पाणी पेतो जनसारा ॥१॥

देवमाळी बोवानं मलकयाला लाविलं पिसं ॥ जना तोंडीं कन्न देइना बोलत भलतीसं ॥ मलकयाबोआला उपास घडले बहुत ॥ देवमाळी बोवाच्या कळलं होतं अंतरंगांत ॥ तेव्हा मलकयाचे तीर्थरुप गेले अडगांवांत ॥ म्हणे मी विनंती करतो देवा चला चला आजंतींत ॥ तेव्हा देवमाळी बावाला घेऊन आले आजंतींत । मग बसविलं पुंजीत मलकया आले शुद्धींत ॥ देवमाळी बावाने मलक्याशिरी ठेविला हात ॥ नांदगांव प्रगणा आजंती जागती ज्योत ॥ अवतरले खाकीया मलकया थोर झाले भक्त ॥२॥

गौराईनं नवस केला पुत्रु दे मजला ॥ आभरणाच्या सुद्धां काठीं वाहीन देवाला ॥ गोराईचा भाव देवाच्या पायरीले जडला ॥ गौराईच्या पोटीं लेक काशीराव जलमला ॥ तिन आभरणाच्या सुद्धां काठी वाहिली देवाला ॥ तेव्हा देवमाळी बाबांन काठी देल्ली मलकयाला ॥ काशीराम बाबा तेव्हां देवासी बोलला ॥ दशमीची यात्रा भरव शोभे जाग्याला ॥ बारशीच्या दिवशीं काठीं न्यावं अडगावाला ॥ काशीराव बाबानं नेमं यात्रेचा केला ॥३॥

फाल्गुनी दशमीची यात्रा भरते गुलजार ॥ बहु याचेमध्ये थाट मौजा करे कारंजकर ॥ आणुन फुलाचे गजरे उदबत्याची बहार ॥ घेऊन टाळ वीणा भक्तजन करे जैजैकार ॥ करण शिंग नवबत वाजे वाद्याचा गजर ॥ संध्याकाळची वेळ दाटी झाली आरत्याची ॥ वाजती नौबता आणखीन घाई नगार्‍याची ॥ अठरा कुम न्याती करून आरती बराबर ॥ चढीवती मलीदे तेथ नाही जुदाकार ॥ काठया भेटती तेव्हा महोच्छाव होतो राव थोर ॥ काय महिमा सांगु देवा खाकीसाहेब पीर ॥ साक्षांतरी दिसून आलं जसं पंढरपुर ॥४॥

महादजी बुवाला प्रसन्न मलकया झाले ॥ देव देऊनि शिरीं त्यास पुंजेसी बसवीले ॥ आंधळ्याला डोळे पाय दिले लंगडयाला ॥ काशीमध्यें होता ब्राह्मण कोड आंगी त्याला ॥ चिंता करे देवाची अन्‍ काशी गेली स्वप्नाला ॥ म्हणे वर्‍हाडामधी भक्त मलकया जातीचा महार ॥ त्याच उचीत खाशील ब्राह्मणा कोड होईल दूर ॥५॥

स्वप्नांत दृष्टांत ब्राह्मण चाले तेथून ॥ नांव मलकयाचा शोध मुलकाचा घेऊन ॥ उत्तम होता दिवस नगर दृष्टीन पाहून ॥ दोन्ही कर जोडून साष्टांग घाले प्रीतीने ॥ म्हणजे कोड करावा दूर अचरण करे कुलजन ॥ मी उचीताची आशा करून आलो ब्राह्मण ॥ तेव्हा मलकया ब्राह्मणासी बोले उत्तर ॥ कैसं उचीत देऊं ब्राह्मणा मी जातीचा महार ॥६॥

तेव्हां ब्राह्मण दिलगीर झाला आपले मनांत ॥ म्हणे येता जाता माझा संसार गेला वायार्थ ॥ दोन कर जोडून डोकस ठेवी चरणावरतं ॥ बस्तरवार दिवस यात्रा बसली समोर ॥ करून मग विचार बतासे घालुन तबकांत ॥ लाऊन मलकया हात बतासा टाकी मुखांत ॥ उराला प्रसाद दिला ब्राह्मणाच्या हातांत ॥ तेच उचीत घेतां ब्राह्मण हरीखला फार ॥ भक्षीले बत्तासे त्याचा कोड झाला दूर ॥ कल्प ठेविला अंतरी अन्‍ कोड राहिला तिळभरी ॥७॥

बस्तरवारी गजर होतो मलकया भक्त । दूरदूरची यात्रा येते उच्छाव मनांत ॥ वांझोटीला पुत्रु देल्ला पुरविला हेत ॥ शावकाराचं जहाज बुडालं होतं दरयांत ॥ त्या शावकारानं धावा केला आपल्या मनांत ॥ म्हणे धाव पाव मलकया दवलत बुडाली येथं ॥ थोडी नाही राश्येत नवा लाखाची दौलत ॥ खातो म्हणे हिरकणी प्राण नाही ठेवत ॥ त्या शावकाराचा धावा ऐकून पुरविला हात ॥ लावून मलकयांन हात जहाज तारविलं वरतं ॥ बसले पायरीवर अन्‍ बाही भिजली सत्वर ॥८॥

गेला शावकार आपल्या घरी ॥ केली नवसाची तयारी ॥ सत्रा कळस सोनेरी ॥ आला आजंतीं नगरी । कळस चढवले देवळावरी ॥ निंबाजीबोवा गंगाबया जी या दोहीच्या हात ॥ शिखरावरते कळस चढविले भली झाली मात ॥९॥

कोणाकोणाचे सांगूं देवा आजंतीवर ॥ नाव मलक्याच बहु मुलकामधी नईसर ॥ वराडामधी फकीर निघाला मलंगाचा भार ॥ ढेसकाया मेसकाया त्यान फोडून केल्या चूर ॥ टाकले हो ते देव्हारे भक्तानं घेतले डोंगर ॥ तो फिरतां फिरतां आला होता आजंतीवर ॥ होता जैजेकार बुवाचा उतरला गांवाबाहीर ॥ त्यानं डेरे दांडे दल्ले होते नेर वाटेवर ॥ शामजी चोपडया भेटिला गेला लवकर ॥ मागुन बुवा गेले होते आप करतार ॥ मुजरा करून उभे राहिले त्याहिच्या समोर ॥१०॥

मग हात मलकयाचा धरला ॥ नेउनि बिछोन्यावर बसविला ॥ एक मुंडासा काहाडीला ॥ शिरीं मलकयाच्या बांधीला ॥ काच अवघ्याचा निघाला ॥ मग दाना घोडयाला वाटला ॥ सिदा आटा अवघ्याला देल्ला ॥ जेऊन खाऊन अवघे झाले तिरपत ॥ पुढें फकिर मागें बोवा आले दरग्यांत ॥ पायरीपशी येऊन फकीर नमाज पढला ॥ पढली नमाज देवान भेट दिली त्याला ॥ मुक्यानं गिळतो साखर तेथे जरा कळेना अंत ॥ देव दिनाचा दयाळू केलं विखाचं अमृत ॥ फकीर दर्ग्याबाहीर आला हुकुम मलंगाला केला ॥ आनंदानं नाचूं लागले फार दनाना उठला ॥ एक रात्र मुकाम करून फकीर जातो लवकर ॥ शेले मणी कंठा बोवाच्या टाकला हातावर ॥११॥

साक्ष पहाता प्रचीत अठरा कुम जोडे कर ॥ साक्ष पहाता प्रचील अठरा कूम जोडे कर ॥ भक्तीला हाजर ब्राह्मण अणिक फकीर ॥ भांबीमधी कन्हुराज दुष्ट दुराचार ॥ कोण लाविती कळ जाऊन त्याच्या दरबारांत ॥ आजंतीमधिं महार मलकया देवाचा भक्त ॥ अन भरते मोठी यात्रा अजाब त्याची कीर्त ॥ भरून बिराची विद्या म्हणलेत आहे त्याच्या जवळ ॥ वर्‍हाड खाल्लं भोंदून हुजुर कोणी नाही करत ॥ मग झाली त्याची शायना म्हणे रावभक्त जादुखोर ॥ हुकूम केला त्यानं सवारी अजंतीवर ॥ धरून मलकया मनगटीं अपेष्टा मांडिली फार ॥ अन्‍ दोन उपडले दात बांधे हत्तीच्या पायावर ॥ देव भक्ताचा कैवारी तारे वरच्यावर ॥ कल्पले अंतरी श्राप दिला निरधार ॥१२॥

श्राप दिला तेव्हां दोन्हीं आपटले कर ॥ राज्यावरून ढळला होता कान्हुजीकुवर ॥ तेव्हां मग खाया मिळेना अन्न म्हणतो नाहीं झालं बरं ॥ त्या कान्हुजीच्या पोटीं होता लेक रायाजी कुवर ॥ तो शहाणा होता रायाची त्यानें सेवा केली फार ॥ दोन्ही कर जोडुनि विनंत्या करे वारंवार ॥ म्हणे अनाथाचा तारक देवा तूं मजला तार ॥ तेव्हा प्रसन्न झाले देव लक्ष्मी देल्ली महामूर ॥ म्हणे माइकरे रायाजी भाग तुझी होईल उजाड ॥ अन्‍ होयाचं तें झालं तुझ्या कुळीमध्ये अंधार ॥ बोलला शबद पुरतुन नाही येणार ॥१३॥

तेव्हा मलक्यानं हाक मारिली मोठया लेकाला ॥ म्हणे निंबाजी महादजी तुम्ही जा कारंज्याला ॥ निंबाजीच्या पोटामध्ये धडका उठीला ॥ घेऊन पित्याची आज्ञा निबांजी गेले कारंज्याला ॥ घेतलं सोवळं निंबाजी मागें परतला ॥ तेव्हां मलकयानं हाक मारिली लहान्या लेकाला ॥ लहाना लेक चिंताजी त्याहच्याजवळ धाऊन गेला ॥ म्हणे मागरे चिंत्या प्रसन्न आहो या वेळेला ॥ तो लहाना लेक चिंताजी कांहींच नाहीं बोलला ॥ तेव्हां मलकया बोवा तेव्हां बोले चिंताजीला ॥ जा सातव्या पिढींत भेट देईन तुम्हाला ॥ नेकी धरम ठेव जा तुम्ही ओळखजा मजला ॥ पापबुद्धी धराल तर दगा बसल जीवाला ॥ ऐतवार्‍या दिवशीं बोवान देह ठेअन दिला । निंबाजी महादजी आले आपल्या गांवाला । खबर कळाली तेव्हा अंग टाके धरणीवर ॥१४॥

प्राण गेला तेव्हा सज्जे ढळले दोन । झाला फार आकांत जैसं मोठं पडलं मोठं पडलं रण । हाय हाय करत जन म्हणत हारपला मोहन । एक पिटे लल्लाट देवा दाखव गा चरण । दर्शनाची आवड आमचे डगमगतील नयन । तेव्हां नहाणलं देवाला कपाळी मोहर लाऊन । आंग पुसलं होत देवाच्या अंबाई लेकीनं ॥ मांडी देल्ली होती देवाला धाकटया चिंताजीन ॥ आरती घेऊनी आली बोवाची गंगाई सून ॥ पुंजा केली होती बोवाच्या मोठया लेकानं ॥ उचलून बोवाला ठिकान्यावर गेले घेऊन ॥ बसीवल बोवाला आतमधी पीठ भरून ॥ बसीवल बोवाला आंतमधी बेल भरून ॥ होता एक अवलीया ऐसा नाही होणार ॥१५॥

चौघे लेक बोवाला दोघी कन्या सत्वर ॥ अन्‍ पोटी पिकल्या सुना नातीनातांचा विस्तार ॥ फार लागला पैसा दर्गा देवाचा जोर ॥ ईटबंदी वाडा बोवाचा आहे चौफेर ॥ आहे तीन बुरुज वाडयाला आणिक वाडयामध्ये विहीर ॥ दरवाज्यावर सज्जा बैठक दिसते हवाशीर ॥ सत्रा कळस हे सोनेरी आहेत चौफेर ॥ जे कोणी खोटं म्हणेल त्यानं पहावं सत्वर ॥१६॥

शके सतराशे च्यार ख्याल केले तयार ॥ नांदगांव प्रगाणा काशीराम जुमेदार ॥ घरगत वस्ती आहे आजंती वस्ती गुलजार ॥ शामजी चोपडया रयत नांदवतो जोर ॥ झाले तेरा चौक भजनी मुक्तीचं माहेर ॥ नथुभटबोवा मागें भक्ती करे फार ॥ काय प्राप्ताअ सांगूं देवा तुझ्या पायाचा आधार ॥ मलक याचा ख्याल ऐका बसून लहानथोर ॥ येडा वाकडा शबद माझा आयका उत्तर ॥ ज्यानं टाकिली पुंजा त्याचं नाही झालं बरं ॥ ज्यानं केली चेष्टा त्याचं नाही झालं बरं ॥ महादु गोविंदा ख्याला गातो वस्ती मोझर ॥१७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP