मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर|
घनी छत्रपती शिवराज नेमले ...

पट्टणकुडची लढाई - घनी छत्रपती शिवराज नेमले ...

पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो.


घनी छत्रपती शिवराज नेमले झुज लढती फौज मार लाविला । झाली एकच गर्दी भाऊवर हल्ला ॥ध्रु०॥
धन्यावर दाली धरून क्रिया सोडून, आला चालून केला अभिमान गर्व थोर । म्हणजे एकदांच पाहीन कोलापूर क्षेतर ॥ त्या गर्वाचें घर खालीं पाहून शुद्ध गेली फजिती झाली रावण बुडाला दशासूर । त्या रामचंद्रानें केला संहार ॥ असे थोर थोर सांगती बहुत शिकविती आल्या परिचिती तरि उमजेना गव्हार । मुक्तीनें वोढिलें काळाचें घर ॥ आला नानाचा वकील सांगे भाऊला करावा सल्ला फिरून जावें तुम्ही माघार । करनाटक स्वारी फिरंग्यावर ॥ फिरंगी चढून आला म्होर । तुम्ही जाऊन उतरा तुंगभद्रेवर ॥ झाला धन्याचा हुनुम आली वस्तरें राजावर दावा नका करूं वैर । घ्या तुमची खंडणी बांधून देतों घर ॥ राग आला भाऊला धरवेना धीर । गर्वानें फुगला चढला अहंकार ॥ बोले हंतेतें घेईन कोलापू । मग घेऊन गोकाक मग बागवाडी घेऊन चिकोडी नदीच्या थडी केला मुक्काम खडक लाटेला ॥ भुज घेऊन गोळा मारी लष्कराला ॥१॥

महाराजांनी मनसोबा केला गंगा उतरला कुनूरास गेला डेरे दिले समगात । आले गलीम चढून लाटेच्या मैदानांत ॥ महाराजांनीं कुच करून फौज घेऊन उतरले हमिदवाडयावरत । झुज नेमिलें राव केली मसलत ॥ चार हजार घोडा स्वार होऊन तयार घेऊन दळभार नगारा केला सैनेंत । आणूं या भाऊला धरून जीत ॥ नीत उठून स्वारी गलिमावरी तें लष्कर सोडून नायेत । भाऊनें तोंड लपविले डेर्‍यांत ॥ कशी चित्त्याला पाहून हरणी दबकत । नाहीं झुजायाजी तकवा धरली हिंमत ॥ आली स्वारी मागें परतून लष्करांत । धनी छत्रपती बोलले यशवंत ॥ आणा मानकरी हटकून समस्त । चोपदार हिंडतो ताकीद करीत ॥ उद्या हल्ला भाऊवर समशेर रणांत । ऐकून शिपाई दचके मनांत ॥ एक एक शिपाय निवडा हजारांत । त्या सर्जेराव बापूची भली मात ॥ भोसल्याचे दैव थोर, शिवाचा वर, नगी समशेर विडा पैजेचा मांडला । पुण्यप्रतापी महाराजाचा बोलबाला ॥२॥

आले थोर थोर मानकरी शिपाय रणशूर,  करती जोहार, महाराज बोले वचन । अणा चतुर सैनेला बोळावून ॥ हुता दिवस मंगळवार होऊन तयार । घेऊन दळभार डंका नौबतीस करून हत्तीवर हौदा भडके निशाण ॥ घाटग्याची नगी समशेर हिंमत बहादुर खासे बालदार पांढरे बापू चवाण । पाटणकर माने भपकर पठाण ॥ सिंदे भोंसले यादव जाधव घोरपाडे मिळून देसाई देशपांडे मिळाले सैन ॥ चार हजार पायदळ सनद्या मिळून । साहा हजार घोडा हजिरी लिहून ॥ बारा हजाराची भरती करून । सरखवास मुलुख जप्तन दोघेजण ॥ चला हुजरातीला फौज कडाक्यानं रत्नाकर आपा उजव्या बाजूनें । तोफखाना जिलिबी चाले जलदीन । ह्मोर वाजंत्र्याचे बाजे लावून रणशूर शिपाई मिरवे रणांतून ॥ केलें केदारलिंगाचें स्मरण । अवसर माता चोपडाई करी धांवणें ॥ रत्नासूर दैत्य मारिला नाथानं । केले अंबादेवीचें स्मरण । म्हाराज देव अवतार वारूस स्वार नगी समशेर भडका अग्रीचा उठला ॥ त्या निपाणीच्या माळाला जम पडला ॥३॥
म्हाराजांनीं पत्रिका लिवली जासुदास दिली खबर पाठविली बोलवा भाऊला झुंजायला । सावध करून मारावा वैर्‍याला ॥ भाऊनें धरला दम नेसला सुम खावुन गुम निश्चित बसला डेर्‍यांत । तंगबाहार तयारी सार्‍या सैनेस ॥ महाराजाला करावा ज्वार फौजेचा फरा बांधला । धराभार निशाणाचा उठला ॥ ठेवा हन्यावारीला ॥ डोई हर तुम्ही बोला । नाही अवसान उपसायाचे तलवारीला ॥ जीन घालाय विसरला घोडा सुटून गेला । भाऊ कंठाळीस गुंतला चाकर पळाला ॥ काय सांगूं दादानों गळाठा झाला । फौजेची बगल उडाली पळ सुटला ॥ चोपदार मारून फिरवी लोकांला । चार हजार घोडा खासा तयार झाला ॥ भाउचा लेक आपासाब सुजला । आधीं तोंड लागलें हुजूरपा गेला ॥ बहिणाजी भोंसले पांडर्‍या पडला । गाईकवाडास जखमा लागल्या ठार झाला ॥ फौजेचा मोहरा मागें फिरला सरला । राजाला राग मोठा क्रोध आला ॥ रत्नाकर आपा हैबतराव उठला । पाटणकर यादव सजेंराव भिडला ॥ बापु चवाण फिरवी महाराजाला । शेंडूर पायदळ घुसले ओढयाला ॥ छमछमा उडे समशेर रणभूमीला । झाली एकच गर्दी सर्या अंधकारला ॥ माईला लेकरूं वळखेना असा वकत पडला । येवून भाऊला ॥ शिपायांनीं फसविंले एकला पडला । भाऊ घोडयावर फिरा माघार बक्षिसा देतों शिपायाला ॥ काय पळून तोंड दाखवूं पेशव्याला ॥४॥

आला दिवस दोनपारला लागली टक्कर होती झुंबर लढाई दोही दल्लाला । हटकून मारी हेऊन हेराला ॥ लावला तोफेचा भडिमार गोळे अनिवार जखमी फार गणती नाही मुरद्याला । भगवंत सारथी दोही दळाला ॥ हजारामधि एक मारी फिरून माघारी समशेरा रणामधिं खेळे रणशूर भाला । राया जाधव जप्तन - मुलुख लव्हा केला ॥ झुजाची मात पटयाचा हात मिसळला । आंत जखमा चढल्या आपाला ॥ भाऊंचें लष्कर गडबडलें पळ सुटला । लुटलें धन सांपडली पेंढार्‍याला ॥ डेरेदांडी पालखी धरा त्या हुटाला । साहा हत्ती तोफा चौघडा सांपडला ॥ झाली संध्याकाळ दिवस मावळला । जप्तन मुलुख दादा पाठीवर चढला ॥ राजाचे लोक मारी हातीं भाला । काळाची मिठी यमानें गांठला ॥ एका पलामधिं धरलें भाऊला । सजेंरावबापूनें घेतला । हैबतरावदादा म्हणे भाऊला । हात जोडून शरण ये महाराजाला ॥ काय तरी घडूं नये हा निश्चय ठरला । पुढें बातमी कळविली भाऊ धरून आणला ॥ झाला हुकूम धन्याचा मारा वैर्‍याला । तवा सजेंराव बापूनें हत्तीवरनें खाली टाकून दिला ॥ भाऊ पळतांच खाशा भालदारांनी तोडला । तलवारीचे धारेनें प्राण गेला ॥ धारा तीर्थामधिं जाऊन मिळाला । करा खुशालीच्या तोफा आनंद झाला ॥ भाऊ जोशी अर्जी करी महाराजाला ॥ द्या हुकुम आज्ञा अग्रि भाऊला । भाऊंची हाडें पाठविलीं मिरजेला ॥ पाणी आणलें बाळासाहेबानें डोळ्याला । दुःखाचे डोंगर उमाळा सुटला ॥ आज भाऊला मारिला सुभा बुडाला । आज बाजू मोडली चिरा ढांसळला ॥ सा सावरून धीर देतो अवघ्याला । महाराज यशवंत धाक मुलुखांत वाजे नौबत यास आलें तलवारीला ॥ आज भाऊ मारिला । थोर नक्षा झाला ॥५॥

भाऊ गर्दींमधिं मिळाला खबर पुण्याला श्रीमंताला । लखोटे पाहिले वाचून ॥ कसें एकाएकीं हरपलें रत्न । नानानें खबर ऐकिली “खुशाली झाली” पत्रिका लिवली अर्जी महाराजास करून ॥ अमृतराव ते गळलें अवसान । पुढें चिंतामणराव भाऊचें सूत्र उतारलें हरिपुरावर चढाई करून ॥ म्होर घाट रोखला शिरोळकरान । केला संग्राम कृष्णातीरी गोळी अनिवार ॥ जखमी फार घायाळ झाले जखम्यान । केली दाटी आला वारणा उतरून ॥ पुढें कळलें भाऊचें गळलें अवसान । रात्रीचा जात होता पळून ॥ चिप्रीवर वाट धरली शिरोळकरान खुब मार दिला गोळ्याचे सोडले बाण । चार हुट खजिना तट सांडवून ॥ लष्कर गडबडलें आला चतुर सैन । पाण्यांत नावा ढकलिल्या गलिमान ॥ राव कैक बुडून मेले पाण्यात शिरोळकर आले मागें लुट घेऊन । धनी आडवा उभा माळावर अवघ्यासी देतो बरोबर वांदून । फोडलीं सलदें मोडलीं कुलुपें आंत तुरे मोत्याचे रुपये पोशाग सोन । केल्या बक्षिसी खुशालीनें ॥ लोकांला, भली मात केली नाईकजी पाटलान ॥ पाटीला शाबासकी दिली म्हराजान । राजा करवीराला जाण ॥ आपानें केली रवानगी आणा जिते धरून धोंडजी गोखल्याला ॥६॥

राजा करविरा निघाला आनंद झाला करा तोफेचा भडिमार । वांटल्या साखरा गुढया घरोघर ॥ नारी आरती ओंवाळी लोक भेटले बसले तक्तीं महाराज ईश्वर अवतार । सत्तावीस पिढया बाच्छायाचेवर ॥ राजा इचलकर्जीला निघाला, पाडून करा बरोबर । इचलकर्जीनें केला सल्ला फिरविल्या ढाला खबर शिरोळ नांदणीला ॥ किती कमासदार शिरढोन पाडुनी केला चकचुरा । शिरोळचा किल्ला शिव मिरजेवर ॥ शिरोळचा घुमट धोशा दुरवर । नाईकजी पाटील धनी सरदार ॥ धन्याला मुजरा तक्ताला जोहार । नरहरी पावील उंच दिगांबर ॥ लुच्चा त्रगलीचा उतरला नूर । दास मी तुमचा लोळे चरणावर ॥ द्या मती मजला उज्ञानाचा सागर । जोतीराम गातो नरहरीचे आगर ॥ शिरोळ बाका सवाई सपाटा वाजे डंका धाक पडला मिरजेला । झाला आगम ढोसणी दिली वैर्‍याला ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP