मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर|
दामाजीपंतांनी जगविले ब्रा...

दुसरे सयाजीरावांचा पोवाडा - दामाजीपंतांनी जगविले ब्रा...

पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो.


दामाजीपंतांनी जगविले ब्राह्मण कांही दुकळांत ॥ गायकवाड तर रक्षिति ब्राह्मण लाखों असल्या काळां ॥धृ०॥
तीनशेंतिसांवर वर्से लोटलीं दुर्गादेवीच्या काळाला ॥ फार दिवस पर्जन्यच गेला आन्न मिळेना बाळाला ॥ दामाजीपंताच्या लागले ब्राह्मण द्वारी लोळायला । रक्ष रक्ष महाराज समर्थ सर्वांस आला निर्दाळा ॥ त्या समई कोठार खोलुनि पंती जगविले सकळांला ॥ बेदरास कळतांच धुतोड शिपाई आले आंवळाला ॥ चल बे बम्मन म्हणून ओढितां अश्रु लागले गालाला ॥ कैद करून नेताक्षणी पडले संकट त्रिभुवनपाळाला ॥चा०॥ महाराचे सोंग विठोबांनी स्वतः घेउनी ॥ धान्याचे द्र्व्य त्या बाच्छायास देउनी ॥ पंताच्या पोथिमध्ये ती रशिद ठेउनी ॥ रहिले विठोबा पंढरीस येउनी ॥चा०॥ दामाजी पंताच्या धावण्या असा धांवला विपळांत ॥ तसा म्हळसाकांत रक्षितो गायकवाड ह्या भूतळांत ॥१॥

सतराशेंचोविसांत दंगा होळकरांनी अति केला ॥ पंचविसामध्ये दरोबस्त अगदिंच पहारे पाउस गेला ॥ दीड शेराचा दुकाळ पडला कहर वाटला दुनियेला ॥ दिवसंदिवस बेबरकत जहाली सुखोत्पत्ति नाहीं रयतेला ॥ ब्राह्मण गेले उठुन मजलोमजलीं खुब ठेला ॥ बडोद्यांत पोंचला तो जगला न पोंचल्या वाटेस मेला ॥ धर्मपुरुष गायकवाड प्रेमळ क्षमाशांतिने भरलेला ॥ तेव्हांपासुन प्रारंब सिंध्याला हजारों ब्राह्मण जपलेला ॥चा०॥ चाळीस वर्षे वांटितात खिचडी सदां ॥ म्हणून न जाती ब्राह्मण देशीं कदां ॥ दिवसांत प्रहरभर पडे मेहनत एकदां ॥ मग सार्वकाळ आनंद हसती गदगदां ॥चा०॥ कुटुंबसुद्धा प्रपंच करिती गर्भिणी होति बाळात ॥ तिहीं महिन्यांच्या मुलांस खिचडी मिळत्ये असें आलें आढळांत ॥२॥

वेदशास्त्रसंपन्न  पुराणिक योग्य ज्योतिषी हर्दास ॥ टाळ - विणे - करताल - मृदंगी त्यांत एखार्दा सुरदास ॥ सर्व काळ भजनांत घालती कदां न शिवती नंदास ॥ घुंगर बांधून पायीं नाचती ध्याति पुंडलिकवर्दास ॥ चित्रें मूर्ती करण्यांत कुशल जे वैद्य जिंकति दर्दास ॥ तर्‍हेतर्‍हेच्या करून नकला नकली रिझविती मर्दास ॥ ब्रह्मचारि मांत्रिक तपस्व घेउन सवे शागिर्दास ॥ मोहरा - पुतळ्या - रुपये तयांना देति शालजोडयाफर्दास ॥चा.॥ ह्यापरी ब्राह्मणसमुदाय फार जगविला ॥ पुरुषार्थ करून संकटकाळी दाविला ॥ वैकुंठी अचळ हा धर्मध्वज लाविला ॥ वंशास वश मार्तंड करून ठेविला ॥चा.॥ येवढेच विश्रांतिला राहिले स्थळ पश्चमच्या रहाळांत ॥ करीर्तवान खावंद असले नाहीं मराठे मंडळांत ॥३॥

विश्वकुटुंबी श्रीमंत ते तर तूर्त प्रजेला अंतरेला । गायकवाड आहेत म्हणुन ते समस्त ब्राह्मण सांवरले ॥ तानसेनपंथाचे गवय्ये तेहि प्रभूंनीं आंवरले ॥ कडींतोडे हातांत दुपेटे लाल जरीचे पांघरले ॥ पहिलवान पंजाबी ज्यांचे दंड सदा मुंढे फिरले ॥ हरहमेश कुस्त्याच विलोकुन इतर मल्ल जागीच विरले ॥ नायकिणी आणि कसविणी शाहिर नेहमी बडोद्यामध्ये ठरले ॥ पावे पगाराशिवाय बक्षिस कसवी लोक ह्यानें तरले ॥चा.॥ कल्याण ईश्वरा असेंच यांचे असो ॥ आनंदभरित चिरकाळ गादीवर बसो ॥ कधीं अलोभ गंगुहैबतीवर नसो ॥ महादेव गुणीचें कवन मनामधे ठसो ॥चा.॥ प्रभाकर कवी भ्रमर गुंतला पहा कर्जाच्या कमळांत ॥ द्रव्यकृपेचा प्रकाश पडल्या सुटून जाइल स्वकुळांत ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP