मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर|
दक्षणच्या पेशव्यांशीं घाल...

खडकीची लढाई - दक्षणच्या पेशव्यांशीं घाल...

पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो.


दक्षणच्या पेशव्यांशीं घाला कधीं नव्हता आला । गंगाधरशास्त्र्याचेवरून राज्याचा नाश झाला ॥ध्रुपद॥
गंगाधरशास्त्री मारिले पंढरपुरांत । त्याची बातमी गेली इंग्रजांच्या घरांत ॥ तेथुनि माजला कलंकी ऐका आश्चर्याची मात । त्रिंबकजी डेंगळे हवाली करून झाले शांत ॥ दोन दिशीं वाद मिटला ठेविला ठाण्यांत । पुढें व्हायाचें पळून गेले सहाव्या महिन्यांत ॥ इंग्रजांच्या पहार्‍यांतून असा कोण गेला ॥गंगाधर०॥ ॥१॥

कोट किल्ले दिले ओलिला त्रिंबकजीसाठीं । महिन्याचा वायदा मसलत केली उफराटी ॥ वसई सुभा दिलारे देवा आड केलीं ताटीं । कसा तरी जिव वांचो पडल्या दुष्टांच्या गांठी ॥ बाबासाहेब गेले पंढरीला विठ्ठलाच्या भेटी । उजवें फूल द्यावें आम्हां माहुलीच्या कांठीं ॥ गोविंदराव काळ्याने मनसुबा पहा कैसा केला ॥गंगाधर०॥ ॥२॥

बापु गोखले मुळींच ऐका बेटावर गेले । बेट जाळून निघूनशानें खडकीवर आले ॥ दोघांचे मोर्चे भिडले आकाश कडकडलें । बापु गोखले जाऊनशाने तोफेवर पडले ॥ टोपीवाल्याची फरडी झडली लढाईवान्‍ पडला । लहान थोर जन रणभूमीशीं युद्धास आला ॥ दोहों सैन्यांचा बहुतसा चेंदा तो झाला ॥गंगाधर०॥ ॥३॥

दोन पलटणी येउन पुण्यावर गारपिरीं भरल्या । युक्ती युक्तीनें उठवून लावितां खडकीवर ठरल्या ॥ आश्विन महिना एकादशी तरवारी झडल्या । तेराव्या दिसचा समाचार ऐकुन घ्या दाखला ॥ सत्राशें एकुणचाळीस ईश्वरी नाम संवत्सराला ॥गंगाधर-॥ ॥४॥

लाख फौजेचा जमाव झाला श्रीमंतांपाशीं । रणभूमीवरी येऊन पडल्या तोफांच्या राशी ॥ अल्पिष्टन‍साहेब स्मिथसाहेब आले रागाशीं । सिंधुराच्या टेंकडीवर दिल्या तोफांच्या राशी ॥ अल्पिष्टन‍साहेबाचा हुकूम तो लई करडा झाला ॥गंगाधर०॥ ॥५॥

करनल बरसाहेब होते पलटणींत । आले धाऊन खडकीच्या मैदानांत ॥ लढाई करून बहुत केली मात रंजुक झडत । पाचेचा हिरा दडेना वाटोवाटी चंद्र गगनांत ॥ बापु गोखला राहिला रणांत ॥ युद्ध केलें त्यानें युद्ध केलें बहुत । बाबासाहेब विश्वास देऊन माहुलीस गेला ॥ बापु गोखला लढतां सवाप्रहर दिवस आला ॥गंगाधर०॥ ॥६॥

दळणासरसे किडे रगडिले रडती नरनारी । लेंकराला माय विसरली कसा ईश्वर तारी ॥ आधीं गेले ते पार पडले पुण्याच्या पारीं । पुण्यावरतीं चढले झेंडे केली वारासारी ॥ जो येतो तो लढतो हातामधिं भाला घेउनी । सगनभाऊ म्हणे ऐशी ईश्वराची करणी ॥ बिबिछन म्हणे चंद्र सूर्याशीं कलंक लागला ॥गंगाधर०॥ ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP