मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर|
श्रिमंत झाले लोक श्रिमंता...

पेशवाईचा पोवाडा - श्रिमंत झाले लोक श्रिमंता...

पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो.


श्रिमंत झाले लोक श्रिमंतापासून लक्षावधी ॥ दुरावले श्रीमंत आपल्या दृष्टिस पडतिल कधी ॥ध्रुवपद॥
शिंदे होळकर उत्तरेस पश्चिमेस सेनापती ॥ पूर्वेकडे भोंसले, मिरजकर दक्षिणचे अधिपती ॥ हरीपंत नानाच्यापुढे किति बुद्धिवान लोपती ॥ बृहस्पती आणि शुक्र जसे काय तारांगणिं तळपती ॥ विपूल त्या रास्त्याच्या घरीं आजवर संपत संतती ॥ इचलकर्जिकर बारामतीकर सोयर्‍यांत धनपती ॥(चाल)॥ पाहा कृष्णराव चासकर ॥ कोकणचे कोल्हटकर ॥ महाशूर सोलापूरकर ॥ दीक्षित पेठे साठे ओक ओंकार सभाग्यामधिं ॥ फाटक थत्ते बरवे देवधर, पेंडशांची रित सुधी ॥१॥दुरा०॥

भागवत मंडलिक दामले रामदुर्गकर बळी ॥ आपा बळवंत पार जाइ रणांत फोडुन फळी ॥ रामाजी माहादेव रणांगणी अडेल मोठे खळी ॥ हमेशा कारलेकर देती भिल्ल कोळ्यांना गळीं ॥ झांशिवाले बिनिवाले बुंदेले रिपु खांडेकर छळी ॥ कितीक लक्षाधीश प्रतिष्ठित ही घरची मंडळी ॥चाल॥ मर्दाने विंचूरकर भरपूर नारो शंकर ॥ विश्वासुक ओढेकर ॥चाल॥ नायगांवकर पुरंदरे प्रतिश्रिमंत ते गुणनिधी ॥ सखाराम भगवंत राजकारणांत केवळ विधी ॥२॥दुरा०॥

नगरकर आंबेकर चिंतो विठ्ठल स्वारीकडे ॥ पवार जाधव धुमाळ डफळे देवकांते धायगुडे ॥ दरेकर सरलष्कर बाबर सोनवणी पायगुडे ॥ निंबाळकर नाईक धायबर पाटणकर फांकडे ॥ मुधोळ गुत्ती गजेंद्रगडकर स्वस्थानी घोरपडे ॥ गुजर घाटगे माहाडिक मोहिते विचारे शिर्के बडे ॥चाल॥ बाइ माने म्हसवडकर ॥ आठवले उंबरखेडकर ॥ रणनवरे राजवडकर ॥ पिसाळ शितोळे वाघ आयतुळे लढाईला ते आधी ॥ शाहामिरखां रोहिले, फिरंगी, पठाण, आरब, सिधी ॥३॥दुरा०॥

ताकपीर थोरात पांढरे स्वामीपदिं सादर ॥ धुळप यांचा इंग्रज टोपी काढून करति आदर ॥ श्रीमंतांचे प्रतिबिंब अल्ली बाहादर समशेर बाहादर ॥ कुशाबा हैबतशिंग सजेले काय रुप सुंदर ॥ सातारकर पोतनीस मुख्य चिटणीस लेखक नादर ॥ छत्रपतिस विनवून देविती श्रीमंतांस चादर ॥चाल॥ निळकंठराव धारकरी संनिध त्याची चाकरी ॥ मोहीस हैबतराव करी ॥ बाबुराव हरी सखाराम हरि शूर वीरांचे क्षुधी ॥ अहंकारी मल्हारराव जगजीवन नसे परबुधी ॥४॥दुरा०॥

धन्य प्रभु पेशवे ज्याचे ऐश्वर्य बघुन मन रिझे ॥ परशत्रूचें शौर्य ठांइच्या ठांई प्रसंगीं थिजे ॥ सुखी लोक मुलखांत केशरी भात घरोघर शिजे । गृहस्थ भिक्षुकांचें गौरवें तुपांत मनगट भिजे ॥ तीर्थोतीर्थी नित्य शेरभर सोने सकाळी झिजे ॥ नाहिं दुःख कोणास पलंगी आनंदांत जन निजे ॥चाल॥ ईश्वरा असे हे धनी ॥ महा पराक्रमी साधनी ॥ सर्वत्र सगुण शोधुनी ॥ गंगु हैबती म्हणे यजाचे विघ्न गजानन वधी ॥ महादेव गुणि प्रभाकराचे कवन शर्करा दुधीं ॥ श्रिमंत झाले लोक श्रिमंतांपासुन लक्षावधी ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP