मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर|

खडर्याची लढाई - ८

पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो.


हिंदुस्थान गुजरात सोडून शिंदा दक्खनेंत आला ॥ हुकूम केला बादशहाने त्याला ॥ध्रुपद॥
मजल दरमजल नर्मदा उतरून आले पार । धरला दक्खनचा सुमार ॥ बेगुबेग येऊनि त्यांणीं घेतलें गंगातीर । फौज होती चाळिस हजार ॥ मनीं मनसुबा करुनि चढले बालेघाटावर ॥ धरला व्यंकाजी तस्कर ॥ मग कित्येकांस जरब पोंचली मरुन झाले चूर । पळाले पुंड पाळेकर ॥ तेथून जलदिनें कूच करूनी दाखल तुळजापूर ॥ आले दक्खनांत झालें जाहिर । दक्खनदेशीं अंबा भवानी दैवत अनिवर । देवीस केला नमस्कार ॥(चाल)॥ दिले तळजापूर सोडूनी । गेले चंद्रभागा उतरूनी । खबर ऐकिली श्रीमंतांनीं । दोन कोस आले आलुनी । भेटले हाडपसराच्या रानीं । नेमिली पुण्याची छावणी । जवळ पेठ आहे भवानी । मुक्काम वानवडीवर केला ॥हिंदु०॥ ॥१॥

सहा चार महिने तिथें गुजरले पुण्यात येऊनी । मनसुबा बहु सबळ करुनी ॥ नबाबांस पत्र लिहिले फार फार अर्जिंनीं । खर्चि द्या आम्हांस पाठवुनी ॥ जासुद जोडया केल्या रवाना पोंचल्या जाऊनी । पत्र टाकिलें मुजरे करुनी । नबाब, बाहादर मश्रुल‍मुलुख एक मसलत करुनी । पत्र पाहिलें त्यांनी ॥ वाचून परगण्यावर चिठया नेमिल्या समय मग पाहुनी । नगदी ऐवज दिला लावुनी । पांसष्ट लाख रुपये पोंचले नाही भरले मनीं । दक्खनचा हिशोब घेऊं भरूनी ॥(चाल)॥ ऐसें करणें भगवंताला । हिंदुस्थान ज्याने काबिज केला ॥ परतुन दक्खनामधिं आला । पुणे शहरी काळ झाला ॥ खबर कलली नबावाला । नबाब बेदरावरी आला ॥ खरें खोटें भासे लोकांला । तक्तीं दवलतराव स्थापिला ॥ हुकूम केला बादशहानें त्याला ॥हिंदु०॥ ॥२॥

नबाबानें पत्र लिहिलें श्रीमंत नानाशीं । शिवाय दवलतराव बापूशीं ॥ पांसष्ट लाख रुपये आम्ही कर्ज दिलें शिंद्याशी । लवकर द्या आमचे आम्हांशी ॥ आटोकाट सरदार मिळोनी बसले । मनसुब्याशीं । क्रोध आल दवलतरावाशीं । तुम्ही बसून रहा पुणें शहरीं हुकुम करा आम्हाशीं ॥ पाहुन घेतों नबाबाशीं । तमाम फौजा मिळोनि दिले रोजमुरे त्यांशीं ॥ बोलाविलें जिवबादादाशीं ॥ तिथें जेवत असलां तर इथें या तुम्ही पाणी प्यायाशी । घेऊनि देऊनि देवजी गवळ्याशीं ॥(चाल)॥ येऊनि लवकर पोंचले । श्रीमंत पुण्याबाहेर निघाले ॥ मुळामुठावर डेरे दिले । बावन उमराव मिळाले ॥ एकंदर बसुनि मसुबे केले । भोसलें तेहि लवकर आले ॥ शिंदे अघाडीस घातले । येऊन सिनेवर शह दिला ॥हिंदु०॥ ॥३॥

बेदर सोडुन नबाब लवकर बाहेर निघाले । अमीर उमराव संगें घेतले ॥ चला चला म्हणून लवकर धारूरावर आले । पुण्याकडे झेंडे फिरविले ॥ तेथुन जलदिनें कूच करुनी वांजरानदीवर आले । फिरंगी अघाडीस घातले ॥ शेखसलाची करूं कंदुरी मशीरन बोलले । पेशवे थरथरां कापूं लागले ॥ पांसष्ट लाखांचा मुलुख मागतां तोही विसरून गेले । स्वप्नी नबाब दिसूं लागले ॥ सांडणीवरती सांडणी फिरणी डांकवाले बसविले  । वरचेवर बातमी आणवूं लागले ॥(चाल)॥ घाट घतरले मोहोरीचा । मार्ग धरिला पुण्याचा ॥ एकच गट करुनि फौजेचा । माळ चढले नायगांवाचा ॥ तकवा आला तिकडुन पेशव्यांचा । निश्चय केला यांनी झुंजायाचा ॥ धडाधड वार सुते तोफेचा । मुसा रहिमानचा मोचा तुडविला ॥हिंदु०॥ ॥४॥

नबाबानें मोर्चा तुडविला कळलें श्रीमंताला । अजुरदे जाले बहुमनाला ॥ अमीर सारे बोलावूनी आणिले डेर्‍याला । वक्त हा बुडायाला आला ॥ नानाफडनवीस एक मसूदी तर्क त्याने काढिला । बोलाविलें जिवबादादाला ॥ तुम्ही अघाडीस असतं मनसुबा कसा नाहीं कळला । नबाब गफलतीनें आला ॥ तोच विरश्री धरून साडया फौजा अघाडीला । चुरसा लागली तेव्हा शिंद्याला ॥ भिमराव पानसे तोफखाना त्यांचे हवालीं केला ॥ फिरंगी लोक तैनातीला ॥(चाल)॥ पेशव्यांनी विंचरणा रोंखून । सडया फौजा पुढें देऊन ॥ रास्त्यांनी एक अलंग धरून । फडक्यांनी तवाफरा बांधुन ॥ राजे बहादर नाम निशाण । फौजा नानाच्या आधीन ॥ तेथें मिळाले अष्ट प्रधान हौद्याशीं हौदा भिडुनी गेला ॥हिदुं०॥ ॥५॥

करून स्वारी तयार नबाब जरद्या अंबारींत । बेगमांपुढे हुजुरात ॥ त्यांची उमेदवारी पेशवे सर करूंअ सहजात । बांधली राजानीं हिंमत ॥ मश्रुल‍मुलुख त्याचे मसूदी राजा नेमिवंत । झाडुन फौजा त्याच्या अंकित ॥ रोशनखा परबिनीवाले नबाबाच्या हुकुमांत । भरअमल दोन्ही दळांत माहीत ॥ इस्मालखा पठाण गारदी त्यांचे संगत । नामी करवळ आहे हुजुरांत । फाजलखा रोहिले खांसि बारा हजार जमात । जंबुरे जोडून उंटावरत ॥(चाल)॥ नबाबानें हल्ला केली । फौज लोणीचा माळ चढली ॥ दोन्ही दळें उभीं ठाकलीं । नामी सरदार आसतअल्ली ॥ तोफखान्याला शिलक दिली । देवडी मार जेव्हां बसविली ॥ पेशव्यांची फौज मागें हटलि । फिरून खरनदीवर मुक्काम केला ॥हिंदु०॥ ॥६॥

रातोरात आणून तोफखाना जोडिला जिबबादादांनीं । लोणीगारमाळ पसरुनी ॥ एकापरीस एक शिपाई रांगडा हिंदुस्थानी । दोन कंपू फिरंगाणी ॥ मन्याबापू भोंसले परशुरामभाऊ आज्ञा घेऊनी ॥ एक मोर्चा त्यांनी रोंखुनी ॥ भवानराव प्रतिनिधी आले अनुपान भोगुनी । एक मोर्चा त्यांनीं रोंखुनीं ॥ चौकोसांची लांबण पडली कोणांत नाहीं कोणी । बहिर्‍यामधीं फौज गेली मिसळुनी ॥(चाल)॥
तोफेचा एकच वर्षला कहर । गगनीं लागुनी गेला धूर ॥ मायेशीं पारखले लेंकुर ॥ नबाबाशीं कळुन आला फितूर ॥ मजल काय सुटेल तोफेचा बार । पांचजण निवडले रणशूर ॥ मुसा रहिमुनचें बुडविलें लष्कर । रमणा बहुत तिथें मातला ॥हिंदु०॥ ॥७॥

लालखान वजीरखास ह्यांनीं रणांत घोडीं घातलीं । परशुरामभाऊशीं जखम चढविली ॥ दाजीसाहेब येथे शामजंगास स्वारी केली । पठाणी लोक संग हाटेली ॥ कटाव करीत चालले जेव्हा तिराचे मार बसविली । भोंसल्यानें गर्द बाण उडविली ॥ वजिरखानाशीं बाण लागतां हौद्यांत जान सोडिली । लालखांची सुद नाहीं लागली ॥ बाळासाहेब ठार जहाले मस्त सेना पडली ॥ खना खना लव्हागर्द उडाली ॥ भले भले सरदार ह्यांनीं बहिरींत तोंडें घातलीं । अंबारी नबाबानें फिरविली ॥(चाल)॥ लोक लोक आले चेंदत । नबाब मश्रुल‍मुलुक हौद्यांत ॥ आनंदराव किल्ला ठेवा नजरेंत । हावाई लाविली किल्ल्यांत ॥ नबाब दाखल सुलतान दुर्गांत । बुणगे आले शिवपटणाभोंवत ॥ वेढा काय शिंद्याचा पडला । हुकुम केला बादशहानें त्याला ॥हिंदु०॥ ॥८॥

खरनदीवर दिले मोचें किल्ल्याशीं रोखून । फौज नबाबाची घेरून ॥ जिवबादादा श्रीमंतांशी बोले अर्ज करून । नबाबास क्षणांत घेईन लुटून ॥ लुटल्यावांचून कारण नाहीं बसा शह देऊन । नाना करील तेंच प्रमाण ॥ बेदडयासी हुकुम टाका रस्ते बंद करून । रुपया शेर तेव्हां मिळेना अन्न ॥ पाण्यावांचुनी फौज तरसली नबाबानें ऐकुन । सल्ल्यास धाडिले गोविंद किसन ॥(चाल)॥ गोविंद किसन आले परतून । नबाबाशीं वर्तमान सुचवून ॥ मश्रुल‍मुलुख दिले पाठवून ॥ पेशव्यांनीं टाकिले कैद करून ॥ जसा सांपळ्यांत व्याघ्र कोंडून । नबाबांशी नानांचे वचन ॥ खातरजमा झाली येथून । अवघा चित्तिचा विकल्प उडला । हुकुम केला बादशहानें त्याला ॥हिंसु०॥ ॥९॥

शके सत्राशें सोळा आनंदनाम संवत्सर । फाल्गुन वद्य षष्ठी बुधवार ॥ किल्ल्यामधिं येऊनि नबाबासीं आठवला विचार ॥ द्यावी निंबाळकराशीं जाहागीर । नबाब बोलतां हजर विश्वासराव बापू सुपेकर ॥ आणविले आपासाहेब निंबाळकर । भेट घेऊनिया करा कुचाचा विचार । किल्ल्यामधिं सदरजहा बाहदर । शके सत्राशें सत्रा राक्षसनाम संवत्सर । चैत्र पौर्णिमा शुक्रवार । दळभार घेऊन नबाब वांजरानदीच्या वर । संगे होते निंबाळकर ॥(चाल)॥ करुनिया अखेर त्यावेळेस । नबाब गेले भागानगरास । श्रीमंत पोंचले थेट पुण्यास । गैबिचें देणें भुजंग आयास । कादरभाई चाकरू दिले बिनीस । त्यांनी जाऊनि गाठिले हारदास । रामचंद्र गातो मजलशीला ॥हिंदु०॥ ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP