मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर|
भले भले सरदार जमून सारे प...

महादजी शिंद्याचा पोवाडा - भले भले सरदार जमून सारे प...

पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो.


भले भले सरदार जमून सारे पुण्यावर बारभाई । चल पाहूं तकत बाच्छाई दिल्लीची छाई ॥ध्रु०॥
शाहूराजा तकद सातारा मोरचेलवाला गादी थोर राज्य करी । श्रीमंत पेशवे वागे त्याच्या दरबारी ॥ श्रीमंत किताबी थोर दिली जागीर । सनदा वर शेरा मारी ॥ ह्या झाल्या पुण्याच्या सनदा कोकणावारी पेशव्याच्या कृतीवर बावन सरदार शिंदे होळकर वाढले भारी । सोन्याचा कळस हत्तीवर झुले अंबारी ॥ अनंतराव पाटणकर निशाण हाय म्होर तुरुप स्वार पंच हत्यारी ॥ घोडयाला तंग तोबरी जिनबंद कोरी । सैनत फिर हलकारी ॥ नकीब चोपदारी आणिक हुलशारी । सैनेनें बांधल्या कंबरा झाली तयारी ॥ दिला हुकूम गोलंदासाला तोफेचा मार गगनीं दूर छाया घरी । आले मानकर्‍यासी पोशाग भरजरी ॥ वाजे हत्तीवर नौबत ताशाचे भार वाजंतरी । शिंग पुकारलें कर्णें विटेवरी ॥ फुलाचे गुंफले हार झाले स्वार हौद्यावरी चक्रधारी । श्रीमंत चालले राज हंबिरी स्वारी ॥ सोडला तकद सातारा गेले म्होरे पार झाले कृष्णाबाई । त्याला प्रसन्न हो पर्वति पुण्याची देवी ॥१॥

जाऊं धन्याच्या डेर्‍याला मजकूर केला त्या घटकेला पत्र लिवलीं ॥ दखनेंत फिरे हलकारी ताकीद केली । चढे हिंमत रोजगार्‍याला जाऊं पुण्याला तलवारीला दरोबस्त बांधिली ॥ मेण शिकल केली, गडी घरचा पाठिवला जलदी गेला जिनकराला ताकीद केली । घोडयाचा रंग पाहून जिन फांजिलीं ॥ मुबलक पैसा खर्चीला उंच अब्रूला किनखापाची खरेची केली । ढेलजेंत बसले शिंपी म्होरकी शिवली ॥ दाहा रूपये दरमाहा केला मोत्तदार ठेविला संगे नेयाला सोबत झाली । घोडयाची खटपट त्याच्या हवालीं केली ॥ उठ सखया अंगोळीला सैपाक झाला भोजनाला नार बोलली । ह्या रत्नाताटाभोंवती रांगोळी भरली ॥ जीन भिडविला घोडयाला गेंदजोड त्याला तूरा खोंविला म्होरकी दिला । निघाली घाई घरीं अस्तुरी कष्टी झाली ॥ ह्या अवघ्यांसी चांगला भेटूतो सर्व्याला मजुरे करतो घोडी धरली । संगें मैत्राची मंडळी घालवीत आली ॥ पदर लाविला नेत्राला पाय दिला रिकिबाला तयारी केली ॥ ह्यो वाहतो पुण्याचा रस्ता रव पडली ॥ रात्रीचा दिवस केला पुण्याला गेला चांद रात्रीला हजिरी दिली । घोडे शिपाई पाहून बोली केली ॥ उतारले डेर्‍हाम्होरे बसले धीर गादीवर विडे घेई । चल जाऊं पाहूं श्रीमंत दिल्लीची छाई०॥ ॥२॥

आली शार पुण्याला शोभा दाटली पागा मिळेना जागा पुण्या भोंवतेला । तीन लक्ष रुपये नित उडे खर्चाला । ह्या बोले शिंद्याच्या फौजा लावू ध्वजा दिल्ली अटकेला डांकेवर खबरा पोंचवूं पुण्याला । तुम्ही कराल पुण्यावर मौजा खर्चाल फौजा जिवाकडे बघा मुकाल प्राणाला ॥ त्यानें हिंमत धरली जाऊं हिंदुस्थानाला । शिंद्यानें भरविल सभा मजकूर बगा द्यावी रजा ह्या सैनेला ॥ ललकारी नकीब चोपदार रुमाल फिरला । शिंद्याच्या सवता सुभा धनी उभा ह्त्ती त्येगा त्यानें धरिला ॥ ही वाजे नौबत दणका तोफेचा झाला । हत्तीवर चढे डेरे चौदा राहुटया लादा नगारे झाले हीदारू गोळीनें हजार छकडे भरले ह्यो घोडा सजीवला ॥ जर्दा बांधून गुर्दा शिपाई उमदा साज कमरेला । ह्यो नागनिशाणी झेंडा हत्तीपुढें गेला ॥ सोडली पुण्याची जागा कमरेला । ह्यो नागनिशाणी झेंडा हत्तीपुढें गेला ॥ सोडली पुण्याची जागा तोडिल्या धागा भडकल्या पागा कालवा झाला । चालला शिंदा दखनचा धाक उडाला ॥ त्यानें उतरून गेले गंगा होईल दंगा सावध सांगा ह्या सैनेला । ही साडेसातशें तोफ चाले बित्रीला ॥ श्रीमंत धनी होय राजा हुटावर लेजा पैजा ताजा खजिना भरला । ही दर मुकामीं खर्ची धाडी शिंद्याला ॥ दरकूच चालले म्होरे नर्मदावर उभारले डेरे राहुटया देई । ह्या नर्मदेचे सैना पाणी पीई ॥भले०॥ ॥३॥

आली सातपुडयाची घडी तोफगाडी दाटली घोडी वाट पुढें नाही कामाठे खादी पर्वत फौज उभी राही । टाकीन पाषाण फोडी खपरे पाडी वार भरी तोफा लावी ॥ तीन हजार खलाशी संगे राव पगार खाई । पुढें चिल्लारीची झाडी काठवाडी मोठया धाडी वर्सल्या बाई ॥ गर्जती वाघ जाळींत जांभया देई । ह्यो चित्ता मारतो उडी लबड पडी नीरकाडी सांबर भिई ॥ पळे जंबुका स्वार मृत थडकले रुई । कमठेला तीर जोडी चिमट सोडी गाईकवाडी पाहिली नाहीं ॥ ह्यो कठीन देश परगाणा भिल्लाची खाई । आली हुटाची खिल्लार हात्ती चिरचिरे डुकर मारद खळ्या घेई ॥ चल मृग तरस रानांत हिंडे वनगाई । आली थाप्यावरती झाडी असमान फाडी साहेब फडफडी हेलावे घेई तीन मजले गेले सुर्या दिसला नाहीं ॥ आली उंच उज्जनीची गडी जेजाला जोडी तोफा सोडी होती लढाई । रणशूर शिपाई दखनी चालून घेई ॥ गेले डोंगर उतरून पार जमून सार हें लष्कर शिंदेशाई दिल्लीवर लाविले झेंडे फिरविली द्वाही ॥भले०॥ ॥४॥

शिंदे बाच्छाई थेट ठेविली दृष्ट मुजर दाट त्यांनी केले ॥ त्यांनी येक नालखी बाच्छाई देणे झालें । सोडिला दखन कूचट आले नीट काम मोठें जबरा केलें ॥ घे दखनेचा हिसाब बाच्छाई बोले । झाला लष्करचा आठीकाट जाडी दाट कठीण वाट लष्कर फिरलें ॥ ते उज्जनी ग्वालेरीवरी ठाणवं बसलें । झाला लष्करचा बोभाट कलमादाट तीनशें साठ बिगारी धरले ॥ ते उतारले नर्मदा अलीकडे आले । ईर साहेब मराठा थेट निराळा गोट उठून पहाटेन स्नान केलें ॥ देवीच्या दर्शनास मराठे गेले थेट डेरे दिले ॥ ते बोधल्याला पठाण निमाज पढले । करावरी कट साधु पेट पंढरी आले ॥ ते चंद्रभागेचें महातीर्थ केलें । कराकरा लिवले लाखोटे जासुद उठे गेले थेट पुण्याला गेले ॥ तीं पत्रें पाहून श्रीमंत सावध झाले । श्रीमंत मोत्याचे बुट सोन्याचे कट सजीवले हुट हत्ती घेतले ॥ त्या हडपसराच्या रानीं आडवे गेले । श्रीमंत शिंद्याला भेटे लल्हास दाटे तोफा सुटे बार झाले ॥ हे पांच हत्ती शिंद्याला बक्षी केले । यशवंतराव म्हराटे खरे भाग्य थोर आले माघारी पुणें देसावी ॥ त्या हिंदुस्थानाच्या खबरा डांकेवर घेई ॥भले०॥ ॥५॥

साहा महिने पुण्यावर झाले पत्र लिहिलें जोड हरकरी पुण्याला गेले । त्यांनी पत्रें टाकूनशान मुजरे केले ॥ मसीरंग पाहून लटपटे करून लटपटे करून झटपट फोडी लखोटे । वाची अक्ष्ररें कीं पाहून राव चिठया करी परगण्यावर ॥ ह्या बत्तीस लक्ष लाखा लिहून लिखा एकच शिक्का नगरी सारी ॥ शिंद्याला धाडली खर्ची पुण्यावरी । नाहीं भरलें शिंद्यांचें मन रुपये पाहून घेई भरून दखने दरबार ॥ दखनेचा हिसाब पुसी समयावर । हिंदुस्थान काबीज केलें दखनेंत आले काळ झाले शिव अवतार ॥ मग दवलतराव स्थापिले तक्तावर । असें कळलें की मोंगलाला तंबूर झाला मानकर्‍याला केले पुकार ॥ पुण्याकडे फिरविले झेंडे धारवाडावर । हात जोडून आरज करतो नवास बोला शेख सल्लाला सत्व फार ॥ गाई कापू कंदुरी राव तुमच्या म्होर । मोरीचा घाट धरला उतरून गेला तळघाटाला उतरून गेला गांव नाहीं म्होर ॥ तोफेचा बुरूज बांधिला गारपिरावर । खडर्याचा किल्ला घेरीला वेढा दिला मोंगल आला बसला थरि ॥ हे साडेसोळाशें डेरे दिले चौफेर । असे कळलें मोंगलाला तलघाटाला गलबल झाली । पांचावर बसली धारण तोंडे सुकलीं ॥भले०॥ ॥६॥

एक एक शिपाई बोले बरें नाही झालें मराण आलें घडिली चकली । घरदारपोरें लेकरें बायको मुकलीं ॥ घरीं मुबलक खायापिया देवदया प्रपंच माया चाकरी धरिली । मी गेलों असतों मागेंच आस्ता घडली ॥ वरजिलें अन्नपाणी लागेना गोड निघालीं हाडें घाईघार्स रडे नशीबा खुटली । आतां काई करवें दोरी स्वर्गाची सुटली ॥ गांडुनीं काढिलीं दुखणीं भ्या घेउनी कणा दाटुनी निद्रा केली । बोट बोट डोळे गेले खोल अंधारी पडली ॥ कोण बघतो निष्टून जाया जातो हगाया पडतो शाई घाबरली । सभोंवतेनें करडापहारा जाऊं देईना कुणी ॥ डागदार बघतो नाडी दवा देत तोडी चालवी जडी बाधा नाहीं जडली ॥ धडधडी उडताय काळीज धडकी भरली । मग गोपाळराव गुंडा करून झुंडा फिरवून तोंडा हिंमत धरली ॥ मग रुपयाची ढाल भर बोली केली । मग मानाजी फांकडे हटील घोरपडे रुपये रोकडे पगार चालविले ॥ भाल्याला बांधिलें बाशिंग हळद लाविली । रणांत रणनवरे शिपाई बावरे भुजा थरथरे लढाई नेमली ॥ पुण्याबाहिर मोंगलावर ढाल दिली । ढालाई चालले म्होर घेउनि शिरः तळहातावर भ्या कांहीं नाहीं ॥चल जाऊं पाहूं श्रीमंत दि०॥ ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP