टिपूवरील स्वारीचा पोवाडा - सर केला टिपू सुलतान फिरंग...
पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो.
सर केला टिपू सुलतान फिरंगी बाण गवसली खाण सोन्याची ॥ सोडीना फिरंगी लालुज पटणाची ॥धृ.॥
थोर होऊन शान अभिमान होउनी रावण होऊनी पाच्छाई द्वाही फिरविली परगण्यासी ॥ कैदेंत घातले कुंभार राजासी ॥ महाराठ लोक ब्राह्मण नेई धरून कापी चोमण मुसलमान केले राव तयासी ॥ बारा हजार चेला जमला पंक्तीसी ॥ चौमुलुखी पडली धासत नाव कोण घेतो थोर इभ्रत तोफेची कानडे लोक फलटान केले त्यासी ॥ त्याने दावा लाविला फिरंग्यासी ॥चाल॥ भौवताचा वैरी टिकल फार दिवशीं ॥ बोलावून आणले जाऊन पेशव्यासी ॥ परमुलुख परगाणा दिला मोंगलासी ॥ झाडून ठाणीं बसविलीं पेशव्याचीं ॥ तीन दल मिळाले गर्दी मुलकाची ॥ लाल सवाई उडती भगव्या बाणाची ॥ आपण पोंचला शार बेंगरुळासी ॥ मिळवणी ॥ पैले दिवशी दिलें एक झूज उडविला धूर पळून मग गेला पटणासी ॥ खुब मार दिला देवडी लावून हबसी ॥१॥
घेतलें शार बेंगरूळ धरून किल्लेदार खबर पाठविली पटणाला ॥ टिपू म्हणे आज हैदर नाईक मेला ॥ सनयेस सनय भिडवली फिरंगी किल्ली बोली किलबिली आतां उमजेना कवणाला ॥ खुब मार दिला मुरद्यानें खंदक भरला ॥चाल॥ बसविलें आपलें ठाणे गेला चालून लावून दुर्बीन पाहिले मोती तळ्याला ॥ वर्मासी वर्म भेटला धाक पडला ॥ तो मेंढा फिरंगी ह्ममईहून आला ॥ सुलतान बचेर्या जाऊन तुडविला ॥ सा हजार बार टिपूजा झडला ॥ चार हजार फिरंगी गोरा तिथ मेला ॥ त्या लालबागेचा धूर उडवून दिला ॥ तोफा टाकून माघारा पळून गेला ॥ होऊनी चाल दोन पारी खर्या दोपारी मध्याण रातरी गोरा फलटाण होऊन तयार लुटले शार गंजीपाला ॥ पटणांत वळखिना माय लेंकराला ॥२॥
फिरंगी मनसोबा निवळ, टिपूला खवळ, फिरंगी बळ, झाले भारी ॥ त्याने बुधले पुरले पलंगाशेजारीं ॥ मातेने घातले भरी ॥ वडलांची हाडें सोडून कुणीकडे एकदांच वांचवावी नगरी ॥ म्हलांत मेली खाशी अस्तुरी ॥ त्याची आईकतांच शुद्ध गेली सारी ॥ त्यानें पत्रें लिवली भोवीत्या करीं ॥ पाठवून दिलीं तात्याच्या कचेरी ॥ वाचून पहातां माया आली उदरीं ॥ ‘वडलानें तारलें होतें समय शिरीं ॥ आता तुम्ही वांचवा दौलत तुमची सारी ॥ देतों मोंगलाचा परगाणा काम लहरी ॥ लष्करांत महागाई पडली दो शेरी ॥ झाली चौकडून कुमका तारणारा हरी ॥ चाल ॥ गांवासी तीन तट किल्ला बळकट फिरंगी धीट भीत नाही आपल्या मरणासी ॥ राहुटया नेहून भिडविल्या आरोब्यासी ॥३॥
लागले सल्ल्याचे तोंड फिरंगी मोंड वेढा उठविना आपला ॥ पाहीन म्हणतो एकदा पटणाचा वाडा ॥ वर वाजवीन तंबूरा जरा धीर धरा बांधवीन घरें बाळगीन सवा लाख घोडा ॥ तो हरिपंत तयाचा मनसोबा गाढा ॥ हाय मुसलमान या उभी असू दे सुभी दावतो खुबी मुसलमान वेढा ॥ घरीं बसल्याने पैशाचा करील झाडा ॥चाल॥ भ्रमाचा भोपळा नका तुम्ही फोडा ॥ मारला चंद्रपठाण बैजवाडा ॥ नऊ क्रोड रुपये खंडणी केली झाडा ॥ तुंगभद्रेकडे परगाणा दिला सारा ॥ दिला लेंक हातीं मारा कीं तारा ॥चाल॥ भाऊसाहेबासी आला राग खवळला वाघ काढला माग वलांडून गेला कावेरी ॥ परतून ढाला दिल्या त्यास लहरी ॥४॥
पटण सारख्या शहरा निशाणा बरा टिपूच्या घरास वा रीझली ॥ उंच गांवांतून जागा गांवांतून होती नेमिली ॥ वर मोंगलाचे घुमट खाल जाय निट वसविली पेंठ दिली लालबाग लावून ॥ त्या करनाटकामधीं जागा पाहून ॥ सोन्याचा निघतो धूर नदीस आला पुर नाव हाय श्रीरंगपट्टण ॥ त्या मुलखामधि राव जनमतो सोन ॥चाल॥ झाले सला चालले लष्कर निघून रागीने घेतले घर जन म्हणती अशी कैक मेलीं हगवण लागून । घोडयाला चालेना ओझे नवे जिण ॥ तसल्यांत गांठ घातली राव बयद्यान ॥ फत्तु नाम गैबीचें करतो स्मरण ॥ लाडू नेमज वस्तादाची दया पूर्ण ॥ राजू सुलतानाचें मडवड ठिकाण ॥ असा छंद फंद केला पाहून ॥ ऐकून जळती दंडी दुसमान ॥चाल॥ आम्ही दालीबंद शिपाई वळखिली शाई त्या शहरांमधिं तुरेवाल्याची उपडली शेंडी ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP