दुसर्या बाजीरावाचा पोवाडा - दिन असतां आंधार आकाशतळीं ...
पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो.
दिन असतां आंधार आकाशतळीं पडला बाई । विश्वतरंगाकार प्रभुविण शुन्य दिशा दाही ॥ध्रु०॥
च्यारी दिशेमध्यें परमप्रतापी राज्य सबळ भारी । यशध्वज चहुंकडे कितीं या पृथ्वी माझारी ॥ दहशत परराज्यांत न करितां शत्रुवर स्वारी । प्रतिवर्षी घरीं खंडण्या चालुन येती परभारी ॥ केवढा दर्म ज्याचा वाघबकरीं या दरबारीं । एके ठाई जळ प्राशन करिती निरवैर प्रकारीं ॥ विवेक बळ सुविच्यारीं नितीचीं कामें चालती सारीं । यथा धर्म वर्तती प्रज्या आहा आपल्या वयवदरीं ॥(चाल)॥ असें असतां हें विघ्न कसें वाढेविलें लवलाई । फिरली बुद्धी सर्वांची रणांगणीं नेमिली लढाई ॥विश्व०॥ ॥१॥
भर दिपवाळीमध्ये युद्ध चाललें शस्त्राआस्त्रीं । श्रीमंत इंग्रत दळीं किती एक शूर पावले परत्री ॥ त्यांत सखा सर्वज्ञ आतां कधी हरी दाविल नेत्रीं । निजध्यास लागला पडेना चैन दिवसरात्रीं ॥ तेजहीन ह्या प्रजा प्रभुकरितां अंत्री । मूर्तीमंत ये काळी विषय विधवारूपें धरत्री ॥ असंख्य क्षेत्रांमाजी स्वामीची वस्ती कोण्या क्षेत्रीं । वर्तमान आदि अंत न कळे कागदपत्रीं ॥ मुळींच गर्भी श्रीमंत, दुख ठाऊक नाहीं तयासी । टाकुन वनांत त्यास आले सोडुन बाराभाई ॥विश्व०॥ ॥२॥
सुंदर जागोजागी उत्तमोत्तम विलासस्थानें । इंद्रभुवनवात् आरसेमहाल ठाई मयसभेप्रमाणे ॥ कंदिल तरू बिलोरी, पराच मखमाली बिछोने । ते बेमरामत पडले बंद आठरा कारखाने ॥ कुंकुमहीन दक्षिण वनतेचें वदन दैन्यवाणें येक्या प्राण्यावीण दिसती ते देशपरगाणे ॥ उदारचित्तें यथासांग दिधलें पवित्र दानें । तीर्थक्षेत्री वांछित ठेविले विप्र यथामानें ॥(चाल)॥ निर्मळ शशीसारखी आचळ आहे पदरीं पुण्याई । तरीच भेटतील स्वामी येरव्हीं नसे उपाय काहीं ॥विश्व०॥ ॥३॥
आहा विधात्या कैसें अक्षर लिहिलें कपाळीं निराश्रीत सर्वस्वें आसरा नाहीं तिन्ही ताळीं ॥ मोठा काळ कठिण लागलें किती एक रानोमाळीं । कुठवर चिंता वाहावी वियोगानळें ह्रदय जाळी ॥ दुर्धर युद्धप्रसंगें गेली वैर्याची दिपवाळी । जाले आपण परदेशीं करून कोणाचे हवालीं ॥ विचित्र गती, दैवाची वाजती दोही हातीं टाळी । होणारासारखें वर्तलें वर्तमान ते काळीं ॥(चाल)॥ नकळे ईश्वरी सूत्र झाली पाहा पर्वताची राई । नवेंच सर्व निघालें, लोपली मागिल चतुराई ॥विश्व०॥ ॥४॥
पारखी जाहली होऊन आयोध्यापुरी राया हरिश्चंद्राशी ॥ रोहीदास तारामती राणी त्रिवर्ग जाले वनवासी । सत्यधीर भूपती न ढळला किंचित सत्वासी ॥ घेऊन कौसिक पुण्य पावला आपल्या स्वपदासी । असतां श्रीहरी सखा कां तो वनवास पांडवाशीं ॥ काळमहात्म्य विचित्र! असावें सादर भोगासी । विषलिखित जाली प्राप्त विषया त्या यंद्रहासासीं । देशोधडीं फिरविलें कलिनें राया नळाशीं ॥(चाल)॥ अशा पुण्यरूपें नृप न सोडी भोग सर्वाथाई । होनाजी बाळा म्हणे कर्ता हर्ता शेषशाई ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP