अप्रसिद्ध अभंग - अभंग १०३१ ते १०३९
श्रीज्ञानेश्वर महाराजांची गाथा म्हणजे विठ्ठल प्राप्तीचा एक सोपा मार्ग. यात विठ्ठ्लाच्या सगुणनिर्गुण रूपाचे मोहक वर्णन केलेले आहे.
१०३१
अवघा सुखरूप अवघाची रूपीं ।
अवघाची आपी धरूनी ठेला ॥१॥
नाम तें अवघे उच्चारिसी वेगें ।
येर तें वाउगें कर्महीन ॥२॥
निवृत्ति गुरुप्रसादें नामी निमग्न ।
नाम म्हणतां यज्ञ कोटी रया ॥३॥
अर्थ:-
जलस्थलादि सर्व रूपवान पदार्थात परिपूर्ण असा एक आत्मा भरलेला आहे.ईश्वर नामोच्चार करशील तर तूं तद्रुप होशील. ज्यांना ही नामोच्चाराची सोपी वाट कळत नाही. ते कर्महिन समजावे. मी निवृत्तिरायांच्या कृपाप्रसादाने त्या नामस्मरणात दंग होऊन गेलो. त्या भगवंताचे एकवेळ नाम घेतले तरी कोटी यज्ञ केल्याचे पुण्य आहे असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
१०३२
काळे ना सावळे धवळे ना पिवळे ।
घोंगडें निराळे लाधलों मी ॥१॥
मागील रगटें झाडिलें आतां ।
पंढरीनाथा चरणाजवळीं ॥२॥
नवे नवघड हातां आलें ।
दृष्टी पाहें तंव मन हारपले ॥३॥
सहस्र फुलीवरी गोंडा थोरू ।
धडुतें दावी रखुमादेविवरू ॥४॥
अर्थ:-
जे घोंगडे काळे सावळे पांढरे पिवळे इत्यादि कसल्याही रंगाचे नसून जो निर्गुण स्वरूप आहे असे ते निर्गुण स्वरूपाचे चांगले घोंगडे मला मिळाले. त्यामुळे माझ्या जवळचे देहात्मबुद्धिचे रगटे पांडुरंगरायांच्या चरणी ठेवले.बोधाचे चांगले घोंगडे मला मिळाल्यामुळे माझे मन त्या घोंगड्याशी एकरूप होऊन गेले. रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल, ते सहस्र फुली म्हणजे हजारो रंगाचा चित्रविचित्र फुलांचा गोंडा असे ते धडसे घोगडे मला पांडुरंगरायाने दाखवून दिले असे माऊली सांगतात.
१०३३
पूर्वप्राप्ती दैवयोगें पंगु जालों मी अज्ञान ।
विषय बुंथी घेऊनियां त्याचें केलें पोषण ।
चालतां धर्म बापा विसरलों गुह्य ज्ञान ।
अवचटें गुरूमार्गे प्रगट ब्रह्मज्ञान ॥१॥
दाते हो वेग करा कृपाळुवा श्रीहरि ।
समता सर्व भावी शांती क्षमा निर्धारीं ।
सुटेल विषयग्रंथी विहंगम आचारी ॥२॥
शरण रिघे सद्गुरू पायां पांग फिटेल पांचाचा ।
पांगुळलें आपेंआप हा निर्धारू पैं साचा ।
मनामाजीं रूप घाली मी माजी तेथें कैंचा ।
हरपली देहबुद्धि एकाकार शिवाचा ॥३॥
निजबोधे धवळा शुद्ध यावरी आरूढ़ पैं गा ।
क्षीराब्धी बोध वाहे तेथें जाय पां वेगा ।
वासना माझी ऐसी करी परिपूर्ण गंगा ।
नित्य हे ज्ञान घेईं अद्वैत रूपलिंगा ॥४॥
पावन होशी आधी पांग फिटेल जन्माचा ।
अंधपंग विषयग्रंथी पावन होशील साचा ।
पांडुरंग होसी आधीं फळ पीक जन्माचा ।
दुष्ट बुद्धि वेगी टाकी टाहो करी नामाचा ॥५॥
ज्ञानदेव पंगुपणे पांगुळली वासना ।
मुराले ब्रह्मीं मन ज्ञेय ज्ञाता पुरातना ।
दृश्य हे लोपलें बापा परती नारायणा ।
निवृत्ति गुरू माझा लागो त्याच्या चरणा ॥६॥
अर्थ:-
पुर्वजन्मी संपादन केलेली कर्मे हेच जे दैव त्या योगाने मला अज्ञान हाच कोणी पंगुपणा आला. पुढे विषयांचा बुरखा घेऊन त्या ज्ञानाचे मी पोषण केले. जरी स्वधर्माचरणाप्रमाणे मी वागत होतो. तरी त्यामध्ये आत्मज्ञानाचा विसरच पडला. पण माझ्या पूर्व पुण्याईमुळे मला सद्गुरूंची भेट झाली.त्यामुळे त्यांच्या उपदेशाने मला ब्रह्मज्ञान प्राप्त झाले. तुम्ही लवकर या दयाळू, श्रीहरिला प्राप्त करून घेण्याकरिता प्रयत्न करा. प्रयत्न करीत असतां सर्व ठिकाणी एक परमात्माच भरला आहे, अशी मनामध्ये समता ठेवा. तसेच निर्धाराने शांती क्षमा मनामध्ये धारण करा, त्यामुळे चित्त व विषय यांची बसलेली गाठ सुटून जाईल. म्हणजे चित्तातील विषय दूर होतील. पक्षी जसा आकाशांमध्ये जलद भ्रमण करतो. त्याप्रमाणे तुम्ही ज्ञानप्राप्तीचा प्रयत्न करा. तो प्रयल स्वबुद्धिने न करता सद्गुरूंना अनन्यभावाने शरण जाऊन त्यांच्या सांगण्याप्रमाणे करा म्हणजे तुम्ही पंच विषयाच्या तावडीतून सुटाल असे झाले म्हणजे आपोआपच देहांतील वासना बंद पडतील.याकरिता मनामध्ये श्रीहरिचे रूप धारण करा. म्हणजे तुमच्या ठिकाणची हा मी आहे व हे माझे आहेत. अशा त-हेची जी देहमूलक अहंमम बुद्धि ती नाहीशी होऊन तुम्ही शिवरूपच व्हाल. म्हणून परमात्माबोध हाच एक शुद्ध पांढरा नंदी त्यावर बसून क्षीराब्धीमध्ये वास करणाऱ्या परमात्मरूपी लिंगाच्या भेटीला त्वरित जा म्हणजे जी परमात्मप्राप्तीची वासना ती गंगेप्रमाणे परिपूर्ण होऊन जाईल. एवढ्याकरिता सतत आत्मज्ञानाचे चिंतन करून अद्वैतरूप लिंगाची प्राप्ती करून घे. त्यामुळे अनंत जन्माच्या संकटातून तूं मुक्त होशील. तसेच तुझे अंधत्व म्हणजे ज्ञानशून्यता पंगुत्व म्हणजे पांगळेपणा हे धर्म जाऊन विषयांची ग्रंथी सुटून जाईल.आणि त्यामुळे पवित्र होऊन जाशील इतकेच काय तूं पांडुरंगस्वरूप होशील व तुझ्या जन्माचे साफल्य होईल. याकरिता दुष्ट बुद्धि टाकून देऊन हरिनामाचा मोठ्याने टाहो फोड.वरीलप्रमाणे श्रीगुरूला शरण जाऊन आम्ही आत्मज्ञान प्राप्त करून घेतले. त्यामुळे आमची वासना पांगळी झाली. त्याचबरोबर अनादि जे परब्रह्म त्याचे ठिकाणी मन व ज्ञाता ज्ञेय हे सर्व धर्म नाहीसे होऊन गेले. दृश्य जगताचा मिथ्यात्वनिश्चय झाल्यामुळे त्याचा लय नारायण स्वरूपामध्ये झाला हे ज्या श्रीगुरू निवृत्तीरायांच्या कृपेने घडले. त्यांच्या चरणाला मी अनन्यभावाने वंदन करतो. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
१०३४
पौर्णिमेच्या दिनी चंद्र अकळी जाहला ।
आमावास्ये ठेला पूर्ण कळी ॥१॥
देखिलें गे माय विचित्र विलक्षण ।
जाहलें स्वप्नभान जागृतीशी ॥२॥
मातेचिये पोटी पिता तो जन्मला ।
नवलाव जाहला काय सांगो ॥३॥
मश्यकें ओलांडीला स्वये मेरुगिरी ।
दहनाच्या पाठारी पीक जाहले ॥४॥
चंचूच्या सांडशे पक्षी घेते पाणी ।
सिंधुशी गिळुनी बैसिन्नला ।
बापरखुमादेविवर विठ्ठलची जाणे ।
परब्रह्म अनुभवणे परब्रह्म ॥५॥
अर्थ:-
ज्याप्रमाणे चंद्र हा प्रकाशमान आहे. त्याप्रमाणे जीव मूळचा स्वप्रकाशमान आहे. जशी अमावस्येची रात्र ही अंधकाररुप आहे. त्याप्रमाणे अंधकार म्हणजे आवरणात्मक अविद्यारुपी रात्रीमध्ये जीवरुपी चंद्रकलाहीन म्हणजे स्वस्वरुपज्ञानरहित होतो. परंतु पूर्वपुण्योदयाने सद्गुरु उपदेशजन्य बोधरुपी पौर्णिमेच्या दिवसी जीवरुपी चंद्र पूर्ण कलेने ज्ञानसंपन्न होतो. व त्यामुळे त्या ज्ञानी पुरुषाला ही जागृति स्वप्नसमान प्रतितीला येते. असे हे मोठे विलक्षण झालेले मी पाहिले. जीवांची आई जी माया तिच्या पोटी ब्रह्मच, जीवांचा बाप असलेला ईश्वर जन्मला. हा नवलावा काय सांगावा? चिलटाने मेरु पर्वत ओलांडावा किंवा अग्नी पठारांवर पीक यावे त्याप्रमाणे हे आश्चर्य घडलें याचा भाव असा आहे की अहंकार हा मेरु पर्वताप्रमाणे असून त्याला ओलांडले असे होय. चिंतारुपी अग्नीचे पठार म्हणजे अंतःकरण त्यांत बोधरुपी पीक येणे ही नवलाची गोष्ट आहे. चोचीने पाणी घेण्याचे ज्या पक्षाचे काम आहे अशा पक्षाने समुद्र गिळून टाकावा तद्वत सामर्थ्यरहित अशा जीवांनी अगाध असलेल्या परमात्म्यालाआपल्यी हृदयांत साठविले. तात्त्विकदृष्ट्या माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांना जाणल्याखेरीज परब्रह्मस्वरुपचा अनुभव घेतल्यावांचून जीव ब्रह्मरुप होणार नाही. असे माऊली सांगतात.
१०३५
उगमेवीण पाणी वाहते सारणीं ।
शिंपिती माळिणी वेळोंवेळा ॥१॥
नसे माळिणीचा मळा नसे सरोवर तळे ।
नित्य वेळोंवेळो फुलतसे ॥२॥
ज्ञानदेव म्हणे ही खूण जाणा ।
षण्मास सुजाणा सूटि दिली ॥३॥
अर्थ:-
सृष्टिदृष्टीवादांतून जगताची उत्पत्ति मायेपासून झालेली आहे असा वेदांतशास्त्राचा सिद्धांत आहे. परंतु माऊली या अभंगातून या सिद्धांताचे खंडण करतात. कारण मायारुपीसरोवरांतून जगद्रूपी पाणी, अनादि प्रवाहरुपी पाटातून वाहात आहे. व कल्पनारुपी माळीण त्या पाण्याने जन्ममरणरुपी मळ्याला सिंचन करीत आहे. व तो मळा अत्यंत प्रफुल्लित झालेला आहे, असे वाटते. परंतु विचार केला तर अजातवादाच्या दृष्टिने मायारुपी सरोवर नाही. व कल्पनारुपी माळीण नाही. म्हणूनच जन्ममरणरुपी मळाही नाही. हे सूज्ञ मनुष्या तुला या कोड्याचा उलगडा करण्याविषयी सहा महिन्याची मुदत दिली आहे.असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
१०३६
कासवीचे तूप जेवी ।
आकाश घालीपां पेवीं ।
वांझेचे बाळ खेळवी ।
रूदना करी रया ॥१॥
पाहे या नवल चोज ।
म्यां देखिलें पां मज ।
गुह्यांचें गुज ।
जाण रे मना ॥२॥
मृगजळें सागर भला ।
डोंगरे ओणवा विझविला ।
समुद्र तान्हेला ।
जीवनालागीं ॥३॥
ज्ञानदेव ऐसें म्हणें ।
कापुराची मैस घेणें ।
दुधावीण सांजवणें ।
भरलें दिसे ॥४॥
अर्थ:-
कासवीला वास्तविक दूध नसून तिची कृपादृष्टि नी आपल्या पिलांना पोसते. तद्वत् श्रीगुरूमाऊलीला दूध नसून तिचे कृपादृष्टीरुपी दूधानें परमात्मरूपी तूपाचे जेवण ती साधकाला घालते. या न्यायाने ज्याप्रमाणे कासवीचे म्हणजे सद्गुरूरुषी माऊलीचे कृपादृष्टिने परमात्मरूपी तूप त्याचे जेवण करवून पेव जसे खोल असते. त्याप्रमाणे कळण्यास अत्यंत खोल असलेला परमात्मा त्याचे ठिकाणी आकाशादि सर्व बाधीत करून अजातवादांत माया व तत्कार्य प्रपंच असणे शक्य नाही. तरीपण विवर्तवादांचे दृष्टिने तिने जगत केले म्हणजे वांझेचा बाळ असलेला प्रमाता तो परमात्मसुखाविषयी रूदन करीत असतांना त्या सद्गुरू माऊलीने परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी खेळविलेे. हे कसे आश्चर्य आहे पहा मी आपले स्वरूपाला पाहून गुह्यांचे जे गुह्य परमात्मा त्याला मनाने जाणले त्यामुळे मृगजळाप्रमाणे क्षणिक असलेल्या विषयसुखाविषयी विषयाचा बाध करून सुखाचा समुद्र केला. त्यामुळे डोंगराप्रमाणे अफाट असलेल्या परमात्मज्ञानाने जीवाला जो प्रपंचाचा वणवा लागला होता. तो विजवून टांकून जो परमात्मा त्याची त्याला तहान लागली होती. त्याला परमात्मरूपी जीवनाचा समुद्रच केला. शुद्ध कापुराचे ठिकाणी काजळी घेणे. किंवा दूधावांचून रांजण दूधाने भरणे शक्य नाही. तद्वत् शुद्ध परमात्मरूपी कापुराचे ठिकाणी जीवदशारूपी काजळी धरणे किंवा जीव मूळचा परमात्मस्वरूप असतांना परमात्मरूप होणे शक्य नाही. तो तात्त्विक दृष्टिने जीव नसुन मूळचाच परमात्मरूप आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
१०३७
आरेवरी आर रे पिंपळावरी पार रे ।
खाली कुंभार वरी चाक भोवे ॥१॥
डंबडाळकें उंबरासी वाळकें ।
पिंपळासी काकड्या लागल्या रे ॥२॥
पैल वरले माळी कोल्हा करड काढी ।
ससा वळीतो वेठी रे ॥३॥
निवृत्तीप्रसादे ज्ञानदेव म्हणे ।
गुरुमहिमा अनुभववीण जाणती रे ॥४॥
अर्थ:-
वेदांत मतात कांहीच्या मताने माया स्वाश्रया व स्वविषया मानली आहे. तर कांहीनी जीवाश्रित मानून ब्रह्माला विषय करते असे मानलेले आहे. त्यापैकी स्वाश्रया व स्वविषया असे ज्या मतांत मानले, त्यांचे मताने परमात्मस्वरुपी एक भोवरा मानून, भोवऱ्याच्या एका भागांवर आर असते त्याप्रमाणे, परमात्म्याच्या एका भागावर मायारुपी आर मानून तिने जगतरुपी दुसरी आर ठेवली आहे. म्हणजे आरेवरी आर
असून तिच्यापेक्षाही परिच्छिन्न असलेले जगतरुपी दुसरी आर करुन परमात्मरुपी च पिंपळावर विश्रांती करिता जगतरुपी पार बांधून, कुंभाराचे चाकाप्रमाणे त्याचे भ्रमण चालू केले. तेव्हा ते जगतरुपी चाकाचे भ्रमण परमात्मरुपी कुंभाराच्या अधिष्ठानावरच चालते.डंबडाळके म्हणजे ते जगतरुपी चक्र फार मोठे असून मनाने देखील त्याचे चिंतन करता येत नाही. मनसाऽपिअचित्यरचनारुपस्य, असे श्री शंकराचार्यानी ब्रह्मसूत्र भाष्यांत म्हटले आहे. उंबरासी झाड म्हणण्यांत त्या झाडाखाली परमात्म्याचे वास्तव्य असते. व तेथे तो साधनानुष्ठानाने उपलब्धही होतो त्याप्रमाणे नरदेहरुपी उंबराचे झाड असून त्या शरीरांत परमात्म्याचे वास्तव्य असून एऱ्हवी सर्वांच्या हृदयदेशी ।
मी आमुका आहे ऐसी’ त्या शरीरांत त्याची उपलब्धी होते. वाळके ही तृप्ततेचे साधन आहेत. त्याप्रमाणे विवेक वैराग्यादि तृप्ततेचे साधने आहेत. म्हणून त्या शरीररुपी उंबराची ती वाळके आहेत. त्याच प्रमाणे पिंपळ हे परमात्म्यांचे वस्तीचे स्थान असून, उपलब्धिचेही स्थान आहे. तद्वत् नरदेह असून काकड्या ह्याही उन्हाने तापलेल्या जीवाला शांती देणाऱ्या आहेत त्याप्रमाणे नरदेहरुपी पिंपळाला लागलेल्या शांती क्षमा दया किंवा नवविधा भक्तिरुपी काकड्या संसार तापाने तापलेल्या जीवाला शांत करणाऱ्या आहेत म्हणून पिंपळाशी काकड्या लागल्यारे’ म्हणण्यास हरकत नाही.माळी या शब्दांने तत्सबंधी बागायित जमीन त्याचे वर पलीकडे माळरान असते. त्याप्रमाणे जीवरुपी माळी तत्सबंधी जे सधर्मक अंतःकरण त्यांत पापपुण्याचे पीक परंतु त्याचे पलीकडे म्हणजे जीवदशेच्या पलीकडे माळरान म्हणजे शुद्ध परमात्मा, त्या स्वरुपाचे ठिकाणी, जसा कोल्हा चतुर असतो त्याप्रमाणे चतुर जो मुमुक्ष तो तेथील’ करड’ म्हणजे पापपुण्य काढून परमात्मरुप होतो. पापपुण्यं विधूय निरंजनसाम्यमुपैति’ ससा हा मंदगतिमान असतो. त्याप्रमाणे मंद मुमुक्षु आपले मूलाबाळांवर विखुरलेले प्रेम वळवून परमात्म्याकडे लावतो. व त्या योगाने तो कृतार्थ ही होतो. या कोड्याचे रहस्य मला श्रीगुरु निवृत्तिरायांच्या कृपाप्रसादाने कळले. त्यांच्या कृपाप्रसादा वांचून अनुभव येणे शक्य नाही. व अनुभवावांचून हे जाणणे शक्य नाही. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
१०३८
भावाची मी सौरी जाले ।
गेले संतापाशीं ।
ज्ञानखड्ग घेउनि हातीं लिंगदेही नाशी ॥१॥
चाल माझी विठो ।
तुम्ही आम्ही भेटो ॥धृ॥
तीन माचवे पाच गाते ।
त्यावर निजले होते ।
फटफटीत उजेड खाटले पडले रिते ॥३॥
कर्म नेणे धर्म नेणे नेणे आणिक कांही ।
ज्ञानदेव म्हणे आम्हां येणे जाणें नाहीं ॥४॥
अर्थ:-
परमात्म्याविषयी मनांत भाव धारण करुन मी सौरी झाले व संतांपाशी गेले. त्यांनी दिलेले ज्ञानरुपी खड्ग हातांत धारण करुन मी माझ्या लिंगदेहाचा नाश केला. विठोबा चल, तुम्ही व आम्ही एकत्र भेटू पंचमहाभूताचें व त्रिगुणात्मक शरीररुपी माचव्यावर मी झोपले होते. व याच नादांत स्वानुभूतीचा फटफटीत उजेड पडला. व माझे खाट रिकामी झाली. व त्यामुळे ऐक्यरुपाची अवस्था झाली. आम्ही या श्रीविठ्ठलावांचून दुसरे कर्मधर्मादि कांही जाणत नाहीं व आम्हास यापुढे जन्म मरणाचा त्रासही नाही. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
१०३९
तुझी आण वाहिन गा देवराया ।
बहु आवडसी जीवापांसूनिया ॥१॥
कानडिया विठोबा कानडिया ।
बहु आवडसी जीवापांसूनिया ॥२॥
बापरखुमादेविवरु विठ्ठलुराया ।
बहु आवडसी जीवापांसूनिया ॥३॥
अर्थ:-
हे देवराया मी तुझी शपथ घेऊन सांगतो तूं मला माझ्या जीवापेक्षाही अधिक आवडत आहेस. वास्तविक तूं भावभक्तिवांचून कळण्यास अत्यंत कठीण असा आहे. म्हणून मला मात्र श्रीविठ्ठला तूं अंतःकरणापासून म्हणजे भावभक्तिमूलक आवडत आहेस. माझे पिता व रखुमाईचे पती जे श्रीविठ्ठल मला अत्यंत जीवापासून आवडत आहेत असे माऊली सांगतात.
श्रीज्ञानेश्वरांची गाथा समाप्त
॥ पुंडलीक वरदे हरिविठ्ठल ॥
N/A
References : N/A
Last Updated : September 09, 2026

TOP