अप्रसिद्ध अभंग - अभंग ९६१ ते ९७०
श्रीज्ञानेश्वर महाराजांची गाथा म्हणजे विठ्ठल प्राप्तीचा एक सोपा मार्ग. यात विठ्ठ्लाच्या सगुणनिर्गुण रूपाचे मोहक वर्णन केलेले आहे.
९६१
सरिता येऊनियां चढती ब्रह्मगिरी ।
परी ज्ञानी न धरी जन्म कांहीं ॥१॥
चंदनासी होय बाभुळत्व प्राप्ती ।
परी ज्ञानी शिवती जन्म कांहीं ॥२॥
जळाला कापूर मागुता प्रकटे ।
परी ज्ञानिया न घडे जन्म कांहीं ॥३॥
वारा वागुरेसी धरूनी कोंडुंये ।
परी ज्ञानी नसये जन्म कांहीं ॥४॥
ज्ञानी ज्ञानेश्वर मिळोनियां गेला ।
मरण्या जिण्या झाला वेगळाची ॥५॥
अर्थ:-
ब्रह्मज्ञानी पुरूषाला पुनर्जन्म नसतो जर वाहात चाललेल्या नद्या उलट पर्वतांवर चढतील तर ज्ञानी पुरूषाला जन्म येईल. चंदनाच्या झाडाला जर बाभूळीचे रूप येईल जळलेला कापूर जर पुन्हा पहिल्यासारखा दिसेल अथवा वारा जर जाळ्यांत सापडेल तर ज्ञानी पुरूषाला पुन्हा जन्माला यावे लागेल तात्पर्य ब्रह्मज्ञानी पुरुषाला पुन्हा पुनर्जन्म प्राप्ती नाही. आम्ही ज्ञानवान झाल्यामुळे जन्ममरणातून मुक्त झालो. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.
९६२
अग्निच्या पाठारीं पिके जरी पिक ।
तरी ज्ञानी सुखदुःख भोगितील ॥१॥
काळोखामाजी जैसे शून्य हारपे ।
मायोपाधि लोपे तया ज्ञानी ॥२॥
नक्षत्रांच्या तेजें जरी इंदु पळे ।
तरी ज्ञानी विकळे पुण्यपाप ॥३॥
बापरखुमादेविवर विठ्ठलु राया ।
घोटुनियां माया राहियला ॥४॥
अर्थ:-
जसे अग्निच्या डोंगरावरील सपाटीवर पीक येणे शक्य नाही त्याप्रमाणे ब्रह्मज्ञानी पुरूषाला सुखदुःखाचा भोग होणे शक्य नाही. काळोखात जसे काही दिसत नाही. त्याप्रमाणे ज्ञानी पुरूषाची मायारूप उपाधी नाहीसी होते. जर नक्षत्रांच्या तेजाने चंद्र लोपून गेला असता तर ज्ञान्याला पापपुण्य लागले असते. माझे पिता व रखुमाईचे पती हे विठुराया,तो ब्रह्मज्ञानी पुरूष मायेचा निरास करून राहिलेला असतो. त्यामुळे त्याला जन्म येणे शक्य नाही. असे माऊली सांगतात.
९६३
पुण्य जोडुनियां स्वर्गासी जाईजे ।
पापासी सेविजे अधोगती ॥१॥
दानधर्म करी भोग इहलोक ।
त्रिविधही एक रूप जाण ॥२॥
पाचच विषय त्रिभुवनीं असती ।
सर्वही भोगिती जीव शीव ॥३॥
दृश्य एक चुळे घोटुनी बैसला ।
ज्ञानदेव धाला आत्मयोगें ॥४॥
अर्थ:-
पुण्य संपादन करून जीव स्वर्गात जातो. पापाचरण करून तो नरकाला जातो. दानधर्म करून इहलोकीचे भोग भोगतो. पण तिघांचा प्रकार एकच आहे.कारण कोठल्याही लोकांत गेला तरी शब्द, स्पर्श, रूप, रस, आणि गंध हे पाचच विषय असतात. जीव या पांचाचाच भोग घेत असतो. ब्रह्मज्ञानाच्या योगाने सर्व विषयांना मी चुळीसारखा घोट भरून टाकला. म्हणजे मिथ्यात्व निश्चय केला त्यामुळे आम्ही ब्रह्मानंदात आहोत. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
९६४
दुर्जनाच्या संगें दुर्जनत्व प्राप्ती ।
कैंचि त्या विश्रांती साधकाशी ॥१॥
सज्जन संगती करिता तेंचि रूप ।
आनंदाचा दीप बाणताती ॥२॥
दुर्जनाशी दिसे सर्व सृष्टी बद्ध ।
न दिसे कांहीं शुद्ध सर्वथैव ॥३॥
सज्जनांसी भासे विश्व पूर्ण मुक्तएकत्वी आसक्त न दिसती ॥४॥
सज्जनादुर्जनातीत जे निर्जन ।
तेथे संमर्जन ज्ञानेश्वर ॥५॥
अर्थ:-
दुर्जनांच्या संगतीने दुर्जनत्व येते. मग अशा संगतीने साधकाला विश्रांती मिळणार कशी. सज्जनाच्या संगतीने सज्जनपणा येऊन ते आनंदाची प्राप्ती करून देतात. दुर्जन मनुष्याला सर्व जग बद्धच आहे असे वाटते. त्याला जगात शुद्ध असे कांही दिसतच नाही. सज्जनाला सारे जगत मुक्त असे वाटते. ‘देखे आपुली प्रतिती जगचि मुक्त’ या माऊलीच्या म्हणण्याप्रमाणे एकसारखे आसक्त दिसत नाही.सज्जन दुर्जनांच्या दृष्टीच्याही पलीकडे जे निर्जन त्या अवस्थेला आम्ही प्राप्त झालो.
असे माऊली ज्ञानेश्वर म्हणतात.
९६५
मायिक हे सृष्टि कल्पिक जाहली ।
अनादि घडली जाणिजेसु ॥१॥
देहभास नित्य नूतन भासती ।
शुद्ध स्वयं ज्योति जुनाटची ॥२॥
माया अविद्या दोन्ही उपाधि करूनी ।
जीवशीव दोन्ही भिन्न जाले ॥३॥
अनादि अज्ञान बंध नये यासी ।
गुरुकृपा त्यासी छेदिजे की ॥४॥
अनुभवयोगें जाणुनी ज्ञानेश्वरहा भवसागर उतरला ॥५॥
अर्थ:-
मायेने घडविलेली व जीवाच्या कल्पनेत झालेली अशी ही सृष्टी अनादी कालापासून आहे असे समज. देहभाव मात्र प्रत्येक जन्मात वेगळा व नवाच वाटतो परंतु त्यातील आत्मतत्त्व नित्य शुद्ध व जुनाटच आहे माया व अविद्या या दोन वेगळाल्या उपाधिमुळे शुद्ध ब्रह्मच जीव व शीव या रूपांनी वेगळे वाटतात. परमात्मस्वरूप असलेले जीव शीवांना वास्तव अज्ञानाचे बंधन नाही. पण मानले तर सद्गुरूकृपा संपादन करून त्याचा छेद कर. परमात्मानुभवाने मी हा भवसागर उतरून गेलो. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.
९६६
जन्ममरणांतें नाहींच गणित ।
सूर्य जैसा होत उदय अस्त ॥१॥
वासनेच्या योगें न निमे कल्पना ।
याचि लागी नाना योनी भोगी ॥२॥
पापपुण्य दोन्ही साठवीत आहे ।
असुयेशी जाये अधउर्ध्व ॥३॥
समत्वें इहींचि जाण जन्म घरीं ।
आथी इयेपरी तिन्हींजेसु ॥४॥
त्रिभुवनाहुनि राहिला निराळा ।
ज्ञानेश्वरी लीला निरंजनीं ॥५॥
अर्थ:-
जीवांना सूर्याच्या उदयास्ताप्रमाणे किती जन्म होतात याची गणतीच नाही. कारण अनादि अनंत वासनेच्या योगाने जन्ममरणाची कल्पना नाहीसी होत नाही. म्हणून नाना योनीत जन्म घेऊन पापपुण्याचा साठा करतात. आणि प्राणाच्या सहाय्याने स्वर्ग नरकाला जातात व पापपुण्य समानतेने मनुष्य जन्म घेतात. असे जन्माचे तीन प्रकार आहेत. आम्ही गुरूकृपेने पापपुण्यातीत झाल्यामुळे स्वर्गनरक व मनुष्यजन्म याहून मुक्त झालो, आता आम्ही ब्रह्मनंदामध्ये लीला करीत राहू.असे माऊली ज्ञाऩेश्वर सांगतात.
९६७
ब्रह्म जयाचिये बोधेंचि पावत ।
ते जगीं शाश्वत गुरुमूर्ति ॥१॥
शब्दज्ञानें जया गुरू उपदेशिती ।
नाही त्यासी मुक्ति कदाकाळी ॥२॥
संसारी तरोनी शिष्यासी तारिती ।
तेचि मानिजेति गुरू एक ॥३॥
काम क्रोध लोभ जे का न शिवती ।
तेची ओळखी सद्गुरू जाण ॥४॥
ज्याशी नाही भेद ब्रह्मीं एकाकार ।
म्हणे ज्ञानेश्वर तोचि गुरू ॥५॥
अर्थ:-
ज्याच्या बोधाने ब्रह्मप्राप्ती होते. तीच जगांत सत्य गुरूमूर्ति होय. शब्दज्ञानी याला उपदेश करतात, त्याला केंव्हाही मुक्ति प्राप्त होणार नाही. आपण संसारातुन तरून जे शिष्यांनाही तारतात. अशा पुरूषालाच जाणते लोक गुरू समजतात. ज्यांना काम, क्रोध वगैरे विकार स्पर्श करू शकत नाहीत असल्या सदगुरूंना ओळखण्याची हीच खूण समज.ज्याच्या ठिकाणी भेदबुद्धि नसून सर्वत्र ब्रह्मदृष्टि असेल त्यांनाच सद्गुरू असे समजावे.असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.
९६८
सद्गुरूवांचूनी संसारी तारक ।
नसेचि निष्टंक आन कोण्ही ॥१॥
इंद्र चंद्र देव ब्रह्मांदी करूनी ।
संशयाची श्रेणी छेदती ना ॥२॥
उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ति ।
पुरविती आर्ती शिष्याचिया ॥३॥
वंचना करिती जन दुष्ट नष्ट ।
मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताती ॥४॥
ज्ञानदेव म्हणे गुरूचा मी दास ।
नेणें साधनास आन कांहीं ॥५॥
अर्थ:-
सद्गुरूवांचून संसार समुद्रातून तारून नेणारा निःसंशय दुसरा कोणी नाही.इंद्र चंद्र ब्रह्मदेव इत्यादि देव असले तरी ते शिष्याच्या ठिकाणचा संशय दूर करू शकणार नाहीत. सद्गुरू हे साक्षात् परब्रह्मच असून ते आपल्या शिष्याची ‘सदिच्छा पूर्ण करतात. असा सद्गुरूंचा अधिकार न कळल्यामुळे मूर्ख लोक त्यांची निंदा करतात. पण जाणते पुरूष मात्र त्यांना त्याचा अधिकार ओळखून वंदनच करतात. मी माझ्या सद्गुरूंचा एकनिष्ठ सेवक आहे त्यांच्या सेवेशिवाय इतर साधने करण्याचे मला माहीत नाही. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.
९६९
रजापासूनियां जाहली उत्पत्ति ।
सत्त्वगुणीं स्थिति वाढविती ॥१॥
तमोगुणें करूनी पाविजे मरण ।
राहाटती त्रिगुण जगामाजीं ॥२॥
त्रिगुण त्यजुनी व्हावे निस्त्रेगुण ।
नाचरावे पुण्यपाप काहीं ॥३॥
तरीच ब्रह्मज्ञान गुरूकृपाप्राप्ती ।
जिता जिवन्मुक्ती ज्ञानेश्वर ॥४॥
अर्थ:-
ब्रह्मदेव रजोगुणाने जगाची उत्पत्ति करतो. विष्णु सत्त्वगुणाच्या योगाने स्थिति वाढवते. शंकर तमोगुणाच्या योगाने नाश करतो अशी त्रिगुणापासून जगाची राहाटी आहे. त्रिगुण टाकून देऊन त्रिगुणाच्या पलीकडे व्हावे. व त्याकरिता पापपुण्यजनक कर्माचे आचरण करू नये. अशी तुमची वागणूक झाली तरच गुरूकृपा होऊन तुम्हाला जीवंतपणीच मुक्तीच्या सुखाचा अनुभव मिळेल. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.
९७०
साभिमानें करुनी व्यर्थ कारे फुगशी ।
मत्त ऐसा होसी मतिमंदा ॥१॥
सर्वब्रह्मरुप हे खूण ओळखीं ।
भिन्नपण टाकीं निश्चयेंसी ॥२॥
मान अपमान तुज कांही नाहीं ।
तूं तंव विदेहीनित्य शुध्द ॥३॥
प्रारब्धानें देह भोगिता हे भोग ।
कासया रे सांग भ्रांती तुज ॥४॥
साधोनी अपरोक्ष वस्तु सर्वगत ।
ज्ञानेश्वर म्हणत राजयोंगी ॥५॥
अर्थ:-
हे मंदमति पुरुष तूं कर्तृत्व भोर्तृत्वाने उन्मत्त होऊन अहंकाराने व्यर्थ का फुगतोस त्या ऐवजी सर्व जगत ब्रह्मरुप आहे असा अव्दैत भाव प्राप्त करुन व्दैत भाव टाकून दे.मान अपमान धर्म देहाचे आहेत हा धर्म तुझा नाही तू त्या देहाहून भिन्न ब्रह्मरुप आहेस. प्रारब्धाने भोग भोगीत असताना तुला आपलेपणाचा भ्रम कशाला. सर्व व्यापकत्वाने ब्रह्माचे अपरोक्ष ज्ञान ज्याला झाले तोच राजयोगी होय असे ज्ञानेश्वर महाराज सांगतात
N/A
References : N/A
Last Updated : September 09, 2026

TOP