३११
हस्ती घोडे हरण सिंहाडे ।
तैसे हें गुजराति लुगडें गे माये ॥१॥
पालव मिरवित जाईन ।
शेला पदरीं धरुनि राहीन ॥२॥
बापरखुमादेविवरु विठ्ठलु सांवळा ।
तेणें मन माजिठा दिल्हा साउला ॥३॥
३१२
एकतत्त्व साधि तंव हारपलों तेथें ।
मज पाहतां येथें मी नाहीं ॥१॥
काय करुं सांगा कैसा हा आकळे ।
एकतत्त्वीं मिळे ह्रदयींगे बाईये ॥२॥
संपादनी नट नटोनियां हरि ।
एकरुपें करि आपण्या ऐसें ॥३॥
ज्ञानदेवींच तत्त्वसार हरी ।
चित्तानु लहरी झेपावली ॥४॥
३१३
आपुलेनि भारें श्रीरंग डोलत गेलें ।
तंव अवचितें पाचारिलें पाठिमोरें ॥१॥
माझें चैतन्य चोरिलें चैतन्य चोरिलें ।
अवघे पारुषलें दीन देहे ॥२॥
बापरखुमादेविवरु दिनानाथ भेटला ।
विठ्ठल विठ्ठल झाला देह माझा ॥३॥
३१४
उन्मनि अवस्था लागली निशाणी ।
तन्मयता ध्यानीं मुनीजनां ॥१॥
मन तेथें नाहीं पहासी तें काई ।
सर्व हरि डोहीं बुडी दे कां ॥२॥
मनाची कल्पना देहाची भावना ।
शून्य ते वासना हरिमाजी ॥३॥
निवृत्ति म्हणे सर्व हरिपीक फ़ळलें ।
ज्ञानासी लाधलें हरि कृपा ॥४॥
३१५
तुजमाजी विरावें तुज गिळूनि राहावें ।
तुझें रुप पाहावें रुपेंविण ॥१॥
तूंतें अवघें गुज म्यां सांगावें ।
वाचेविण बोलावें नि:शब्दाकारें ॥२॥
रखुमादेविवरु वाचे विनविला ।
प्रसन्न जाला ब्रह्म दाउनी ॥३॥
३१६
कमळावरी कमळ ठेवुनी उल्हाटे ।
कमळीं कमळ उफ़राटेंगे माय ॥१॥
वासना निरसिलिये ।
ब्रह्मकमळीं उगवलीयेगे बाईये ॥२॥
कारण कामातें करुनि आपैते ।
महाकारण तें गगना परौतें गे बाईये ॥३॥
बापरखुमादेविवर विठ्ठल तेजसु ।
ब्रह्मकमळीं दाविता प्रकाशुगे बाईये ॥४॥
३१७
निरखित निरखित गेलिये ।
पाहे तंव तन्मय जालिये ॥१॥
उन्मनीं मन निवालें ।
सावळें परब्रह्म भासलें ॥२॥
रुप येवोनियां डोळां बैसलें ।
पाहें तंव परब्रह्म आतलें ॥३॥
बापरखुमादेविवरें विठ्ठलें ।
मुस ओतुनि मेण सांडिलें ॥४॥
३१८
सदैवपण आलें गोपाळातें देखिलें ।
लक्षा एका जोडलें अमित्य गुणीं वो माय ॥१॥
दैन्याचे सांकडीपासूनि वेगळालें ।
पैं जवळी बैसविलें आनंदपदीं वो माय ॥२॥
जागृतिशेवटीं निद्राभुली नुठी ।
म्यां प्रपंचासी मिठी दिधली वो माय ॥३॥
मागुती नको परतणी या शरीरीं उरवणी ।
प्रपंचाची काहाणी निमाली वो माय ॥४॥
सदोदीत भरलें त्या तिहीं गुणां वेगळें ।
तें अगणित वर्षलें प्रेमधारीं वो माय ॥५॥
सबराभरित भरला या देहाभावा वेगळा ।
रखुमादेविवरु जवळी जोडला वो माय ॥६॥
३१९
निरालंब स्तंब घातला निजयोगु ।
साहि वेगळेसि वो माय ॥१॥
आणिकां न कळे तें त्रिगुणां वेगळें ।
तें मज गोवळें दावियलें वो माय ॥२॥
दुर्घट घडतां न वर्णवे योग्यता ।
मज पुढारी वो माय ॥३॥
खुणा जरी बोलों तरी मौन्य पडलें ।
तें परब्रह्मीं उघडलें दिव्यचक्षु वो माय ॥४॥
तो चिदानंदु पुतळा रखुमाई जवळा ।
सोईरा सकळांसहित वो माय ॥५॥
३२०
दिप दिगांतरीं दिपीं पाहातां ।
परेहुनि परता तो देखिला वो माय ॥१॥
पाहीन मी आतां निरंजन स्वरुपता ।
त्यानें मज तत्त्वतां चोजविलें वो माय ॥२॥
देहाचा दिवा उजळुनि ज्ञानज्योति ।
परपुरुषीं निवृत्ति झाली वो माय ॥३॥
कवळुनि भेटी प्राणेंसि देईन मिठी ।
मी नि:शब्देंसी गोष्टी सांगेन वो माय ॥४॥
निजभावें निरोपिला सच्चिदानंदपदीं ।
मग मज परमानंदी गोष्टी
जोडली वो माय ॥५॥
ऐसें मीं अनुसरलें यानें आपंगिलें ।
रखुमादेविवरु विठ्ठलें वो माय ॥६॥
३२१
दीनपण दवडूनि दिनानाथें मेळविलें ।
ते येणें गोपाळें केलें रुप नवल वो माये ॥१॥
पाहातां पारणीं फ़िटली चक्षूंची ।
सर्व आवडीची कोथळी लाधली वो माये ॥२॥
आतां असो हे भरोवरी सांगणें या शरीरीं ।
उगवलें अंतरी दृष्टीचिया वो माय ॥३॥
गुण गिर्हाईक जोडला अमोल मोलें घेतला ।
रखुमादेविवर विठ्ठल वो माय ॥४॥
३२२
देहधर्मी काज गुरुराज चित्तीं ।
तरीच या संपत्ती फ़ळद होती ॥१॥
तैसें तुझें ध्यान करितां उध्दट ।
सांपडली वाट वैकुंठीची ॥२॥
ज्ञेय ज्ञाता ज्ञान ध्येय ध्याता हरी ।
समरसें श्रीहरि तत्त्व जाले ॥३॥
पृथ्वी आप तेज गगनाकृति वायो ।
फ़िटला संदेहो ये जन्मींचा ॥४॥
उपदेश द्रष्टा जरि असे श्रेष्ठ ।
तरीच भाग्य विनट विष्णुरुपी ॥५॥
ज्ञानदेवीं सिध्दि साउली श्रीहरी ।
गुरुकृपा करीं कुरवाळिलें ॥६॥
३२३
जन्माचें व्याज आपणचि गिळिलें ।
मुदलाचा ठावो नाहीं ऐसें केलें ॥१॥
रिणाईत नव्हे हा निर्गुणासि समंधु ।
येणें परमबोधु बोधविला ॥२॥
ऐसी आपुली साक्षी कवणें पै द्यावी ।
निवृत्ति म्हणे कांहीं ठायीं न ठेवीची ॥३॥
बापरखुमादेविवरें केला घातासि घातु ।
आपुला लक्षाचा लाभु वरी दिधला ॥४॥
३२४
दुरुनि येक ऋण मागावया आलें ॥
माझें मीं पाहिलें तंव कांही नाहीं ॥१॥
भीतरील माझीं पंचरत्नें नेलीं ।
स्वस्वरुप वाहवलीं मध्य गिळियेलें ॥२॥
निवृत्ति बोधें मी बोधलें ॥
सांगतें वाहवलें सर्वस्वेंसी ॥३॥
ऐसा रखुमादेविवरुविठ्ठलु आपण पुढारला ।
माझा निर्वाळा केला संसारींचा ॥४॥
३२५
सत्राविये कोठडि माजी निक्षेपिलें ।
एकीं केलें धन ते बाविसें नेलें पातेजोनि ॥१॥
आपण नेणतां ऋण घ्यावयासी गेलों ।
तंव तंव सर्वस्वेसी बुडालों परोपरी देखा ॥२॥
मंत्र सांगितला माझ्या कानीं ।
जाणोनि ज्ञानविज्ञानीं वेडावलों ॥३॥
ऐसें रखुमादेविवरा विठ्ठलाच्या बोला ।
पातेजलों सर्वस्वासी ठेलों प्राड.मुख ॥४॥
३२६
चौ तेरा आम्ही चौसष्टीचे भागे सांचिले ।
तें एका ऋणाईतें घेतलें वोळखीविण ॥१॥
आपुलें अकरावें एक सोईरें जाणा ।
तेंहीं पैं तयासि मिळोनि ठेलें ॥२॥
आतां मी चौघांपाशीं जाईन तिहींचि नागविले पाहीं ।
तेथें कांहीं नाहीं ऐसें म्हणितलें ॥३॥
ऐसा देहाचा दिवाळखोर दुसर्यासी घेऊनी गेला ।
तेणें मज दाखविला अद्वैत पारु ॥४॥
सहस्त्रापरि कांही धरियेली जरी ।
ज्ञानमूढें तरी कायि जाणती ॥५॥
ऐसा बापरखुमादेविवरु विठ्ठलु मध्यावर्ती भला ।
तेणें उगाणा केला परावृत्त होऊनियां ॥६॥
३२७
चतुर्देहाची भरणी पुरली ।
एकाएकी देखिली निजतनु ॥१॥
त्याचे नांव गोवळु फ़िटला काळ वेळु ।
जाला सकळु सकळांसहित ॥२॥
ऐसा बापरखुमादेविवरु सुंदरु ।
तेणें माझा वेव्हारु खंडियेला ॥३॥
३२८
अकल्पित द्रुम आजि संयोगे घडलें ।
अपार आपणातें विसरलेंगे माय ॥१॥
महुरलें मन माझें मोहरलें ।
भक्तिफ़ळासि कैसें आलेंगे माय ॥२॥
देठींहुनि सुटलें पुढति कैसें जीवनासि आलें ।
बापरखुमादेविवरविठ्ठलें ऐसें केलेंगे माय ॥३॥
३२९
पांचासहित लयातीत जालिये वो ।
प्रेम भक्ती अनुसरलें वो काळ्या रुपासी ॥१॥
ठायींचाची काळा अनादि बहु काळा ।
म्हणोनि वेदा चाळा लाविलागे माये ॥२॥
बापरखुमादेविवरें जन्मावेगळें पै केलें ।
म्हणोनि भाज जाले बाईयेवो ॥३॥
३३०
संसारा तुकलिये वेव्हार मुकलिये ।
घराचारा पारुषलिये काय सांगों ॥१॥
माझें जिणेंचि बुडालें माझें जिणेंचि बुडालें ।
विठ्ठलें कुडें केलें काय सांगों ॥२॥
बापरखुमादेविवर विठ्ठलें ।
सहज मोलेविणें विकत घेतलें ॥३॥