अप्रसिद्ध अभंग - अभंग ९४१ ते ९५०
श्रीज्ञानेश्वर महाराजांची गाथा म्हणजे विठ्ठल प्राप्तीचा एक सोपा मार्ग. यात विठ्ठ्लाच्या सगुणनिर्गुण रूपाचे मोहक वर्णन केलेले आहे.
९४१
ऐक रे सुमना बोधीन सुज्ञान ।
मायिक बंधन तुटे जेणें ॥१॥
श्रीगुरुचे पाय हृदयीं शिवशी ।
टाकी प्रतिष्ठेशी जाणिवेचे ॥२॥
नित्यानित्य दोन्ही करीं गा विचार ।
आहे मी हे कीर विचारिजे ॥३॥
जीव शिव भेद कासयासी जाहाले ।
वळखीं वहिले तिये स्थानीं ॥४॥
मुळीं तुझें रुप हे रें अनुभवणे ।
ज्ञानदेव म्हणे ब्रह्म तूंचि ॥५॥
अर्थ:-
मना ज्याच्या योगाने मायिक पदार्थाचे बंधन तुटेल अशा तत्वड्ञान चा उपदेश मी तुला करतो तो तूं नीट ऐक. पहिली गोष्ट मी शहाणा आहे हा अभिमान सोडून तूं श्रीगुरु चरणी लीन हो. नित्य काय आहे व अनित्य काय आहे याचा विचार करून, मी कोण आहे. हे जाणण्याची प्रथम खटपट कर.कर्ता, भोक्ता तो जीव, व त्याचा साक्षी जो तो शिव असा भेद कसा झाला. वास्तविक ब्रह्मरुपांशी दोन्हीही अभिन्न आहेत. तूं मूळचा ब्रह्मरुप आहेस हे अनुभवाने हेरुन म्हणजे बारकाईने चिंतन करून पहा असे माऊली ज्ञानदेव सांगतात
९४२
जें जें पाहुं जाय सुमनें करूनी ।
अदृश्य होऊनी तेंचि लपे ॥१॥
दुजेचि न दिसे काय आतां करूं ।
कवणा विचारूं सुखगोष्टी ॥२॥
आपणाआपण विचारिजे आथी ।
जाहली विश्रांति मीपणाशीं ॥३॥
बाहेर भीतरी एकमेंव दिसे ।
अन्यथा हें नसे गुरूसाक्षी ॥४॥
ज्ञानेश्वर हे गिळुनीयां नाम ।
ब्रह्मचि स्वयमेव सांठविलें ॥५॥
अर्थ:-
आत्मज्ञान झाल्यानंतर चांगल्या मनाने ज्या ज्या दृश्य वस्तुकडे पाहू गेले असता ती सर्व दृश्य वस्तु ब्रह्मरूप आहे असा निश्चय होऊन जातो. आतां जगतात परमात्म्यावाचून दुसरा पदार्थच मला दिसेनासा झाला. आता मी सुखाच्या गोष्टी कुणाला विचारू.त्याचा विचार आत्म्यासीच करावा असे म्हंटले तर मीपणाची हरिस्वरूपाच्या ठिकाणी विश्रांति झाली. म्हणजे मी म्हणून विचार करणारा त्या हरिहून वेगळा नाहीच सदगरूच्या कृपेने सर्व पदार्थाच्या ठिकाणचे नामरूप नाहीसे होऊन आंत बाहेर दिसते.४ आंत, बाहेर,जिकडे, तिकडे पाहावे तिकडे मला साक्षी ब्रह्मरूपच ठसवलेले दिसते. नामरूप संपवून मला जिकडे तिकडे ब्रह्मच भरलेले दिसते असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.
९४३
जगामांजी श्रेष्ठ सांप्रदायी नाना ।
कीर्ति ते भुवनामाजी फार ॥१॥
आम्ही एक दिन जाणा नाथपंथी ।
नीचाहूनी अथी अती नीच ॥२॥
सर्वांचे चरण वंदितसों सदा ।
श्रेष्ठपण कदा कीरे नसे ॥३॥
नेणोंची स्वरूप धर्माधर्म कांही ।
निवृत्तीच्या पायीं लीन जाहलों ॥४॥
नाठवेचि कांहीं अन्यथा साधन ।
ज्ञानेश्वर आन उरेचिना ॥५॥
अर्थ:-
जगामध्ये श्रेष्ठ सांप्रदायाचे अनेक पंथ असून त्या सांप्रदायांचा लौकिक फार मोठा आहे. आम्ही नाथपंथी लोक अगदी कनिष्ठा पेक्षाही कनिष्ट आमच्या ठिकाणी मोठेपणाचा अभिमान केंव्हाही आला नाही. म्हणुन सर्वाना नमस्कार करतो.पापपुण्याचे स्वरूप आम्हाला कळत नाही. मात्र मी निवृत्तीरायांना शरण गेलो. या साधनावांचून दुसरे काही साधन न करता मी वेगळेपणाने राहिलोच नाही. म्हणजे तद्रुप झालो. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.
९४४
घटु जें जें होय आधींच गगन ।
राहे पैं व्यापून वेगळेंची ॥१॥
मायोपाधी सृष्टि जें जें कांहीं होत ।
चैतन्य व्यापित त्याची माजीं ॥२॥
विवर्तते माया तद्विवर्त जीव ।
सृष्टि कारणत्व भोग्यपर ॥३॥
भासचतुष्टयता दोन्ही अनादि ।
जाहली उपाधि मुळीहुनी ॥४॥
गुरूकृपायोगें ज्ञानदेव खूण ।
भेदुनी निर्वाण लीन झाला ॥५॥
अर्थ:-
घट निर्माण होण्यापूर्वी आकाश अगोदरच सर्वत्र व्याप्त असतेच व घट निर्माण झाल्यावर घटामुळे घटापुरते वेगळे वाटते. म्हणजे त्याला ‘घटाकाश म्हणतो. त्याप्रमाणे मायिक सर्व पदार्थ निर्माण होण्यापूर्वी चैतन्य सर्वत्र असतेच ते या पदार्थाच्या उपाधीमुळे वेगळेपणाने भासते त्यामुळे ब्रह्माची प्रतिती ब्रह्मरूपाने न येता जगतरूपाने येते. म्हणून ब्रह्माच्या ठिकाणी माया व मायाकाय पदार्थ हे विवर्त म्हणजे अध्यस्त आहे. जीव ईश्वर भाव हे मायेमुळे आहे. त्यामुळे ईश्वराच्या ठिकाणी दिसणारी कारणता व माया कार्य पदार्थाच्या ठिकाणी दिसणार भोग्यता ही सर्व ब्रह्मस्वरूपावर अध्यस्त आहे. माया व मायाकार्य पदार्थ हे अनादि आहेत.त्या मायेमुळे ब्रह्म साकार झाले. त्या मायेचा निरास करून आम्ही ब्रह्मस्वरूप झालो. ही खूण आम्हाला गुरूकृपेने कळली. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
९४५
त्यागुनी कैलास सर्वही संपत्ती ।
स्मशानांत वस्ती रूद्र करी ॥१॥
कासया कारणे ब्रह्म शोधावया ।
आलों कोठनियां माझा मीचि ॥२॥
तयाशीही पूर्ण न कळेची कांहीं ।
अद्यापि संदेही पडियले ॥३॥
हरिब्रह्मा सूर्य येरा कोण लेखी ।
नाहींच अोळखी मूळरूपीं ॥४॥
म्हणे ज्ञानदेव वस्तु परात्पर ।
गुरूकृपे कीर भेदिजेसु ॥५॥
अर्थ:-
ब्रह्माच्या शोधाकरिता प्रत्यक्ष शंकरदेखील कैलास पर्वत व सर्व ऐश्वर्य सोडुन स्मशानात राहीले.कशाकरिता राहिले? त्यांना शंका आली की मी कोण? कोठुन? व कशाकरिता येथे आलो? याचा उलगडा त्यानाही होईना म्हणून अजूनही ते संशयातच आहे. मग विष्णु, सूर्य, ब्रह्मा, वगैरेची गोष्ट कशाला विचारता? त्यांनाही स्वस्वरूपाची ओळख झाली नाही. ही सर्व व्यापक वस्तु गुरूकृपेशिवाय कळणार नाही. या अभंगातील तात्पर्य हे सर्व अज्ञानी होते असे नसून गुरूकृपेवांचून कितीही मोठा असला तरी त्यास स्वबुद्धिने ब्रह्मबोध होणार नाही. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
९४६
आत्मरूपीं नाही पाठीं आणि पोट ।
एकचि निघोट जाण रया ॥१॥
बाहीर भीतरीं एकचि तें एक ।
नसे आन देख भेद रया ॥२॥
ठेंगणे नावाड हळू ना ते जड ।
स्वयेंची अखंड पूर्ण रया ॥३॥
जाणणे नेणणे दोन्ही तेथें नाहीं ।
आहे जैसे पाहीं तेंचि रया ॥४॥
सदोदीत शुद्ध म्हणे ज्ञानेश्वर ।
नाहींच विकार कीर रया ॥५॥
अर्थ:-
आत्मस्वरूपाच्या ठिकाणी पाठ पोट वगैरे कोणताच भेद नाही. ते निरवयव असल्यामुळे निर्विकार आहे. ते आत्मतत्त्व देहाच्या आंत किंवा बाहेर आहे असे नाही, ते सर्वव्यापी भेदरहित आहे. ते ठेंगणे, उंच, हलके, भारी नसून अखंड परिपूर्ण आहे त्याच्याठिकाणी ज्ञान, अज्ञान ही दोन्ही नसून ते नित्यशुद्ध ज्ञानरूप जसेच्या तसेच आहे. त्या वस्तुच्या ठिकाणी विकार नसुन ती सदोदित नित्य शुद्ध ज्ञानस्वरूप आहे. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.
९४७
परेहुनी परी वैखरीहुनी दुरी ।
दुरीहुनी दुरी ब्रह्म आहे ॥१॥
केवीं तुज कळे सांग जीव रूपा ।
वृथा भ्रम बापा करितोसी ॥२॥
आकाशाचे फळ चित्रींच्या नराशी ।
केवीं प्राप्त त्यासी होईजेल ॥३॥
जेव्हां तूंचि ब्रह्म होऊनी राहाशी ।
तेंव्हा वळगशी सर्वगत ॥४॥
हेतु मातु भ्रांति हे तिन्ही गिळून ।
राहियला मौन ज्ञानदेव ॥५॥
अर्थ:-
ते ब्रह्म परावाणीच्या पलीकडील आहे. मग ते वैखरी वाणीने कसे सांगता येईल? ते ब्रह्म पारमार्थिक सत्तेतील असल्यामुळे प्रातिभासिक व व्यावहारिक सत्तेतील वस्तूहून ते फारच दूर आहे. ब्रह्म पारमार्थिक सत्तेतील असल्यामुळे व्यवहारिक सत्तेतील जीवत्व धारण करणारा जो तूं त्या तुला ते ब्रह्म कसे कळेल जीवत्वदशा कायम ठेऊन ब्रह्म कळावे असे जर वाटत असेल तर तूं फुकटच भ्रम का करित आहेस. आकाशाचे फळ चित्रांतील मनुष्याला खावयास द्यावे असे म्हणणे जसे मुर्खपणाचे आहे. त्याप्रमाणे आपल्या ठिकाणी जीवदशा कायम ठेवन ब्रह्म कळावे असे म्हणणे मुर्खपणाचे आहे.जेव्हां तूं स्वतः यथार्थज्ञान करून घेऊन ब्रह्मरूप होशील तेंव्हा तें सर्वव्यापक ब्रह्म तुला अनुभवाला येईल. माया व मायाकार्य पदार्थ यांची भ्रांती टाकून देऊन ब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी मी मौनरूप धारण करून स्वानुभव स्थितीत राहिलो. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
९४८
एकचि मीपणें नागविलें घर ।
नाहींतरी संसार ब्रह्मरूप ॥१॥
प्रवृत्ति निवृत्ति दोन्ही मुळीं नाहीं ।
कल्पनेने पाहीं भ्रमताती ॥२॥
ते एक त्यागिता काय आहे वाणी ।
कैवल्याचा धनी तोचि होय ॥३॥
जन्म मृत्यू भोग भोगणे यालागीं ।
टाकोनिया संगी राहीं बापा ॥४॥
म्हणे ज्ञानदेव मग होशी मुक्त ।
नव्हेचि आसक्त सर्वथैव ॥५॥
अर्थ:-
देहाभिमानामुळे जीवाची फसवणूक झाली आहे. जीवाने विचार करून तो देहाभिमान सोडून दिला दिला तर जीवाचा संसार ब्रह्मरुपच होईल. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी वस्तुतः कर्माची प्रवृत्ति किंवा निवृत्ती या दोन्ही मुळातच नाही असे असूनही त्याची कल्पना आत्म स्वरूपांच्या ठिकाणी करून जीव भ्रमिष्ठ होतात.काय चमत्कार पहा, जर एक देहाभिमान त्यानी टाकला तर त्यांना मोक्षाची वान कसली? फार काय तोच मोक्षाचा अधिपती होईल. या करिता जन्म मृत्य इत्यादी भोगांचा जोगांचा संबंध टाकून राहा. असे केले तर कोठेही आसक्त न होता मुक्त होशील. असे माऊली ज्ञानदेव सांगतात. वै. भाईनाथ महाराज समाधी मंदिर, वेळापूर
९४९
भुलणे चालणें ईश्वराशी नाहीं ।
जैसा असे पाही तैसा असे ॥१॥
जरी भिन्नभेद तरी सर्वज्ञत्व ।
कासया समत्व नाम त्यासी ॥२॥
सूर्याशी प्रकाश सूर्यचि करीत ।
ईश्वर जाणत ईश्वराशी ॥३॥
आपुली पोकळी आकाशचि जाणे ।
ईश्वरचि लेणे जग लेई ॥४॥
सहज अभेद वस्तु अगोचर ।
म्हणे ज्ञानेश्वर तेंचि रूप ॥५॥
अर्थ:-
विसरून जाणे, चालणे, वगैरे क्रिया परमात्म्याला नाही. तो जसा आहे, तसाच आहे. जर वेगवेगळे क्रियारूप भेद त्याच्याठिकाणी असतील तर त्याला सर्वज्ञ सर्वव्यापी कसे म्हणता येईल. ज्याप्रमाणे सूर्याचे प्रकाशन सूर्यच करतो. त्याप्रमाणे ईश्वरच ईश्वराला जाणतो. किंवा आपली पोकळी आकाशालाच कळते. त्याप्रमाणे जगद्रूप अलंकार घातलेले ईश्वराचे स्वरूप ईश्वरालाच माहित. जी अव्यक्त व भेदरहित वस्तु तेच ईश्वराचे खरे स्वरूप आहे. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.
९५०
कवणाची चाड आतां मज नाहीं ।
जडलों तुझ्या पायीं निश्चयेंची ॥१॥
देह जावो राहो नाहींच संदेहो ।
न करी निग्रहो कासयाचा ॥२॥
बहुत श्रमलो साधन करितां ।
विश्रांति तत्त्वता न होयची ॥३॥
तुज वांचोनियां कवणां सांगावें ।
कवणां पुसावें अनुभव सुख ॥४॥
माता पिता सखा सर्वस्व तूं कीर ।
म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीसी ॥५॥
अर्थ:-
मला आता कोणाची लाज उरली नाही. माझी चित्तवृत्ती तुझ्या ठिकाणी निश्चित जडली आहे. देह जावो अथवा राहो, मला त्यावर फिकीर वाटत नाही. तसेच कोणत्याच गोष्टीचा निग्रह करीत नाही.सुखप्राप्ती करता निरनिराळ्या साधनांचा उपयोग करुन थकलों. पण खरोखर कोठे विश्रांती अशी मिळालीच नाही या गोष्टी तुझ्यावांचून कोणांस सांगाव्या? व अनुभवाचे सुखही तुझ्यावाचून कोणाला विचारावे. म्हणून माऊली ज्ञानेश्वर निवृत्तीनाथास म्हणतात माझे आईबाप मित्र वगैरे तूंच आहेस. असे माऊली सांगतात.
N/A
References : N/A
Last Updated : September 09, 2026

TOP