गौरीची गाणी - वैताकाला
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
वैताकाला
चल चल धन्या रानात जावू, रानात जावू रं
भूरभेंडीच्या फ़ाट्या फ़ोडू, फ़ाट्या फ़ोडू रं
तीन बंदावर भारा बांधू, भारा बांधू रं
ये ये धन्या उचलाया, उचलाया रं...
उचलाया गेलू तं चूंभल पडली
सांगाया गेलू तं डोलं मोडी...
तो भारा वसईला नेला रं
एका भार्याच्या तीन दिडक्या रं
एक देडकीचा कणिकोंडा रं
एक देडकीची मीठमिरची रं...
एक देडकीची दारू पिली रं
घरी येऊन दंगा केला रं....
निघून जाऊन वैताकाला, वैताकाला रं
कशी तू जशील वैताकाला, वैताकाला गं
कमरंचा काटा निला निला करीन गं
कशी तू जशील वैताकाला, वैताकाला गं
(वैताक-माहेर, फ़ाट्या-सरपण)
माहेरी
चल चल धन्या रानात जाऊ, रानात जाऊ रे
भूरभेंडीची लाकडे तोडू, लाकडे तोडू रे
तीन बंदांनीं भारा बांधू, भारा बांधू रे
ये ये धन्या उचलायला, उचलायला रे
उचलायला गेले तर चुंबळ पडली
सांगायला गेले तर तो डोळे वटारी....
भारा वसईला विकायला नेला रे
एका भार्याच्या मिळाच्या तीन दिडक्या रे
एका दिडकीचा कणीकोंडा घेतला रे
एका दिडकीची मीठमिरची घेतली रे
एका दिडकीची दारू प्यायली रे
घरी येऊन धिंगाणा केला रे....
निघून जाईन मी माहेराला, माहेराला रे...
कशी तू जाशील माहेराला, माहेराला ग
कंबरेला काटा तुझ्या करीन हिरवानिळा ग
कशी तू जाशील माहेराला, माहेराला ग!
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP