बांसरीचा छंद सार्या गोकुळीला बाई ग । सून माझी वेडी झाली करावे मी काय ग ॥धृ॥
वाटे अहर्निशी हरी गुण आठवावे । रूप सावळ्या श्रीहरीचे नयनी साठवावे ।
दही दुध नवनीत मुकुंदाला बाई ग ॥१॥
लक्ष नाही संसारात बावरलेली । भरली घागर घेऊनी पाणी याला चालली ।
हासतात नर नारी लाज त्याची नाही ॥२॥
स्वयंपाक करी घरी चित्त सारे नंदाघरी । थालपीठ उचकटेना भाकरी चंद्रकोरी ।
जुन्या तांदुळाचा भात गिच्च गोळा होई ग ॥३॥
कान्हा वाचून करमेना तीला क्षणभरी । वाटे सावळा श्रीहरि दिनाते उद्धारी ।
राधा हरी भजनांत रंगूनीया जाई ग ॥४॥