नक्षत्रपुरुषाचे पाद, मृलनक्षत्र, पोटर्या रोहिणी, गुडघे अश्विनी, मांडया पूर्वाषाढा व उत्तराषा० गुहया पूर्वा व उत्तरा, ॥१॥
कमर कृत्तिका, पार्श्वभाग पूर्वभाद्रपदा व उत्तराभा०, कुक्षि रेवती, ऊर अनुराधा, ॥२॥
पृष्ठ धनिष्ठा, भुज विशाखा, हात हस्त, अंगुली पुनर्वसु, नखे आश्लेषा ॥३॥
मान ज्येष्ठा, कान श्रवण, मुख पुष्य, दात स्वाती, हास्य शततारका, नाक मघा, नेत्र मृगशीर्ष ॥४॥
ललाट चित्रा, मस्तक भरणी, केश आर्द्रा, हे नक्षत्रपुरुषरूपव्रत सुंदररूप इच्छिणार्यांनी करावे ॥५॥
चैत्रकृष्ण अष्टमीस मूळनक्षत्र चंद्रवार असला म्हणजे उपवास करून विष्णूची व नक्षत्रांची पूजा करावी ॥६॥
व्रत समाप्त झाल्यावर कालवेत्ता (ज्योतिषी) ब्रम्हाण यास सुवर्णयुक्त, घृताने पूर्ण असे पात्र व हीरकादिरत्नयुक्त वस्त्र ही आपल्या शक्तीप्रमाणे द्यावी ॥७॥
बहुत दुग्ध, तूप, गूळ यांनीसहित अन्ने देऊन ब्राम्हाणांचे पूजन करावे व त्यांस वस्त्र, रुपे ही सुंदरत्व इच्छिणार्या पुरुषाने द्यावी. मूळनक्षत्रापासून, सर्व अंगनक्षत्री उपवास करून, आपणास योग्य अशा विधीने नारायणाचे पूजन तसेच नक्षत्रदेवतेचेही पूजन करावे. (असे व्रत करणारा पुरुष अन्यजन्मी कसा होतो ते पुढील श्लोकांत सांगतील) ॥८॥
लांबभुज (आजानुबाहु,) मोठे, पुष्ट से उरस्थल, चंद्रासारखे मुख, श्वेत व सुंदर दांत, हत्तीसारखे गमन, कमळासारखे विस्तीर्ण नेत्र, स्त्रियांचे चित्त हरण करणारा, मदनासारखी मूर्ति (देह) असा, पूर्वोक्त नक्षत्रपुरषव्रत करणारा पुरुष, अन्यजन्मी होतो ॥९॥
शरद्दतूतील स्वच्छ पूर्णचंद्राच्या तेजासारखे मुखतेज, कमलपत्रासारखे नेत्र, सुंदर दात, उत्तम कान, भ्रमरोदरासारखे काळे केश, ॥१०॥
कोकिलेसारखा स्वर, तांबडे ओठ, कमळपत्रासारखे हात व चरण, स्तनभाराने थोडा नमलेला मध्यभग, प्रदक्षिण भोवर्याने युक्त नाभि, ॥११॥
केळीच्या स्तंभासारख्या मांडया, उत्तम कमर, उत्तम कुले, सुंदर योनि, मिळालेल्या अंगुली असे पाय, अशी नक्षत्रव्रत करणार्या पुरुषाची स्त्री होते. (मनुष्योवा) असा पाठ आहे. तेव्हा स्त्रीने हे व्रत केले तर असे रूप पुढील जन्मी होते व श्लोक ९ यात सांगितल्याप्रमाणे पुरुषाचे रूप होते असा अर्थ ॥१२॥
नक्षत्रपुरुषव्रत करणारा पुरुष किंवा स्री जितके दिवस नक्षत्रे आकाशामध्ये आहेतव आपल्या तेजाने प्रकाश करतात तितके दिवस नक्षत्ररूप होऊन नक्षत्रांबरोबर कल्पांतपर्यंत फिरतो; नंतर कल्पाच्या आरंई सार्वभौम बुद्धिमान राजा होतो. दुसर्याजन्मी संसारामध्ये पुन; झाला तर राजा किंवा धनाढय ब्राम्हाण होतो ॥१३॥
मार्गशीर्षादिमासांचे केशवादि अनुक्रमाने स्वामी होत. म्ह० मार्गशीर्षाचा केशव, पौषाचा नारायण, माघाचा माधव, फाल्गुनाचा गोविंद, चैत्राचा विष्णु, वैसाखाचा मधुसूदन, ज्येष्ठाचा त्रिविक्रम, आषाढाचा वामन, श्रावणाचा श्रीधर, भाद्रपदाचा त्द्दषीकेश, आश्विनाचा पद्मनाभ, कार्तिकाचा दामोदर असे होत ॥१४॥१५॥
पुरुष, उपोषण करून मासस्वामीचे त्या महिन्याच्या द्वादशीस यथाशास्त्र कीर्तन करून मासनामक भगवंताचे पूजन करील तर जेथे पुन: जन्माचे भय नाही अशा भगवत्पदाप्रत जाईल (मोक्षप्राप्ती होईल) ॥१६॥
॥ इतिश्रीवराहमिहिरकृतौबृहत्संहितायांनक्षत्रपुरुषव्रतंनामपंचोत्तर्शततमोध्याय: ॥१०४॥