उत्तर दिशा सप्तऋषींनी नाथवती (पतियुक्त स्त्री) सारखी शोभते. नाथवती कशी तर एकावली (सौभाग्यसूचक विवाहसमयी गळेसरी गळ्यात बांधितात ती) तिने सहितच व श्वेतकमलांच्या मालेने युक्त व हास्ययुक्त अशीच या ७ ऋषींनी उत्तरदिशा शोभते ॥१॥
फिरणारे जे सप्तऋषि, त्यांहीकरून उत्तरदिशा ध्रुवसंज्ञक नायकाच्या उपदेशाने नाचतेच काय अशी आहे. त्या सप्तऋषींचा गर्गमताप्रमाणे मी सांगतो ॥२॥
युधिष्ठिर राजा, राज्य करीत असता सप्तऋषि, मघानक्षत्री होते. त्या राजाच्या शककालात २५२६ मिळवावे ॥३॥
षट्द्विक म्ह० १२ व पंचद्वि म्ह० १० एकूण १०१२ त्या राजाच्या शकास म्ह० गतकलीस मिळवावे. त्यांस १०० नी भागावे. भागाकारास २७ नी भागावे. आणि जो शे अंक राहील तितकी नक्षत्रे मघांपासून पुढे मोजावी व त्या नक्षत्रास ऋषि आहेत असे समजावे. उदाहरण, गतकालि ४९७४ यास १०१२ मिळविले असतो ५९८६ होतात. त्यांस १०० नी भागिले. भाग ५९ लागला. त्यांस २७ नी भागिले. बाकी ५ राहिले. व शंभरांची बाकी ८६ आहे. मघांपासून ५ नक्षले मुक्त होऊन सहाव्याची ८६ वर्षी झाली आहेत असे समजावे.
(टीकेत जे उदाहरण वगैरे लिहिले आहे ते बरोबर वसत नाही. यास्तव ते न लिहिता मूळ श्लोकांतील पदांवरूनच जो अर्थ मला बरा दिसला तो लिहिला आहे व त्याप्रमाणेच जवळजवळ सांप्रत सप्तऋषि आहेत.)
ते सप्तऋषि, एक एक नक्षत्री शंभर शंभर वर्षे राहतात. हे ईशानी दिशेस अरुंधतीसहित निरंतर उदय पावतात ॥४॥
पूर्वेकडे भगवान मरीचिऋषि, त्याचे पश्चिमेस वसिष्ठ, त्याहून पश्चिमेस अंगिरा, त्याहून पश्चिमेस अत्रि, त्याचे जवळ पुलस्त्य, पुलह, क्रतु: हे सप्तऋषि ओळीने पूर्वेपासून रहातात. त्यांत मुनिश्रेष्ठवसिष्ठाजवळ पतिव्रता अरुंधती आहे ॥५॥६॥
उल्का, अशनि (वज्र,) नीहार (बर्फ) इत्यादिकेकरून हत (आच्छादित,) विवर्ण (फिकट,) किरणरहित व र्हस्व (बारीक बिंब) असे ते ऋषि जर असतील तर आपापल्या वक्ष्यमाण वर्गाचा नाश करितात व ते विपुल (मोठेबिंब,) निर्मल असतील तर आपल्या वर्गाची वृद्धि करितात ॥७॥
गंधर्व (अश्वमुखनर देवयोनि,) देव, दैत्य, मंत्र, औषधि, सिद्ध, यक्ष, सर्प, विद्याधर (देवयोनि,) यास मरीचिऋषि संतप्त असता पीडा होते व स्निग्ध अ० यांची वृद्धि होते ॥ हा मरीचिवर्ग ॥८॥
शक, (म्लेच्छ,) यवन, दरद (रानटी लोक,) पारत (पारा,) कांबोज (कंबोजदेशांतील लोक,) तपस्वी, वनवासी, यांचा, वसिष्ठ तप्त अ० नाश व किरणयुक्त अ० वृद्धि होते ॥९॥
ज्ञानयुक्त, बुद्धिमान, ब्राम्हाण यास अंगिराऋषि संतप्त व स्निग्ध असता अनुक्रमे अशुभ व शुभ होते. अरण्यामध्ये झालेले, उदकापासून झालेली द्रव्ये, समुद्र व नद्या यांस अत्रिऋषि तप्त अ. दु:ख व स्निग्ध अ० सुख होते ॥१०॥
राक्षस, पिशाच, दानव, दैत्य, सर्प, यांस पुलस्त्यऋषि पीडित अ० दु:ख व स्निग्ध अ० सुख होते. मूले, फले यांस फुलहऋषि तप्त अ० दु:ख व स्निग्ध अ० सुख होते. यज्ञ व यज्ञ करणारे यांस क्रतुऋषि तप्त अ० दु:ख व स्निग्ध अ० सुख होते ॥११॥
॥ इतिसप्तर्षिचारस्त्रयोदश: ॥१३॥