सूर्यकिरण खिडकीत पडले असता, त्यात जे सूक्ष्मरज द्दष्टिगोचर होते, तो परमाणु होय हा सर्व प्रमाणांस प्रथम होय ॥१॥
परमाणु, रज, बालाग्र, लिक्षा, यूका, यव, अंगुल ही पहिल्यापासून अष्टगुणित केली म्हणजे पुढील अंगुलसंख्या होते (८ परमाणु म्ह० १ रज. ८ रज = १ वालाग्र. ८ वालाग्र = १ लिक्षा. ८ लिक्षा = १ यूका. ८ यूका = १ यव. ८ यव = १ अंगुल) ॥२॥
देवालयाच्या द्वाराची जी उंची तीत तिचा अष्टमांश कमी करून शेषांकांचा जो तृतीयांश ते पिंडिकेचे (बैठकीचे) प्रमाण होय. त्याच्या दुप्पट प्रतिमेचे प्रमाण जाणावे ॥३॥
(पीठाची उंची सोडून फक्त मूर्तीचीच उंची घेऊन तिचार १३ अंश घ्यावा. नंतर त्या द्वादशांशाचा नवमांश काढावा.जो नवमांश येईल ते या कार्यसंबंधी अंगुल समजावे. या अंगुलाचे मानने मूर्तीचे १०८ आंगळे प्रमाण पुढे सांगितले आहे. उदाहरण. ५६ आंगळे मूर्ति करावयाची आहे. त्याचा १२ अंश ४। त्याचा ९ अंश म्ह० अर्धे आंगुळ व किंचित अधिक येते. तितके या कामासंबंधी आंगुळ समजावे) या आंगळांनी १२ आं० लांब व १२ आं० रुंद प्रतिमेचे मुख करावे. नग्नजिताने १४ आं० प्रमाण सांगितले ते द्रविडदेशचे मान होय ॥४॥
नासिका, ललाट. चिबुक (अधरोष्ठाचे खालचा भाग,) मान, कर्ण, हे अवयव चार चार अंगुले असावे. २ हनु व चिबुक हे भाग २ अंगुले विस्तृत असावे. हनु म्ह० मुख व गल्ल यांची संधि व चिंबुक म्ह० मुखाचा अधोभाग ॥५॥
ललाटाचा विस्तार आठ अंगुले करावा. त्या ललाटाच्या दोन बाजूंस दोन अंगुलांपुढे शंख करावे; ते खाली चार अंगुले दीर्घ करावे. कर्ण दोन अंगुले पृथुल (विस्तीर्ण) करावे ॥६॥
नेत्रांचे टोकांपासून साडेचार आंगळावर कान करावा व त्याचा वरील भाग भवई इतका उंच करावा. कर्णच्छिद्र व सुकुमारक (छिद्रसमीपचा उंच भाग) हे भाग नेत्रप्रबंध (नेत्र मलस्थान) याचे तुल्य (१ अंगुल) करावे ॥७॥
नेत्रांत वर कर्ण यांचा मध्यभाग चार अंगुले असावा असे वसिष्ठऋषि म्हणतात. अधरोष्ठ १ अंगुल व वरचा ओष्ठ त्याचे निमे (अर्धे अंगुल) करावा ॥८॥
गोच्छा (मिशी) अर्धे अंगुल विस्तीर्ण करावी. मुख चार अंगुले विस्तीर्ण व दीड अंगुळ रुंद करावे. मुख हसित करणे असल्यास, मध्यापासून ३ आंगले व्याप्त म्ह० विस्तृत करावे ॥९॥
नासिकेची पुटे दोन अंगुले व नासापुताग्रेही दोनच अंगुले आणि नासिकेची उंचीही दोन अंगुले करावी. दोन डोळ्यांचे अंतर चार अंगुले करावे ॥१०॥
नेत्रांची पापणी (नेत्राच्छादन) दोन अंगुले, नेत्र दोन अंगुले, त्याच्या तृतीयांशाने तारा (बुबुळ,) दोन अंगुलांचा पंचमांश नेणविकाश, (नेत्र विस्तृति) १ अंगुल करावी ॥११॥
भिवईच्या शेवटापासून दुसर्या भिवईचा शेवट १० अंगुले, भ्रुकुटीची रेषा अर्धांगुल विस्तृत, भ्रूमध्यभाग २ अंगुले, एक एक भ्रुकुती चार चार अंगले लांब करावी ॥१२॥
ललाटावर केशरेषा भ्रूबंधतुल्य (१० अंगुले) दीर्घ व अर्धांगुल विस्तीर्ण करावी. नेत्रांच्या शेवटास १ अंगुल प्रमाण करवीरपत्रक (मूषिका इतिप्रसिद्ध) करावे ॥१३॥
मस्तकाचा वर्तुळ घेर ३२ अंगुले व विस्तार १४ अंगुले करावा. त्यातून चित्रकर्मामध्ये १२ अंगुले दिसतात व २० दिसत नाहीत ॥१४॥
केशसमूहसहित मुखाची लांबी १६ अंगुले (१४ अंगुले मुख व केशसमूह २ अंगुले) नग्नजित शिल्पज्ञाने सांगितले. ग्रीवा (मान) १० अंगुले विस्तीर्ण व घेर २१ अंगुले करावा ॥१५॥
कंठापासून १२ अंगुले ह्र्दय व त्द्ददयापासून नाभि १२ अंगले व नाभिमध्यापासून मेढू (शिश्न) मध्यभाग १२ अंगुलेच सांगितला आहे ॥१६॥
मांडया २४ अंगुले व पोटर्याही २४ अंगुले दीर्घ कराव्या. गुडघे ४ अंगुले व पादही ४ अंगुले दीर्घ करावे ॥१७॥
पाय खोटांपासून अंगुष्ठपर्य़ंत १२ अंगुले लांब व ६ अंगुले लांब व ६ अंगुले रुंद करावे. आंगठे ३ अंगुले दीर्घ व ५ अंगुले घेर करावा. प्रदेशिनी (आंगठयाजवळची) तीन अंगुले दीर्घ करावी ॥१८॥
शेष तीन अंगुलि प्रदेशिनीपेक्षा अष्टांश कमी अनुक्रमाने कराव्या. म्ह० प्रदेशिनीपेक्षा मध्यमा, मध्येहून अनामिका, अनामिकेहून कनिष्ठिका हया अष्टांश कमी कराव्या. सव्वाअंगुल अंगुष्ठाची उंची सांगितली ॥१९॥
अंगुष्ठाचे नख पाऊण अंगुल प्रतिमालक्षणज्ञांनी सांगितले. शेष सर्व अंगुलीची नखे अर्धांगुल अथवा अनुक्रमाने काही कमी अशी म्ह० ज्याप्रकारे सुंदर दिसतील तशी करावी ॥२०॥
पोटर्यांच्या अंती १४ अंगुळे घेर, पाच अंगुळे विस्तार करावा. पो० मध्यभागी ७ अं० विस्तार व २१ अं० घेर करावा ॥२१॥
गुडघ्यांच्या मध्यभागी ८ अं० पृत्युत्व (विस्तीर्ण) व २४ अं० परिघि (घेर) करावा. मांडया मध्यभागी १४ अं० विस्तीर्ण व २८ अं० परिधि (वेग) करावा ॥२२॥
कमर १८ अं० विस्तीर्ण व ४४ अं० घेर करावी. नाभि खोल १ अं० व विस्तीर्ण एक अंगुल करावी ॥२३॥
नाभीचा मध्य घेर ४२ अंगुले करावा. स्तनांचे अंतर (मध्यभाग) १६ अं० करावे. स्तनांच्या वर ६ अं० तिर्कस कांखा कराव्या ॥२४॥
स्कंध ८ अंगुले दीर्घ मानेच्या बाजूपासून करावे. १२ अं० बाहु व प्रबाहूही १२ अं० दीर्घ करावे. बाहु ६ अं० व प्रबाहू ४ अं० विस्तीर्ण करावे ॥२५॥
बाहूंच्या मूलप्रदेशी १६ अं० घेर व हस्ताग्री १२ अं० घेर करावा. हस्ततलाची रुंदी ६ अं० व ७ अंगुले लांबी करावी ॥२६॥
मध्यांगुली ५ अं० दीर्घ करावी. प्रदेशिनी मध्यांगुलिपर्वार्धाने कमी करावी. प्रदेशिनी इतकीच अनामिका व कनिष्ठिका अनामिकेच्या पर्वाच्या (पेराच्या) अर्धाने कमी करावी ॥२७॥
दोन पेरांचा अंगुष्ठ करावा. शेष सर्व अंगुली तीन ३ पेरे करावी. सर्व अंगुलींची नखे त्या त्या अंगुलीच्या पर्वार्धाने करावी ॥२८॥
देशाचाराप्रमाणे भूषण, वेष, अलंकार, यांनीकरून लक्षणयुक्त प्रतिमा कसवी. ती संनिहित असता, वृद्धि करणारी होते ॥२९॥
दशरथाचा पुत्र राम व विरोचनाचा पुत्र बलि हे १२० अंगुले करावे. शेष सर्व देवांच्या मूर्ति, १२० तर १२ अंगुले कमी, म्ह० १०८ अंगुले कराव्या. त्या श्रेष्ठ होत. ९६ अं० मध्यम; ८४ अं० कनिष्ठ होत ॥३०॥
भगवान्विष्णु, अष्टभुज किंवा चतुर्भुज अथवा द्विभुज करावा. श्रीवत्साने (केशांच्या भोवर्याने) चिन्हित वक्षस्थल, कौस्तुभमण्याने भूषित ऊर, अतसी (जवस) पुष्पासारखा श्यामवर्ण, पीतांबरवस्त्रयुक्त, प्रसन्नमुख, कानात कुंडले व मस्तकावर मुकुट धारण करणारा,गळा, उर:स्थल, खांदे, बाहु हे ४ पुष्ट, उजव्या हस्तांत शंख, गदा, बाण, ही आयुधे व चवथा खालचा हस्त शांतिद (प्रश्नकर्त्याच्या सन्मुख ऊर्ध्वांगुलि) असे व डाव्या हस्तांत धनुष्य, ढाल, चक्र, शंख, ही आयुधे अष्टभुजांस करावी ॥३१॥३२॥३३॥
चतुर्भुज करण्यास इच्छील तर उजवा एक शांतिद व दुसरा गदाधर, डावा शंक व चक्र याते धारण करणारा, असे चार हात असावे ॥३४॥
द्विभुजविष्णूचे हस्त उजवा शांतिद, डावा शंखधर असे करावे. याप्रकारे विष्णूच्या प्रतिमा ऐश्वर्य इच्छिणार्यांनी कराव्या ॥३५॥
नांगर हातात, मदाने चंचल लोचन, एक कुंडल कानात धारण करणारा व शंख, चंद्र, कमलतंतु यांसारख्या गौरशरीराचा असा बळराम करावा ॥३६॥
एकानंशा (नावाची) देवी बलदेव व कृष्ण यांचे मध्ये कटीवर डावा हात व उजव्या हस्तांत कमल धारण करनारी, अशी द्विभुजा करावी ॥३७॥
चतुर्भुजा केली तर डाव्या २ हातांत पुस्तक व कमल, उजव्या २ हातात याचकास वर देणे व रुद्राक्षमाला ही असावी ॥३८॥
अष्टभुजा केली तर डाव्या ४ हातांत कमंडलु, धनुष्य, कमल, पुस्तक ही आयुधे व उजव्या ४ हातात वर, बाण, आरसा, रुद्राक्षमाला ही असावी ॥३९॥
कृष्णपुत्र, सांब यांच्या हातात गदा व प्रद्युम्न सुंदररूप व हातात धनुष्य, असे करावे. या दोघांच्या स्त्रिया ढाल व तरवार धारण करणार्या अशा दोन कराव्या ॥४०॥
हातात कमंडलु, चार मुखे, कमलावर बसलेला असा ब्रम्हा करावा. कुमार (पच वर्षांच्या आत मुलगा) यारूपाचा, शक्ति (सैती, भल्ली) धरणारा, मयूरध्वज असा स्कंद (कार्तिकस्वामी) करावा ॥४१॥
शुभ्र व चारदंतांचा इंद्राचा हत्ती, त्यावर हातात वज्र (आयुधवि०) व तिरकस ललाटावर तिसरे नयन हेही चिन्ह, असा इंद्र करावा ॥४२॥
शिवाच्या मस्तकी चंद्राची कला, वृषभध्वज, वर तिसरा नेत्र, एका हातात शूल व दुसर्यात पिनाक सं० धनुष्य असा शिव करावा. अथवा डाव्या अर्ध्याअंगी पार्वतीचे अर्धांग करावे म्ह० अर्धगौरीश्वर होतो ॥४३॥
कमलचिन्हित हात व चरण, शांतस्वरूप, फार आखूड केश, कमलासनावर बसलेला, सर्व जगतास पित्यासारखा असा बुध (बौद्ध) करावा ॥४४॥
गुडघ्यांपर्यंत लांब हात, श्रीवत्सचिन्हित, शांतमूर्ति (जितेंद्रिय, हास्यवदन, नग्न, तरुण वयस्क, सुंदररूप, असा अर्हतांचा म्ह० जैनांचा देव (जीन) करावा ॥४५॥
नासिका. ललाट, पोटर्या, मांडया, गाल, ऊर, हे सूर्याचे उंच करावे. उदीच्य (उत्तर दिशेकडील पुरुषांच्या वेषासारखा वेष,) पायांपासून उरापर्यंत गुप्त (चोलकधारी,) आपल्या नखात बाहूही २ कमले धारण करणारा, मस्तकी मुकुट धारक, कुंडलांनी शोभित मुख, गळ्यांत लांब हार, वियद्न (सारसपक्षी यानी वेष्टित ॥४६॥४७॥
कमलाच्या गाभ्यासारख्या कांतीने युक्त मुख, कंचुक (आंगरखा) याने गुप्तशरीर, हांस्ययुक्त व प्रसन्नमुख, रत्नांसारखी लखलखित कांतिसमूहाने युक्त, असा सूर्य, कर्त्यास शुभकारक होतो ॥४८॥
१ हस्तप्रमाण दीर्घ प्रतिमा शुभ, २ हात उंच प्र० द्रव्य देणारी, ३ हस्तप्रमाण उंच प्रतिमा कल्याण करणारी होते व ४ हात उंच प्रतिमा सुभिक्षकारक होते ॥४९॥
प्रतिमा अतिस्थूल असेल तर राजभय, कमी अवयवांची असे० कर्त्यास अशुभकारक, कृशउदर असे० दुर्भिक्षभय, कृश असे० द्रव्यनाश ॥५०॥
व्रण (खळगे) युक्त असे० शस्त्रपाताने कर्त्यास मरण सांगावे. डाव्या आंगास नम्र असे० असे० कर्त्याचा आयुष्यनाश ॥५१॥
ऊर्ध्वदृष्टि असे० कर्त्यास अंधत्व, अधोमुखद्दष्टि (खाली पहाणे) असे० क० चिंता होते, याप्रकारे सर्व प्रतिमांचे शुभाशुभ फल सूर्यप्रतिमेस सांगितल्यासारखे जाणावे ॥५२॥
लिंगाच्या वृत्ताचा घेर मोजून तितकी लांबी करावी. त्या लांबीचे तीन भाग करावे. त्यातील पहिला चतुरस्र, मध्ये अष्टकोण. तिसरा वर्तुळ करून, पहिला चतुरस्र भूमीत, मध्य अष्टास्रि पिंडिकेत (बैठकीत) बसवावा. तिसरा वर्तुळभाग चहूकडून उंचीने सारखा द्दश्य असा करावा; जितका लिंगाचा द्दश्यभाग त्याचे उंचीइतकी श्वभ्रा (खळगा) पासून समंतत: (सभोवती) पिंडिका असावी ॥५३॥५४॥
लिंग, कृश किंवा दीर्घ (महान) होईल तर देशनाश, जे पार्श्वभागी हीन हे नगराचा नाश करिते. ज्या लिंगाच्या मस्तकी क्षत (खळगा) ते कर्त्याचा नाश करिते ॥५५॥
मातृसमूह, आपल्या नावाच्या देवासारख्या चिन्हांचा करावा. रेवंत (पाचवा मनु,) अश्वारूढ मृगयाक्रीडादि परिवर युक्त करावा ॥५६॥
यम, दंड, हस्त व महिषारूढ (रेडयावर बसलेला) असा करावा. वरुण, हंसावर बसलेला व पाश हातात असा करावा. कुबेर, मनुष्यावर बसलेला व वाम (डाव्या) नागी मुकुट व विस्तीर्ण कुक्षि असा करावा. (कोठे खरवाहन: कुबेरो असा पाठ आहे) ॥५७॥
गणपति, हत्तीच्या मुखाचा, लांब पोट, कुर्हाड धारण करणारा, एकदंत, मूलककंद व सुनीलदलकंद याते धारण करणारा असा करावा ॥५८॥
॥ इतिबृहत्संहितायांप्रतिमालक्षणंनामाष्टापंचाशोध्याय: ॥५८॥