माला, सुगंधद्रव्ये, सुधूप, वस्त्र, अलंकार, अनुलेपन इ० पांढर्या केशांच्या पुरुषास शोभवीत नाहीत. यास्तव केशांची रंजनरूप सेवा, जशी अंजनाने नेत्रांची व भूषणांची सेवा करतात तशी करावी ॥१॥
हरकांचे तांदुळ लोखंडाच्या भांडयांत पांढर्या आंबट पेजीमध्ये पक्व करून नंतर लोहचूर्णासहित त्याचे बारीक पिष्ट करून शुभ्र आंबट पेज इत्यादिकाने आर्द्रकेश अशा मस्तकाच्याठाई लेप करून रुईच्या पानांनी वेष्टन करून दोन प्रहर रहावे ॥२॥
दुसरा प्रहर गेला असता तो लेप काढून मस्तकी आंवळकाठीचा लेप द्यावा आणि दोन प्रहर पर्यंत ओल्या पानांनी आच्छादन करून मस्तक धुवावे म्ह० काळे होते. (मस्तकावरील केस काळे होतात) ॥३॥
नंतर मस्तकस्नान, सुगंधतैल यानी करून मस्तकाचा लोहाम्लगंध धूऊन नंतर मनोहर असे नानाप्रकारचे गंधव धूप यांनी युक्त अंत:पुरामध्ये राज्यसुखाते सेवन करावे. (स्वस्त्रियांसहवर्तमान क्रीडा करावी) ॥४॥
दालचिनी, कोळिंजन चंदीचे बी, गुलछबू किंवा पवारी, मोगरी, बोळ किंवा राळ, तगर, वाळा, नागकेशर, तमालपत्र, ही समभाग चूर्ण करून त्याने शिरस्त्रान राजास योग्य होय. (हे उटणे मस्तकास लावावे) ॥५॥
मंजिष्ठ, नखला, शंखोद्भवचर्म, दालचिनी, कोळिंजन, बोळ किंवा राळ, यांचे चूर्ण समभाग करून तैलयुक्त करावे आणि सूर्यकिरणांमध्ये तापवावे ते तैल चंपकगंधि होते ॥६॥
तमालपत्र, ऊद, वाळा, तगरमूळ, ही समभाग घेऊन चूर्ण करावे तो गंध कामोद्दीपक होतो. हाच रोहिसगवताने सहित व कटुका (सुगंधि तृणवि०) व हिंगुळ यांच्या धुराने धूपित करावा म्ह० बकुलसं० गंध होतो. तो पूर्वोक्त गंध कोळिंजनयुक्त मेला म्ह० उत्पलगंधिक होतो. तो पूर्वोक्त चंदनयुक्त केला म्ह० चंपकसं० होतो. तो पूर्वोक्त जायपत्री व दालचिनी यांनी युक्त व धन यानी सहित केला म्ह० अतिमुक्तकसद्दश गंध होतो ॥७॥
बाळंतशोप व कवडया ऊद ही २ चतुर्थांश; नख (शंखोद्भव चर्म किंवा नखला) ही अर्धभाग; चंदन व गव्हला हे २ भाग; असे एकत्र करावे. हा गंध गुळ व नख यांबरोबर अग्नीत घालून धूर करावा (तो अत्यंत सुगंध होतो) ॥८॥
गुग्गुंल, वाळा, लाख, नागरमोथा, नखला, साखर, ही समभाग घेऊन धूप करावा. जटामांसी, वाळा, धूप, नखला, चंदन, ही समभाग घेऊन दुसरा धूप करावा तो पिंडधूप होतो ॥९॥
१ हरडेदळ, २ नखला, ३ नागरमोथा, ४ बोळ, ५ वाळा, ६ गुळ, ७ कोष्ठ, ८ दगडफूल, ९ कचूर किंवा नागरमोथा, ही नऊ चतुर्थांशवर्धित एकत्र करून बहुत मनोहर धूप होतात. (हरडे १ भाग, नखला २ भाग, नागरमोथा ३ भाग इ० मुस्तक ९ भाग एकत्र केली म्ह० धूप होतो. अथवा हरीतकी, नखला, नागरमोथा, बोळ, वाळा ही पादादिविर्धित व गुड व कोष्ठ यांनी युक्त केले म्ह० दुसरा धूप, हेच दगडफूल व कचूर यांणी युक्त केले म्ह० तिसर धूप असे बहुत धूप होतात.) ॥१०॥
साकर, दगडफूल, नागरमोथा यांचे चार चार भाग; विशेषधूप, राळ यांचे दोन दोन भाग; नखला, गुगुळ यांचे दोन दोन भाग हे बारीक करून त्यात कापूर बारीक करून त्याचा एक भाग घालावा. नंतर मधाने गोळा करावा. हा कोपच्छदनामक, राजधूप होतो ॥११॥
दालिचिनी, वाळा, तमालपत्र यांचे ३ भाग; याचे अर्धे लहान एकचीचे चूर्ण घालावे म्ह० पटवास (अंगोत्धूलन) सुंगध होतो. यात कस्तूरी व कर्पूर यांचे चूर्ण मिश्र मेले म्ह० श्रेष्ठ होतो ॥१२॥
१ नागरमोथा, २ कवडयाऊद, ३ दगडफूल, ४ कापूर, ५ वाळा, ६ नागकेशर, ७ समुद्रफेस, ८ मोगरी, ९ अगुरु, १० दवान, ११ नखला, १२ तगरमूल, १३ धने, १४ कापूर, १५ चोरओवा, १६ चंदन, ही १६ द्रव्ये चार चार स्वेच्छेने एक, दोन, तीन, चार भागांनी फिरवून मिश्रित करावी. म्ह० गंधसमुद्र होतो (बहुतगंध होतात) ते असे - नागरमोथा १ भाग, कवडायाऊद २ भा., दगडफूल ३ भा., कर्पूर ४ भाग, हा एक गंध. नाग० १ भा० कव० २, दगड० ४, कर्पूर ३ भाग, हा दुसरा. घ० १, क० ३, द० २, कापूर ४ हा तिसरा. घ० १, क० ३, द० ४, का० २ हा चवथा. घ० १, क० ३, द० २, कापूर ४ हा तिसरा. घ० १, क० ३, द० ४, का० २ हा चवथा. घ० १, क० ४, द० २, का० ३ हा पंचम, घ० १, क० ४, द० ३, का० २ हा सहावा गंध. अशा प्रकारे अनेक गंध होतात. ॥१३॥१४॥
धन्यास बहुत धूपत्व आहे यास्तव सर्वगंधांत त्यांचा एकच अंश द्यावा. कापुरासही अत्युल्बण गंधत्व आहे यास्तव कमी द्यावा २।३ इत्यादि भाग जरी अनुक्रमाने प्राप्त झाले तथापि देऊ नयेत कापुराचा तर त्यापेक्षा कमी असावा (करण त्याचा गंध फार यास्तव अन्य द्रव्यांचा गंध नाशा होतो) ॥१५॥
विशेषधूप, राळ, गुळ, शंखोद्भवचर्म या चार द्रव्यांनी ते पूर्वोक्त अनुक्रमाने प्रत्येक मिश्रित करावे. एकत्र करून मिश्रित न करावे. नंतर कर्पूरयुक्त कस्तूरिकेने बोध (बारिकात बारिकाचे मिश्रण) करावा ॥१६॥
येथे गंधद्रव्यगणांमध्ये १,७४,७२० एकलक्ष चवर्याहात्तर हजार सातशे वीस गंध होतात ॥१७॥
पूर्वोक्त (श्लो० १३।१४) एक एक द्रव्याचा एक भाग अन्य तीन द्रव्यांचे २।३।४ भागिकद्रव्यांनी युक्त केले असता सहागंध होतात. तसेच ।२।३।४ भागयुक्त करावे ॥१८॥
पूर्वोक्त चार द्रव्यांच्या योगाने एकाचे २४ गंध होतात. असेच शेष तीन चतुष्कांचेही होतात. एकंदर सर्व गंधसमुदाय ९६ होतो ॥१९॥
सोडा द्रव्ये (श्लोक १३।१४) चव्वीस विकल्पाने भिद्यमान अ० वीससहित १८ शते गंध होतात ॥१८२०) ॥२०॥
चोहोंनी विकल्पित जो गंधसमूह त्याचे ९६ भेद होतात यास्तव तो ९६ नी गुणावा म्हणजे जितकी संख्या येईल तितकी गंधांची संख्या होते ॥२१॥
१६ पासून एकापर्यंत अंक मांडून पूर्वांत द्वितीय मिश्रित करावा. याप्रमाणे १६ वाचून करावे म्ह० संख्या होते असे बोलतात. इच्छेप्रमाणे अनुक्रमाने नेऊन पुन:मागे परतावे असे केले म्हणजे अनेक गंधसंख्या होते ॥२२॥
अगुरु २ भाग, तमालपत्र ३, धूप ५, दगडफूल ८; गवला ५, नागरमोथा ८, बोळ २ वाळा ३, ॥२३॥
मोगरी ४, दालचिनी १, तगर ७, जटामांसी ६; चंदन ७ नखला ६, विशेषधूप ४, दालचिनी १, तगर ७, जटामांसी ६; चंदन ७ नखला ६, विशेषधूप ४, कवडयाऊद १; असे चार चार द्रव्यांचे याप्रमाणे भाग एकत्र करावे म्ह० १६ गंध होतात ॥२४॥
या पूर्वोक्त षोडशक कच्छपुटी कोणत्याही प्रकारे मिश्रित जी चार द्रव्ये त्यांनीकरू जे येथे १८ भाग होतात ते येथे गंधयोग जाणावे ॥२५॥
नखला, तगरमूळ, ऊद, यांनी युक्त व जायपात्री, कापूर, कस्तूरी, यांनी उद्वोधित (मिश्रित) व गुळ, नखला यांणी धूप्य असे गंध करावे म्ह० ते सर्वतोभद्र होतात ॥२६॥
स्वेच्छापरिगृहीत पूर्वोक्त चार चार द्रव्ये जायफ्ळ, कस्तूरी, कापूर यांनी बोधित व आम्ररसयुक्त मधाने सिंचित केले असता, बहुत पारिजातसद्दश गंध होतात ॥२७॥
राळ, धूप, यानी युक्त जे धूपयोग त्यांनी करून व धूप व राळ यानी रहित आणि वाळा व दालचिनी यानी युक्तकरून चूर्ण स्नानयोग्य होते (उटणे) ॥२८॥
१ लोध्र, २ वाळा, ३ तगरमूळ, ४ अगरु, ५ नागरमोथा, ६ तमालपत्र, ७ गव्हाला, ८ लहान नागरमोथा, ९ हरडा ही नवकोष्ठकच्छपुटापासून तीन तीन द्रव्ये काढून ॥२९॥
त्यात चंदन व धूप यांचा एक एक भाग व शंखोद्भवचर्म याचे दोन भाग, बाळंतशोपेचा चतुर्थभाग असे योजून कापूर, हिंगूळ, गूल याही धूपित केले म्हणजे ८४ केसरगंध होतात ॥३०॥
दंतकाष्ठलक्षणाध्यायोक्त दंतकाष्ठे हरडयांनी मिश्रित गोमूत्रामध्ये सात दिवस ठेवावी. पुन; वक्ष्यमाण गंधोदकामध्ये अर्धादिवस अर्धादिवस ठेवावी. ॥३१॥
ते गंधोदकएकची, दालचिनी, तमालपत्र, बदर (बोर,) मध, मिरी, नागकेशर, कोळिजन, यांच्या समभागांनीकरून युक्त उदक केले म्ह० ते गंधोदक होते ॥३२॥
जायफळ ४ भाग, तमालपत्र २ भाग, बारीकएलची १ भाग, कापूर ३ नाग ही एकत्र करून त्यांणी अवचूर्णित करून ती दंतकाष्ठे सूर्यकिरणात शुष्क करावी ॥३३॥
पूर्वोक्तगंधयुक्त दंतकाष्ठांनी दंतधावन केले असता दंतधावन करणारास, उत्तमकांति, मुखसुंदर, मुखस्वच्छ व सुगंध; वाणी श्रोतसुखकरणारी असे गुण दंतकाष्ठे करतात ॥३४॥
तांबूल सेवन केले असता हे गुन व अन्यही गुण होतात. कामोत्पत्ती होते. शरीर शोभा करिते. सौभाग्य करिते. मुखास सुगंधित करिते. बल करिते. कफोत्पन्न रोगांचा नाश करिते. असे हे व अन्य पूर्वोक्त गुणही करिते ॥३५॥
योग्य (अधिक व कमीही नव्हे) चुन्याने रंग होतो. सुपारी अधिक अ० रंगाचा नाश होतो. चुना अधिक झाला तर मुखास दुर्गंध होतो. पत्राधिक तांबूल अ० उत्तम गंध करते ॥३६॥
रात्रेस पत्राधिक तांबूल हितकारक होय. दिवसास पूगीफलसहित हित होय. याहून अन्यथा करणे विडंबन होय. कंकोल, सुपारी, लवंग, जायफळ यानी सुगंधित तांबूल पुरुषाते मदानंदाने आनंदित करिते ॥३७॥
॥ इतिबृहत्संहितायामंत:पुरचिंतायांगंधयुक्तिर्नामसप्तसप्ततितमोध्याय: ॥७७॥