॥ उपनयनाध्याय: ॥
सर्व जगत् ज्यापासून उत्पन्न होते असा, स्थावरजंगमात्मक जगाचा आत्मा, आकाशाचे स्वाभाविक भूषण, पातळ झालेल्या सुवर्णासारख्या हजार किरणांच्या मालेनेपूजित असा सूर्य सर्वोत्कर्षे वर्ततो ॥१॥
अन्य ज्योति:शास्त्रे असता हे का आरंभिले याचे कारण या श्लोकाने सांगतात. व्रम्हयाने सांगितलेल्या सत्यरूप विस्तृत ग्रंथाच्या अर्थाते अवलोकन करून, मी वराहमिहिराचार्य स्वल्प नव्हत व अतिविस्तृतही नव्हत अशा वाक्यपदांच्या मध्यम रचनाही स्पष्ट बोलण्यास उद्युक्त झालो आहे ॥२॥
हे शास्त्र प्राचीन मुनी जे ब्रम्हा इत्यादिक यानी केले यास्तव श्रेष्ठ होय. मनुष्याने केलेले शास्त्र श्रेष्ठ नव्हे. अर्थ एकच असला म्हणजे वेदावाचून इतर ग्रंथांत काही चिंता नाही वेदात मात्र तीच अक्षरे म्हटली पाहिजेत ॥३॥
ब्रम्होक्तग्रंथात क्षितितनयदिवसवार: नशुभकृत् अशा अक्षरांनी भौमवार शुभ नव्हे असे सांगितले. व मनुष्योक्त ग्रंथात कुजदिनमनिष्टं भौमवार शुभ नव्हे असे सांगितले येथे मनुष्यकृत व देवकृत शास्त्रात एकच अर्थ आहे. यास्तव यात विशेष नाही ॥४॥
ब्रम्हादिऋषींनीं केलेले विस्तृतशास्त्र पाहून क्रमाने व संक्षेपानेच हे क्रियमाण शास्त्र करितो यास्तव मला उत्साह (शृंगार) आहे ॥५॥
हे सर्व जगत् अंधकाररूप होते. त्यात प्रथमत: उदक उत्पन्न झाले. त्या उदकात सुवर्णाचे व तेजस्वी असे अंड उत्पन्न झाले. त्याची स्वर्ग व भूमि अशी दोन खंडे झाली. त्यामध्ये सर्व जगत् उत्पन्न करणारा व चंद्र सूर्य ज्याचे नयन असा ब्रम्हादेव उत्पन्न होता झाला ॥६॥
तात्पर्य - तमोभूत या जगतामध्ये अव्यक्त ईश्वरास प्रजा उत्पन्न करण्याची जेव्हा इच्छा झाली त्याकाळी प्रथम जल उत्पन्न केले. त्यामध्ये वीर्य सोडिले ते अंड सौवर्ण व सूर्यासारखे तेजस्वी होते झाले त्यामध्ये ब्रम्हादेव झाला. त्याने तेथे एक वर्ष राहून, नंतर देवाचे ध्यान करून दोन शकले केली. त्यातून एका शकलाचा स्वर्ग व एकाची भूमि केली. तो ब्रम्हा, ज्याचे चंद्रसूर्य नयन, सर्व लोकांचा पितामह व विश्वकर्ता असा झाला. (स्मृतिकार:)
सांख्याचार्य कपिलमहामुनी प्रकृतिजगदुत्पत्तीचे कारण असे म्हणतात. कणादऋषि, द्रव्यादि सहा (द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय) पदार्थ जगदुत्पत्तीस कारण असे म्हणतात. कोणी कालकारणिक (पौराणिक) जगताचे कारण काल म्हणतात. अन्य लोकायतिक (चार्वाकमतानुसारी, बौद्ध, नास्तिक) स्वभाव कारण म्हणतात. मीमांसक शुभाशुभ कर्म जगताचे कारण म्हणतात ॥७॥
प्रसंगवादी अर्थविचार महान आहे आणि ज्योति:शास्त्राच्या अंगांचा विचार मला येथे बोलावयाचा आहे. यास्तव जगदुत्पत्तिप्रसंगवाद पुरे ॥८॥
बहुभेदविषयक ज्योति:शास्त्र, गणित, होराव शाखा, एतत्संज्ञक तीन स्कंधामध्ये निर्दिष्ट आहे. त्या ज्योति:शास्त्राचे सर्व कथन ज्यात आहे, त्याचे नाव संहिता, असे मुनि म्हणतात. ज्या ज्योति:शास्त्रामध्ये गणिताने सूर्यादिग्रहांची गति समजते त्या गणितस्कंधाचेच तंत्रस्कंध असे नाम होय. हा पहिला स्कंध. लग्न (होरा) याचा निश्चय ज्याने होतो तो होरास्कंध दुसरा होय. अन्य वक्ष्यमाण जो स्कंध तो शाखास्कंध तिसरा होय. असे मुनींनी सांगितले आहे ॥९॥
भौमादिग्रहांचे वक्र, मार्ग, अस्त, उदय, इत्यादिक मी करणसिद्धांतिकेमध्ये सांगितले. विस्ताराने जातक होराशास्त्रामध्ये संबद्ध आहे. ते यात्राविवाहपटलासहवर्तमान मी पूर्वीच सांगितले ॥१०॥
प्रश्र, उत्तर, कथाप्रसंग (आख्यायिका, म्ह. पूर्वीच्या गोष्टी) सूर्यादि ग्रहांच्या उत्पत्ति, यांचा थोडा उपयोग यास्तव ती टाकून, जे सारभूत म्ह. श्रेष्ठ (प्रत्यक्ष अनुभवास येणारे) भूतार्थ म्ह. सत्यार्थ (अनुभवास आलेले) ते परिपूर्ण अर्थांसहित सांगतो ॥११॥
॥ इतिवराहमिहिरकृतौबृहत्संहितायांउपनयनाध्याय:प्रथम ॥१॥