मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|बृहत्संहिता|
अध्याय ५५

बृहत्संहिता - अध्याय ५५

शके ८८८ फाल्गुन कृष्ण द्वितीया गुरुवारी उत्पलनामकाने ही टीका केली.


आसमंताद्भागी छायेने रहित असे जलाशय (विहिरी, तळी इ०) सुंदर दिसत नाहीत यास्तव जलाशयाचे सभोवार आराम (बाग) करावे ॥१॥

मधुर व कोमल (मृदु) भूमि सर्व वृक्षांस हितकारक होय. यास्तव त्या भूमीवर तील पेरून ते फुलले म्हणजे त्यांचे तेथेच मर्दन करावे. झाडे लावावयाचे भूमीवर हे कृत्य प्रथम करावे ॥२॥

कडुनिंब, अशोक, सुरंगी, सिरस, गहुला हे वृक्ष मंगलकारक यास्तव बागेत किंवा गृहाजवळ हे प्रथम लावावेत ॥३॥

फणस, अशोक, केळी, जांबळी, ओटी, डाळिंब, द्राक्षी, पालीवत, महाळुंग,कस्तुरीमोगरा किंवा टेंभुरणी ॥४॥

हे वृक्ष कांडरोप्य आहेत म्हणजे बीजांपासूनच झाडे करण्याची गरज नाही. या वृक्षांच्या खांद्या तोडून लावल्या असता वांचतात (फुटतात) यास्तव तोडलेल्या खांदीस त्याजवर किंवा खांदीवर दुसर्‍या (सजातीय किंवा विजातीय) झाडाचे खांदीचे कलम करावे. त्यावर मातीचा लपेटा द्यावा. ज्यांस फुले व फळे येतात अशा झाडांच्या खांद्या जगतात ॥५॥

अंकुर न फुटलेले वृक्ष शिशिरात (माघ फाल्गुनात,) अंकुर फुटलेले हेमंतात (मार्गशीर्ष पौषात,) खांद्या फुटलेले वर्षाकाली (श्रावणभाद्रपदात) लावावे. वृक्ष उपटण्यापूर्वी त्याचे जे अंग ज्या दिशेस होते तेच अंग त्याच दिशेस होईल असा वृक्ष लावावा (उपटण्यापूर्वी दिशा समजण्यासाठी झाडास चुन्याची वगैरे खुण करून ठेवावी) ॥६॥

तूप, वाळा, तीळ, मध, वावडिंग, दूध, गाईचे शेण, यांचा मूळापासून खांद्यापर्यंत लेप करून, वृक्ष अन्य देशास नेऊन लाविला तरी जगतो ॥७॥

शुद्ध होऊन, वृक्षास स्नान घालून अनुलेपनादिकांनी त्याची पूजा करून लावावा. असा लावलेला वृक्ष त्याच पानांनी होतो. पुर्वीची पाने शुष्क होत नाहीत ॥८॥

ग्रीष्मऋतूमध्ये लावलेले वृक्ष सायंकाळी व प्रात:काळी शिंपावे. हेमंत व शिशिर ऋतूंमध्ये एक दिवस सोडून शिंपावे. वर्षाऋतूत भूमि शुष्क झाली म्हणजे शिंपावे ॥९॥

जांभूळ, वेत, पारसापिंपळ, कळंब, उंबर, अर्जुन, लिंबू, द्राक्ष, ओटीचे झाड, डाळिंबीव एलची, अशोक व तिवर, कंज, तिलक, फणस, तिमिर (वृक्षवि०,) अम्रातक (अंबाडा,) हे सोळा वृक्ष पाणथळ देशांत होणारे होत ॥१०॥११॥

एका वृक्षापासून दुसरा वृक्ष लावणे, वीस हातांवर उत्तम, सोळा हातांवर मध्य, बारा हातांवर कनिष्ठ होय ॥१२॥

समीप झालेले वृक्ष परस्पर स्पर्श करतात व पाळे मिश्र होतात, यास्तव पीडित होऊन उत्तमप्रकारे फळे देत नाहीत ॥१३॥

थंडी, वारा व ऊन यांनीकरून वृक्षांस रोग होतो. त्या रोगाने पांढरी पाने, अंकुर न वाढणे, शाखा शुष्क होणे, रस गळणे, ही होतात या चिन्हांवरून रोग झाला असे समजावे ॥१४॥

अशा रोगग्रस्त वृक्षांचे प्रथम शस्त्राने व्रणादिकाचे शोधन करावे. वावडिंग, घृत, कर्दम, ही एकत्र करून त्याचा लेप व्रणादिकावर करावा आणि पाण्यात दूध घालून  ते शिंपडावे असे केले म्हणजे रोग जातो ॥१५॥

वृक्षांची फळे गळतील किंवा नासतील तर कुळीथ, उडीद, मूग, तीळ, यव, हे पदार्थ दुधात घालून शिजवावे. नंतर थंड करून त्याने वृक्षांचे सिंचन करावे म्हणजे फळे व फुळे यांची वृद्धि होते ॥१६॥

मेंढा व बकारा यांच्या विष्ठेचे (लेंडीचे) चूर्ण २ आढक, तिळांचे चूर्ण १ आढक, सातूंचे चूर्ण एक प्रस्थ, उदक एक द्रोण व इतक्यांबरोबर गोमांस ॥१७॥

ही एकत्र करून सात रात्री ठेवावी त्याने पाहिजे त्या ऋतूंत वृक्षांचे सिंचन करावे म्हणजे वल्ली, १ मासा, १६ मासे १ तोळा, ४ तोळे १ पल, ४ पले १ कुडव, ४ कुडव १ प्रस्थ, ४ प्रस्थ १ आढक, ४ आढक १ द्रोण १ मण, ४ मण १ खंडी, १०० पले १ तुला, २० तुला म्हणजे १ भार) ॥१८॥

हातास तूप लावून त्या हाताने दहा दिवस दुधाने कोणत्याही झाडाचे बीजास सिंचन करावे नंतर गोमयाने बहुतवेळ मर्दन करावे. नंतर ते बीज भांडयात ठेवून त्यास डुकर व हरिण यांच्या मांसाची धुरी द्यावी. आणि मत्स्य व डुकर यांच्या वसेने युक्त करून पूर्वोक्त कामवलेल्या (तीळ लावून तो फुलल्यावर मोडलेल्या) जमिनीत लावावे. नंतर दूध आणि पाणी एकत्र करून त्याने शिंपावे म्हणजे ते बीज त्वरित पुष्पयुक्त होते ॥१९॥२०॥

भात, उडीद, तील, यांचे चूर्ण व सातू आणि दुर्गंधियुक्त मांस यांनी सिंचन करून, हळदीने धूपित केलेले चिंचेचे झाड, अति कठीण असताही नूतनाकुर असे होते. मग इतर झाडे होतील यात काय संशय ! ॥२१॥

कपित्थ (कवठी) यास नवीन पल्लव आणणे असल्यास उपाय. कांचन, आवळी, धावडा, अडुळसा, यांची मूळे; वेत व रुविमांदार यांच्या पर्णयुक्तवल्ली; धोतरा व तिवर यांची मूळे, अशी ८ घालून ॥२२॥

तापिवलेले दूध निववून त्यात कवठीचे बीज टाकून शंभर टाळ्या वाजवण्याच्या काळापर्यंत ठेवून, ते बीज दिवसास सूर्यकिरणांनी सुखवावे असा विधि दररोज (३० दिवस) करावा नंतर ते बीज परावे ॥२३॥

हातभर लांबरुंद व दोन हात खोल असा खळगा काढून तो पाणी व दूध मिश्र करून त्याने पूर्ण करावा आणि शुष्क झाल्यानंतर अग्नीने दग्ध करावा. नंतर मध व घृत यात भस्म घालून त्या खळग्यास लेप करावा ॥२४॥

उडीद, तीळ, यव यांचे चूर्ण करुन ते आतील मृत्तिकेशी मिळवावे व मत्स्य, मांस यांनी युक्त जलाने युक्त करून कठीण होईपर्यंत ताडण करावे (ठोकावे) ॥२५॥

त्यात चार अंगुलाखाली बीज पेरावे आणि मत्स्य, मांससहित उदकाने सिंचन करावे; म्हणजे वृक्षास चांगले व आश्चर्यकारक असे अंकुर येतत व ते मंडपाप्रत शीघ्र आवरण (वेष्टन) करितात ॥२६॥

अंकोलवृक्षाच्या फलकल्काने (रसाने) शंभर वेळ सिंचित अथवा त्याच्या तेलाने शंभर वेळ सिक्त, अथवा भोकरीच्या कल्काने किंवा तेलाने शंभर वेळ सिक्त कोणतेही बीज करून ॥२७॥

गारांच्या पाण्याने मिश्रभूमीत पेरावे म्हणजे त्याचक्षणी त्या बीजास अंकुर येतात. नंतर फळभाराने युक्त खांद्या होतील यात काय आश्चर्य आहे ॥२८॥

भोकरीचे बीज बुद्धिमंताने कृत्रिमतुष काढून अंकोलयुक्त जलाने भिजवून छायेत वाळवावे, असे सात दिवस करून म्हशीच्या शेणात घर्षण करून त्याच शेणात गारांनी युक्त मृत्तिकेत पेरावे त्यास एक दिवसात फळ येते ॥२९॥३०॥

उत्तरात्रय, रोहिणी, मृग, रेवती, चित्रा, अनुराधा, मूळ, विशाखा, पुष्य, श्रवण, अश्विनी, हस्त ही नक्षत्रे दिव्यद्दगऋर्षींनी वृक्ष लावण्यास शुभ सांगितली आहेत ॥३१॥


॥ इतिबृहत्संहितायांवृक्षायुर्वेदोनामपंचपंचाशत्तमोध्याय: ॥५५॥

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP