खंजनकनामक (यासच खंजरीट, खंजखेट म्हणतात.) हा पक्षी श्रावणादि चार महिने दिसत नाही. यास्तव त्याच्या प्रथमदर्शनी कश्यपादि ऋषींनी जी फले सांगितली ती सांगतो ॥१॥
जो खंजनपक्षी शरीराने मोठा, उंचमानेचा, काळ्याकंठाचा तो भद्रसंज्ञक कल्याणकारक होय. मुखापासून कंठापर्यंत कृष्णवर्ण जो खंजन तो फार कल्याणकारक असून इच्छा पूर्ण करितो ॥२॥
ज्या खंजनाच्या कंठावर काळा बिंदु असतो व ज्याचे गाल श्वेत असतात तो रिक्तसंज्ञक सर्व फल शून्य करितो. पीतवर्ण खंजन गोपीतसंज्ञक तो द्दष्टीस पडला तर क्लेशकरणारा होय ॥३॥
गोड व सुगंधि आहेत फले व पुष्पे ज्या वृक्षांची त्यांवर, पवित्र जलाशय (सरोवरादि) यांच्याठाई, हत्ती, घोडे, सर्प, यांच्या मस्तकावर; देवालये, उद्याने (बागा,) गृहे यांच्याठाई, ॥४॥
गाईवर, गोठयावर, साधुसमूह, यज्ञ, विवाहादि उत्सव, राजा, ब्राम्हाण, यांच्या समीप; ह्त्ती, घोडे यांच्या शाला (गृहे) यांवर; छत्र, ध्वज, चामर (चवरी,) झारी, कुंभ इत्यादिकांवर ॥५॥
सुवर्णांजवळ, श्वेतवस्त्र, कमल, नीलकमल, पूजित व उपलिप्तस्थान यांच्याठाई; दहयाचे भांडे, धान्याच्याराशि, यांच्याठाई खंजनपक्षी प्रथम पाहिला तर, लक्ष्मी प्राप्त होते ॥६॥
खंजनपक्षी चिखलावर बसलेला पाहिला तर चांगले अन्न मिळेल,. गोमयावर पाहिला तर गोरससंपत्ति होते. हिरव्या गवतावर पाहिला तर वस्त्रप्राप्ति होते. गाडयावर पाहिला तर देशनाश होतो ॥७॥
घरावर पाहिला तर द्रव्यनाश. चर्माच्या रज्जूवर पाहिला तर बंधन. अपवित्रस्थानी पाहिला तर रोग होतो. बकरा व मेंढा यांच्या पाठीवर पाहिला तर शीघ्र प्रियप्राप्ति होते ॥८॥
महिष, उंट, गर्दभ, अस्थि, स्मशान, गृहकोण, वाळूचा पर्वत, प्राकार (दगडादिकांनी बांधलेले कूसू,) भस्म, केश, यांच्याठाई खंजनपक्षी पाहिला तर अशुभ व मृत्यु, रोग यांचे भय करितो ॥९॥
पक्ष हालत असता खंजन पाहिला तर शुभ नव्हे. नदीवर राहून उदक प्राशन करिताना पाहिला तर शुभ होय. सूर्योदयी खंजन पाहिला तर शुभ. सूर्यास्ती पाहिला तर अशुभ होय ॥१०॥
नीराजनविधि समाप्त झाल्यावर, ज्या दिशेकडे खंजनपक्षी जातो असे राजा पाहील; त्या दिशेने राजा गेला तर शत्रू शीघ्र वश होईल (शत्रूस जिंकील) ॥११॥
खंजनपक्षी ज्या स्थली मैथुन करील, त्या भूमीमध्ये निधि (द्रव्य) असते. ज्या स्थळी ओकेल त्याचे खाली भूमीत काच असते. जेथे विष्ठा करील तेथे कोळसे खाली असतात, असे ऋषि सांगतात. याविषयी प्रत्यक्ष अनुभव पहावा म्हणजे खात्री होईल ॥१२॥
मृत, विकलांग, भिन्नशरीर, रोगी असा खंजन द्दष्टीस पडेल तर, तो पाहणारास आपल्या शरीरासारखे, फल देतो (मृत पाहील तर, मरतो इ.) आपल्या समोर, घरामध्ये जात आहे, असा पाहिला तर धन देणारा होतो. आकाशामध्ये उडताना पाहिला तर बंधुसमागम होतो ॥१३॥
राजानेही शुभ खंजनपक्षी शुभदेशी पाहून, पृथ्वीवर सुगंधिपुष्पे धूप यांनीयुक्त अर्घ करावे. असे केले म्हणजे राजा आनंदित होऊन शुभफलवृद्धीते पावतो ॥१४॥
राजा, अनिष्टही खंजनपक्षी पाहून, ब्राम्हाण, गुरू, साधु, देव यांच्या पूजेविषयी तत्पर असेल (पूजाकरील) तर व सात दिवस मांसभक्षण करणार नाही तर, त्यास अशुभफल होत नाही ॥१५॥
खंजनाच्या प्रथमदर्शनाचे फल वर्षपर्यंत होते व दररोजचे दर्शनाचे शुभाशुभफल. तो दिवस शेष आहे तेथपर्थंतच होते. ते फल दिशा, स्थान, मूर्ति, लग्न, नक्षत्र, शांत, दीप्त इत्यादिकाने शुभाशुभ जाणावे. (पूर्व, उत्तर, ईशानी हया दिशा शुभ, स्थान श्लो. ४ पासून पहावे. मूर्ति श्लो. २ व १३. लग्न, (शुभग्रहयुक्त व द्दष्ट.) ध्रुव, मृदु नक्षत्रे शुभ. क्षिप्र, चर, साधारण, मध्यम. उग्र अशुभ. शांतदिशा शुभ. दीप्तदिशा अशुभ ॥१६॥
(खंजरीटपक्षी हा काशी जवळ सापडतो. त्यास शेंडी फुटते व ती त्याचे मस्तकावर आहे तोपर्यंत ती सांपडेल तर ती हातात घेतली असता मनुष्य आपश्य होतो. अशी माहिती वृद्ध सांगतात. हा पक्षी दिसत असतो तेव्हा धरून पिंजर्यात बाळगावा. त्यास शेंडी फुटली म्हणजे ती काढून घ्यावी. याप्रमाणे करण्यासाठी काशीतील कित्येक उद्योगी गृहस्थांनी पक्षी बाळगिले; परंतु ते जगले नाही. मरून गेले.)
॥ इतिबृहत्संहियांखंजनदर्शनंनामपंचचत्वारिंशोध्याय: ॥४५॥