अपक्व टेंभुरणीचे फळ, अपक्व कवठीचे फळ, रावरीचे पुष्प, साळईवृक्षाचे बी, धामणीची साल, वेखंड, ही द्रोण (२५६ पळे म्ह० ८५३। तोळे) परिमित उदकामध्ये घालून काढा करून अष्टांश शेष ठेवून उतरावा. नंतर श्रीवासक (कुरडू) वृक्षाचा चीक, बोळ, गुग्गुल, बिबवा, कवडयाऊद किंवा देवदारूचा चीक, सालवृक्षाचा चीक (राळ,) जवस, बेलफळ, यांनी युक्त तो काढा करावा. म्हणजे हा वज्रलेपनामक, लेप होतो ॥१॥२॥३॥
देवालय, गृह, गवाक्ष, शिवलिंग, देवप्रतिमा, भित्ति, कूप (विहीर तलाव इत्यादि जलाधार) यांचा ठाई हा पूर्वोक्त वज्रलेप तापवून द्यावा (लावावा;) म्हणजे तो दहा हजार वर्षेपर्यंतही तसाच रहातो (सुटत नाही) ॥४॥
लाख, देवदारूचा चीक, गुग्गूल, गृहधूम (घरांतील घेरु,) कवठीचे फळ, बेलफळातील बलक, लहान चिकण्याचे फळ, टेंभुरणीचे फळ, धोत्र्याचे फळ, मोहाचे फळ, मंजिष्ठा, सालवृक्षाचा चीक (राळ) बोळ, आंवळकाठी, यांचा काढा पूर्ववत करून अष्टभाग शेष घ्यावा. आणि तापवून लावावा. हा दुसरा वज्रलेप, पूर्वोक्त गुणांनी युक्त, पूर्वोक्त प्रासादादिकी द्यावा ॥५॥६॥
गाय, हयौस, मेंढा यांची शिंगे; गाढवाचे केस, महिष व गाय यांचे चर्म, निंब, कवठ यांची फळे, बोळ, यांचा काढा पूर्ववत करावा. म्हणजे हा वज्रतर लेपसंज्ञक दुसरा काढा, पूर्वीप्रमाणे लावावा ॥७॥
आठभाग शिसे, दोनभाग कासे, पितळ किंवा जस्ताचे फूल किंवा लोखंडाचे कीट एक भाग, यांचे मिश्रण करावे हा, वज्रसंघात, मयनामक शिल्पज्ञाने सांगितलेला आहे. हा पूर्वीसारखा देवालयादिकांस लावावा म्हणजे पूर्वीप्रमाणे राहतो ॥८॥
॥ इतिबृहत्संहितायांवज्रलेपोनामसप्तपंचाशोध्याय: ॥५७॥