अर्धा सूर्य दिसेनासा झाल्यापासून नक्षत्रे दिसू लागेपर्यंत सायंसंध्या. नक्षत्रे फिकट दिसू लागल्यापासून अर्धा सूर्य दिसेपर्यंत प्राप्त:संध्या या दोनही संध्याकाळी, पुढे सांगितलेल्या चिन्हांनी फले जाणावी ॥१॥
अरण्यपशु, पक्षी, वायु, सूर्यचंद्रांस खळे, प्रतिसूर्य, परिघ (सूर्योदयी किंवा सूर्यास्ती मेघाच्या तिरकसरेघा) वृक्षाकारमेघ, इंद्रधनुष्य, गंधर्वनगर, सूर्याकिरण, दंड (सूर्यकिरण व वायु यांचा समुदाय) धूळ, स्नेहवर्ण(निर्मलवर्ण) यानीकरून संध्याफल सांगावे ॥२॥
मृग (अरण्यपशु) उच्चस्वराने वारंवार भयंकर शब्द करील तर ग्रामनाश होतो. मृग, सेनेच्या दक्षिणेकडे राहून सूर्याभिमुख मोठा शब्द करील तर सैन्याचा नाश होतो ॥३॥
प्रात:संध्यासमयी दीप्तदिशेकडे असून सूर्यसन्मुख, रूक्षस्वरांनी मृग किंवा पक्षी यांनी केलेले शब्द, देशाचा नाश सांगतात. तसेच पशुपक्षी सूर्याभिमुख नगराच्या दक्षिणदिशेकडे राहून शब्द करतील तर त्या नगराचे शत्रू ग्रहण करतील (शत्रू घेतील) ॥५॥
गृह, वृक्ष, तोरण यांना कापविणारा; धूळ, मृत्पिंड यांनी युक्त; मोठा शब्द करणारा, रूक्ष, अंतरिक्षगत पक्ष्यांस पाडणारा असा प्रबलवायु संध्यासमयी सुटेल तर अशुभ होय ॥६॥
मंदवायूने कंपितपत्र आहेत वृक्ष जीच्याठाई, अशी अथवा वायुरहित, मधुर शब्द व शांत असे आहेत पक्षी व पशु जीच्याठाई, अशी संध्या (संध्यासमय) शुभ होय ॥७॥
दंड (वक्ष्यमाण), वीज, मत्स्य, परिधि (खळे,) परिवेष, इंद्रधनुष्य, ऐरावत (लांब इंद्रधनुष्य,) सूर्यकिरण हे संध्यासमयी जर स्निग्ध होतील तर शीघ्र वृष्टि होईल ॥८॥
विच्छिन्न (तुटलेले) सम नव्हत, नष्टवर्ण, विकारयुक्त, अस्पष्ट, अपसव्यवेष्टित, सूक्ष्म, र्हस्व, शक्तिहीन, कलुष (अप्रसन्न) संध्यासमयी किरण असतील तर विरोध व अवर्षण ही होतात ॥९॥
तेजस्वी, निर्मल, स्पष्ट, दीर्घ, प्रदक्षिण फिरणारे असे सूर्य़ाचे किरण अंधकाररहित आकाशामध्ये दिसतील तर सर्व जगताचे कल्याण होईल ॥१०॥
आकाशाचा आदि, मध्य, अंत यांत गमन करणारे (सर्वव्यापी,) स्निग्ध, अखंड, सरळ असे शुभ्र सूर्याचे किरण अमोघसंज्ञक होत. हे वृष्टि करणारे होत. ॥११॥
श्वेतकृष्ण, पिंगट, कपिल, विचित्र, आरक्त, हरिवा, शबल, या वर्णांचे सर्वाकाश व्यापून राहणारे सूर्याचे किरण वृष्टि करणारे होत व सात दिवसांनी थोडेसे भय करणारे होतात ॥१२॥
ताम्रवर्ण सूर्यकिरण असता सेनापतीस मृत्यु होतो. पीत व तांबडे अ. सेनापतीस दु:ख होते. पोपटीरंगाचे अ. पशु व धान्य यांचा नाश होतो. धूम्रवर्ण अ. गाईंचा नाशा होतो ॥१३॥
मांजिष्ठ (तांबडा) वर्ण अ. शस्त्र व अग्नि यांचे भय होते. कपिलवर्ण अ. वायुसहित वृष्टि होते. भस्मवर्ण अ. अवर्षण होते. कृष्णनीलमिश्रितवर्ण अ. वृष्टि अल्प होते ॥१४॥
बंधूकपुष्प म्ह. दुपारीचे पुष्प यासारखे अति तांबडेव काजळासारखे अति काळे, संध्याकाळी रज (धूळ) सूर्याप्रत येईल तर शेकडो रोगांनीलोक पीडित होतील. तीच शुभ्र धूल असेल तर लोकांची वृद्धि व शांति होते ॥१५॥
सूर्यकिरण, मेघ व वायु एकत्र होऊन त्याचा आकार दंडाकृति असेल तर तो दंड होतो. तो दंड विदिशेस असेल तर राजांस अशुभ व तो दंड उत्तरादि दिशेस असेल तर ब्राम्हाणादिवर्णांस अशुभ होय ॥१६॥
दंड, सूर्याचा उदय मध्य अस्त या काली द्दष्टिगोचर होईल तर शस्त्रभय व उपद्रव होतो. शुक्ल, रक्त, पीत, कृष्ण या चार वर्णांचा असेल तर ब्राम्हाण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांचा अनुक्रमाने नाशा होतो. ज्या दिशेस सन्मुख तो दंड असेल त्या दिशेचा नाश होतो (सूर्योजवळचा त्या दंडाचा भाग ते मूळ व अन्य समोरचा भाग ते मुख जाणावे) ॥१७॥
दहयासारख्या अग्राचा, नीलवर्ण, सूर्यास आच्छादणारा, आकाशमध्यभागी राहणारा, असा मेघवृक्ष व पीतवर्णाने शोभित, सहतमूल (दाट) असे मेघ बहुत वृष्टिकारक होतात ॥१८॥
मेघवृक्ष, अनुलोम उत्पन्न झाला तर यायी (स्वारीकरून जाणारा) राजाचा नाश होतो. बालवृक्षारखा मेघवृक्ष असता युवराज (पिता असता राज्यकारभार पाहणारा) व प्रधान यास मृत्यु होतो ॥१९॥
निळा, पिवळानिळा, कमळकेसराप्रमाणे पिवळा अशा रंगाची वायुरहित, सूर्यकिरणयुक्त अशी संध्या (संध्यासमय) तत्काल वृष्टि करिते ॥२०॥
गर्दभ, उष्ट्र, काक, मार्जार इत्यादिकांच्या आकारांसारखे मेघ; गंधर्वनगर, बर्फ, धूळ, धूम यांनी युक्त संध्यासमय वर्षाकाळी होईल तर अवृष्टि होईल. अन्यकाळी होईल तर शस्त्रकोप होतो ॥२१॥
शिशिरादि सहा ऋतूंमध्ये संध्यासमयी शोणादि सहा वर्ण आपापल्या ऋतुत स्वाभाविक झाले तर शुभ होत. अन्यवर्ण झाले तर अशुभ होते. शिशिरऋतूमध्ये शोण किर्मिजी,) वसंत पीत; ग्रीष्म श्वेत; वर्षा चित्र; शरत् पद्म (कुसुंबा;) हेमंतऋतूमध्ये रक्तासारखा ॥२२॥
मेघखंड, शस्त्रधारी पुरुषासारखे सूर्यासपीप दिसेल तर, शुत्रुभय उत्पन्न करील. श्वेतवर्ण गंधर्वनगर सूर्याचे आच्छादन करील तर नगरलाभ होईल. सूर्य गंधर्वनगराचे भेदन करील तर त्या नगराचा शत्रू नाश करतील ॥२३॥
अत्यंत श्वेतमेघांचे आच्छादन दक्षिणभागाने सूर्यास जर होईल तर वृष्टि होते. तसेच वीरण (काळावाळा) याच्या समूहासारखे व शांतदिशेस झालेले अशा मेघांचे जर सूर्यास आच्छादन होईल तर वष्टि होईल ॥२४॥
सूर्याच्या उदयकाली उत्पन्न झालेला परिघ (तिर्कस मेघरेषा) श्वेत दिसेल तर राजांस दु:ख होईल. तोच परिघ रक्तासारखा असेल तर सैन्य राजावर कोपेल. सुवर्णासारखा परिघ दिसेल तर सैन्यवृद्धि होईल ॥२५॥
दोहो बाजूनी विद्यमान, शरीराकारयुक्त असे सूर्याचे परिधि बहुत वृष्टिकारक होत. सर्व दिशांस संचार करणारे असे परिधि असतील तर उदकाचा कणही देणार नाहीत ॥२६॥
ध्वज, छत्र, पर्वत, गज, अश्व यांसारखे मेघ दोनही संध्यासमयी राजांस किंवा लोकांस जयप्रद होतात. तेच मेघ आरक्त असले तर युद्धे होतात ॥२७॥
घास (गवत,) धूमसंचय यांसारखे मेघ रखरखीत नसले तर राजांची सैन्यवृद्धि करितात ॥२८॥
वृक्षांसारखे, लोंबणारे, अत्यंत तांबडे असे मेघ उभयसंध्यासमयी होतील तर ते शुभ होत. तसेच नगरासारखेही शुभ होत ॥२९॥
सूर्याभिमुख पक्षई, भालु, अरण्यपशु यांच्या शब्दांनी युक्त; दंड, धूळ, परिघ (तिर्कस सूर्योदयी मेघरेखा,) इंद्रधनुष्य, गंधर्वनगर इत्यादिकांनी युक्त अशी व यांच्या नाशाकारणे होते (नाश करिते) ॥३०॥
प्रात:संध्येचे शुभाशुभफल त्याचवेळी होते. सायंसंध्येचे श, रात्रीस होते. अथवा संध्याफल तीन दिवसांनी होते. परिवेष (खळे,) धूळ, तिर्यकरेषा यांचे शुभाशुभफल तत्काल न झाले तर सात दिवसांनी होते. सूर्यकिरण, इंद्रधनुष्य, वीज, प्रतिसूर्य, मेघ, वायु यांचेही फल त्याचवेळी न झाले तर सात दिवसांनी होते. पक्ष्यांच्या शब्दांचे फल आठ दिवसांनी होते. अरण्यपशूंच्या शब्दांचे फल सात दिवसांनी होते ॥३१॥
संध्यासमयाच्या कांतीने एक योजन (कोस ४) प्रकाश होतो; यास्तव तिचे शुभाशुभफल ४ कोसांतच होते. विजेचे सहा योजने फल होते. मेघगर्गनेचे पांच योजने फल होते. उल्कानिपातास कोणताही नियम नाही म्ह. सर्वत्र उल्कानिपाताचे फल होते ॥३२॥
प्रत्यर्कसंज्ञक जो परिधि त्याचे शुभाशुभफल तीन योजने होते. परिघ (तिर्यक्रेषा) याचे फल पांच योजने होते. खळे सोळायोजने फल देते. इंद्रधनुष्य दहायोजनांत फल देते ॥३३॥
॥ इतिबृहत्संहितायांसंध्यालक्षणंनामत्रिंशत्तमोध्याय: ॥३०॥