बृहत्संहिता - अध्याय ७

शके ८८८ फाल्गुन कृष्ण द्वितीया गुरुवारी उत्पलनामकाने ही टीका केली.


अथबुधचार:
॥ अथबुधचार: ॥

बुध उत्पातावाचून कधीही उदय पावत नाही. त्याचा उदय झाला असता, उदक, अग्नि, वायु यांचे भय होते. धान्याची किंमत कमी किंवा जास्ती होते. (फार महागाई किंवा फार स्वस्ताई होते) हे उत्पातच होत ॥१॥

बुध श्रवण, धनिष्ठा, रोहिणी, मृगशीर्ष, उत्तराषाढा; या नक्षत्रांचा भेद करून गमन करील तर अवर्षण व रोगभय करील ॥२॥

आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्र्लेषा, मघा; ही नक्षत्रे बुध भेदून जाईल तर युद्ध, दुर्भिक्ष, रोग, अवर्षण व संताप यांहीकरून प्रजेस पीडा होईल ॥३॥

हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, या नक्षत्री बुध असून योगतारांस भेद करील तर गाईस अशुभ होय. तैलादि रसांची वृद्धि करील व भूमीवर धान्य बहुत करील ॥४॥

उत्तराफ० कृत्तिका, उत्तराभाद्रपदा, भरणी; या नक्षत्रांते बुध भेदन करील तर प्राणिमात्रांच्या धातूंचा (वसासृक्‌मांसमेदोस्थिमज्जाशुक्राणि) नाश करील ॥५॥

अश्विनी, शततारका, मूळ, रेवती; या नक्षत्रांते बुध भेदन करील तर व्यापारी, वैद्य, नाविक, उदकोत्पन्न द्रव्ये (मुक्ताफलादिक,) अश्व; यांचा नाश होतो ॥६॥

पूर्वा, पूर्वाषाढा, पूर्वाभाद्रपदा, या तीन नक्षत्रांतून एकासही बुध भेदन करील तर जगास दुर्भिक्ष, युद्ध, चोर, रोग, यांपासून भय देणारा होईल ॥७॥

प्राकृता, विमिश्रा, संक्षिप्ता, तीक्ष्णा, योगांता, घोरा, पापाख्या, अशा ७ बुधाच्या गति, नक्षत्रांहीकरून पराशरतंत्रामध्ये सांगितल्या आहेत ॥८॥

स्वाति, भरणी, रोहिणी, कृत्तिका या नक्षत्री बुध असता, प्राकृत गतीमध्ये असतो. मृगशीर्ष, आर्द्रा, मघा, आश्लेषा यांस बुध असता, मिश्रागति ॥९॥

पुष्य, पुनर्वसु, पूर्वा, उत्तरा यांस बुध असता संक्षिप्तागति ॥
पूर्वाभा०, उत्तराभा०, ज्येष्ठा, अश्विनी, रेवती या नक्षत्री बुध असता, तीक्ष्णागति ॥१०॥

मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, यांस बुध असता, योगांतिका गति ॥
श्रवण, चित्रा, धनिष्ठा, शततारका, या नक्षत्री बुध असता घोरागति ॥११॥
हस्त, अनुराधा, विशाखा, या नक्षत्री बुध असता पापाख्यागति होते ॥

उदय व अस्तयांच्या दिवसांनी पूर्वोक्त गतिलक्षण पराशरच सांगता झाला ॥१२॥

प्राकृत गतीमध्ये बुध उदय पावेल तर ४० दिवस उदित राहील. अस्त पावेल तर ४० दिवस अस्तमित राहील. असाच मिश्रागतीमध्ये ३० दिवस, संक्षिप्तागतीमध्ये २२ दिवस, तीक्ष्णागतीमध्ये १८ दिवस, योगांतिकेमध्ये ९ दिवस, घोरागतीमध्ये १५ दिवस, पापाख्येमध्ये ११ दिवस; बुधाचा उदय किंवा अस्त राह्तो ॥१३॥

प्राकृतगतीमध्ये बुध असता, बुध असता, आरोग्य, वृष्टि, धान्यवृद्धि व कल्याण ही होतात. संक्षिप्त व मिश्र या गतीमध्ये बुध असता, ही पूर्वोक्त मध्यम होतात. परिवेषा, तीक्ष्णा, योगांतका, घोरा, पापाख्या या गतीत बुध असता, रोग, अवर्षण, धान्याभाव, व अकल्याण ही होतात ॥१४॥

ऋजु, अतिवक्रा, वक्रा, विकला अशा बुधाच्या ४ गति देवलऋषीच्या मताने आहेत. बुध ऋजुगतीत ३० दिवस राहतो. अतिवक्रगतीत २४ दिवस, वक्रगतीत १२ दिवस, व विकलगतीत ६ दिवस राहतो, असे देवलाचे मत आहे ॥१५॥

बुधाची ऋज्वीगति प्रजांस हित करते, अतिवक्रागति धान्यनाश करते, वक्रागति शस्त्रभय करते, व विकलागति भय व रोग याते उत्पन्न करते ॥१६॥

पौष, आषाढ, श्रावण, वैशाख, माघ या महिन्यात बुधाचा उदय झाला तर जगास भय होते व याच मासांमध्ये बुधाचा अस्त  झाला तर शुभफल होते ॥१७॥

कार्तिक, आश्विन या महिन्यांत बुधाचा उदय होईल तर शस्त्र, चोर, अग्नि, रोग, जल, दुर्भिक्ष यांचे भय होईल ॥१८॥

जी नगरे शत्रूंनी बुधास्तामध्ये रोधिली (वेष्टिली) ती बुधोदय झाला म्हणजे सुटतील. व पश्चिमेकदे बुधोदय झाला तर नगरांचा लाभ होतो (सुटतात) असे अन्य ज्योतिर्वेत्ते म्हणतात ॥१९॥

बुधाचा सुवर्णासारखा व पोपटासारखा व नीलमण्यासारखा वर्ण आणि निर्मल देह (बिंब) व विस्तीर्णबिंब लोकांस शुभ व याहून अन्य वर्णादिकांचा बुध अशुभकारक होय ॥२०॥


॥ इतिवराहमिहिरकृतबृहत्संहितायांबुधचारो नामसप्तमोध्याय: समाप्त: ॥७॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2015-02-18T03:53:55.5270000